पुरोगामी कार्यकर्त्यांनी घेतला
माऊलींच्या सोहळ्यात सहभाग
पुणे : पुरोगामी चळवळीतील, प्रागतिक विचारांचे कार्यकर्ते, लेखक, कवी, शाहीर, पत्रकार यांनी रविवारी (दि. २६ जून) सासवड ते जेजुरी असा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. संतांच्या विवेकी परंपरेला जोडून घेत प्रागतिक आणि मानवतावादी विचार पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दरवर्षी अनेक नवीन तरुण कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होत आहेत.
आषाढी एकादशीला पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने संतांच्या निघणाऱ्या पालख्या, त्यातील दिंड्यांमध्ये सहभागी होणारे लाखो वारकरी यांची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे.
महाराष्ट्रातील संतांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता यांची शिकवण दिली. त्यांच्या या विवेकी वारशासोबत जोडून घेण्यासाठी पुरोगामी आणि प्रागतिक विचारांच्या चळवळीतील कार्यकर्ते एक दिवस वारी सोहळ्यात सहभाग घेत आहेत. गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
मागील दोन वर्षे कोविडच्या साथीमुळे वारी सोहळा झाला नाही. त्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात कार्यकर्ते सहभागी झाले होते. यंदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सासवड ते जेजुरी असा सहभाग घेण्यात आला.
समतेच्या दिंडीतील वारकरी सकाळी साडेआठ वाजता सासवड येथील बस स्टँडवर एकत्र जमले. ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या नेतृत्त्वाखाली ह. भ. प .ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या दिंडीमध्ये (रथामागे क्रमांक ८६) कार्यकर्ते सहभागी झाले.
शाहीर शीतल साठे, शाहीर सचिन माळी, सुनील स्वामी यांच्यासह कार्यकर्त्यांनी समतेची गीते, गाणी, अभंग, भारुड सादर केले. यातून संविधानातील मूल्यांचा जागर यावेळी करण्यात आला.
तुकडोजी महाराजांचे अनुयायी सुबोध महाराज, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते शरद कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, संविधान प्रचारक नागेश जाधव, लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे, सातारा, सासवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर, राष्ट्रसेवादलाचे दत्ता पाकीरे, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे उपेंद्र टण्णू, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सुनील स्वामी, संविधान प्रचारक संदीप आखाडे, गांधी विचारांचे प्रचारक संकेत मुनोत, जागल्या वेब पोर्टलचे संपादक दीपक जाधव, अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल, भगवान घोलप, माळी सर आदी असंख्य कार्यकर्ते या वारीत सहभागी झाले.