आळंदीमध्ये तयारी पूर्ण;
गावोगावच्या दिंड्या दाखलआळंदी : कोरोनाच्या संकटाला पाठीवर टाकत यंदा पंढरपूरचा पायी आषाढी वारी सोहळा होत आहे. आज (दि.२० जून) देहूतून संत तुकाराम महाराज, पैठणहून संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. माऊलींचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ, धाकुटी बहीण संत मुक्ताबाई यांच्या पालख्या तर अगोदरच निघाल्या आहेत. आता सर्वांना वेध लागले आहेत ते उद्याच्या (दि. २१ जून) संत ज्ञाेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याचे. या सोहळ्यासाठी अलंकापुरी आणि संपूर्ण महाराष्ट्र अधीर झाला आहे.
माऊलींचे अश्व आळंदीत दाखल
कर्नाटकातील अंकली येथून पायी निघालेले माऊलींचे अश्व आज आळंदीत दाखल झाले आहेत. गावोगावच्या दिंड्याही आळंदीत पोहोचल्या आहेत.
यामुळे अवघी आळंदी भक्तीमय झाली आहे. धर्मशाळा वारकऱ्यांनी गजबजल्या आहेत. प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. १० हजार भाविक क्षमतेची दर्शन बारी उभारण्यात आली आहे. आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून पासधारक वाहनांना शहरात प्रवेश दिला जात आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावा असेही आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
असा असेल पालखी सोहळ्याचा प्रवास –
मंगळवारी (दि . २१ जून) रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथील मंदिरातून प्रस्थान ठेवेल. रात्री आळंदीतच आजोळघरी दर्शनबारी मंडपात पालखीचा मुक्कामी राहील. बुधवारी (दि. २२ जून) सकाळी आळंदीतून सोहळा मार्गस्थ होईल आणि सायंकाळी पुण्यात मुक्कामाला राहील. २३ जून रोजी देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. शुक्रवारी आणि शनिवारी (दि. २४ आणि २५ जून) पालखीचा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी राहील. त्यानंतर रविवारी (दि. २६ जून) जेजुरी, सोमवारी (दि. २७) रोजी वाल्हे, मंगळवारी आणि बुधवारी (दि . २८ आणि २९ जून) लोणंद येथे पालखीचा दोन दिवस मुक्कामीराहील.
त्यानंतर गुरुवारी (दि. ३० जून) रोजी तरडगांव, शुक्रवारी आणि शनिवारी (दि. १ आणि २ जुलै ) फलटण येथे दोन दिवस मुक्काम असेल. रविवारी (दि. ३ जुलै) रोजी बरड, सोमवारी (दि. ४ जुलै) नातेपुते, मंगळवारी (दि. ५ जुलै) रोजी माळशिरस , बुधवार (दि. ६ जुलै) वेळापूर, गुरुवारी (दि. ७ जुलै) रोजी भंडीशेगाव, शुक्रवारी (दि. ८ जुलै) वाखरी तर, शनिवारी (दि. ९ जुलै) श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल.
रविवारी (दि. १० जुलै) आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे.
पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. यंदा तिथीची वृद्धी झाल्याने लोणंद आणि फलटण येथे दोन दिवस पालखीचा मुक्काम वाढला आहे.
पाऊस लांबल्याचा परिणाम होण्याची शक्यता
दोन वर्षे पायी वारी झाली नसल्याने यंदाच्या सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानुसार प्रशासन आणि देवस्थानने नियोजन केले आहे. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने आणि पाऊस लांबून पेरण्या रखडल्याने वारकरी संख्या घटू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
(छायाचित्रे : माऊली वैद्य)