बंजारा समाजाचे सद्गुरू
लढले होते निजामाविरूद्ध
‘अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढेच नसून काया, वाचा आणि मनाने कोणालाही न दुखवणे म्हणजेच अहिंसा..’, अशी शिकवण देणारे थोर संत सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे.
बंजारा समाजाचे सद्गुरू असणाऱ्या संत सेवालाल महाराज यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शासन स्तरावर साजरी केली जाते. मानवता, पर्यावरण रक्षण, गोरक्षणाचा संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराजांनी निजामाविरुद्ध लढा उभारला होता.
व्यापाराच्या निमित्ताने देशभर भ्रमंती करताना संत सेवालाल महाराजांना अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. त्यातून त्यांना सत्याचा शोध लागला आणि त्यांनी समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. त्यामुळे त्यांना ‘संत सेवालाल महाराज’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
संत सेवालाल महाराज यांचे मूळ नाव सेवा रामावत असे आहे. जन्म माघ कृ. चतुर्दशी शके १६६१ दि. १५ फेब्रुवारी १७३९ रोजी तेलंगणा राज्यातील गोलालडोडी ता. गुत्ती जि. अनंतपूर येथे झाला. वडिलांचे नाव भीमानाईक, तर आईचे नाव धरमंणी होते. भीमा नाईक हे तेथील बंजारा तांड्याचे नाईक होते. ‘संत सेवालाल महाराजांचा एक संत म्हणून विचार करता, त्यांचे विचार भगवान महावीर, संत कबीर, संत बसवेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज यांच्या तोडीचे आहेत,’ असे संत सेवालाल समाधी मंदिर, पोहरादेवी जि. वाशिम येथील महंत सुनील महाराज यांनी सांगितले. त्यांचे विचार अलिखित होते. त्यांना अलिकडे पुस्तकरूप देण्यात आले आहे.
संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादाची शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अनीतीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्व-कर्तृत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा इत्यादींविषयींचे त्यांचे विचार वचने, दोहे, कवणे आणि भजने या रूपात प्रकट झाले आहेत. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात,
सत्यधर्म लीनता ती रेंणू।
सदा सासी बोलंणू।
हर वातेनं सोच समजन केवंणू।
भवसागर पार कर लेंणू।।
म्हणजेच, ‘सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे. नम्रतेने, लीनतेने इतरांशी वागावे. प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊनच मगच बोलावे. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरुपी भवसागर पार करून जाल.’
‘अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढेच नसून काया, वाचा आणि मनाने कोणालाही न दुखवणे ही देखील अहिंसा होय. गाय कितीही भाकड असली तरी तिला कधीच कसायाला विकू नका. देवी ही सर्वांची आई आहे. ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही. दुःख, पिडा, त्रास देत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या-बकऱ्याचा बळी देऊ नका. त्यापेक्षा सेवा करून तिला प्रसन्न करा,’ असा साधा-सोपा ईश्वर भक्तीचा मार्ग संत सेवालाल महाराज सांगतात.
वाडी-वस्तीनं सायी वेस।
किटी-मुंगीनं सायी वेस।।
जीव-जणगाणीनं सायी वेस।
बाल-बच्चानं सायी वेस।
सेनं साथी वेस।।
म्हणजेच, ‘हे देवीमाते या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे रक्षण कर. वाडी-वस्त्या, किड्या-मुंग्यांचे रक्षण कर!’ सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्रच जणू सेवालाल महाराज पुढील दोह्यातून सांगतात.
तम सौता तमारे जीवनमं।
दिवो लगा सको छो।।
कोई केनी भजो-पुजो मत।
कोई केती कमी छेनी।।
सौतर वळख सौता करलीजो।
भजे-पुजेमं वेळ घालो मत।।
करंणी करेर शिको।
नरेर नारायण बंन जायो।।
जाणजो छाणजो।
पछच मानजो।।
म्हणजेच, ‘प्रत्येक व्यक्तीत उपजतच ऊर्जा, शक्ती, सामर्थ्य, गुणवत्ता, बुद्धिमत्ता योग्यता असतेच. त्यासाठी सर्व प्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कोणी तरी येईल आणि माझे भले करील, माझ्याने हे होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये. तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता.’
छळ, कपट, बेईमानी करणाऱ्यांवर फटकारे ओढताना सेवालाल महाराज म्हणतात-
जे कपट वाचा लेन आये।
पाप ओरे सोबत जाये।।
यम घरेरो फासो ओरे गळेमं पडीये।
नव मंणेरी काया ओरी नरकेम मळजाये।
लक्ष चौऱ्यांशी योनी भोगाये।।
म्हणजेच, ‘कपटनीतीचा व्यवहार करून जे लोकांना फसवतील ते पापाचे भागीदार होतील. म्हणून कोणीही कपटनीतीचा, बेईमानीचा व्यवहार करू नये,’ असे ते सांगतात. ‘चोर, लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते, अराजकता माजते. लोकांना दुःख भोगावे लागते. त्यासाठी समाजात मेहनती, नीतीवान आणि चारित्र्यसंपन्न लोकांचीच गरज असते’, अशी संत सेवालाल महाराजांनी अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील अशी सत्यवचने, दोहे सांगून समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली आहे. संत सेवालाल महाराज यांनी समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाचे, इहवादाचे आणि विज्ञानाचे धडे दिलेले आहेत. त्यांची वचने, दोहे ही साध्या, सोप्या, सरळ अशा बंजारा बोलीतील आहेत. संत सेवालाल महाराजांचे हे क्रांतिकारी अमृततुल्य विचार केवळ बंजारा बोलीपुरते मर्यादित न राहता इतर भाषेतूनही प्रकट व्हावेत, अशी अपेक्षा महंत सुनील महाराज व्यक्त करतात. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास त्रिवार वंदन…🙏
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com