संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे

‘माऊली माऊली’च्या घोषात प्रस्थान

आळंदी :
चला पंढरीसी जाऊं। रखमादेवीवरा पाहूं॥
डोळे निवतील कान। मना तेथें समाधान॥
संता महंता होतील भेटी। आनंदे नाचों वाळवंटी॥
या संत तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणे महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या ‘माऊली माऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज (दि. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी प्रस्थान ठेवले.

पहाटेपासूनच सुरू असलेल्या विविध धार्मिक विधींनंतर सायंकाळी ४ वाजता प्रस्थान पूजा सुरू झाली. संस्थानच्या वतीने अध्यक्ष योगेश देसाई यांनी माऊलींची पूजा आणि आरती केली. आळंदी येथील समाधी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार-आरफळकर आदी उपस्थित होते.

माऊलींच्या मंदिरात पहाटे ५ वाजता घंटानाद झाला आणि माऊलींचे नित्योपचार सुरू झाले. काकडा, पवमानपूजा, अभिषेक आणि आरती झाल्यानंतर भाविकांचे अभिषेक सुरू झाले. सकाळी ९ ते ११च्या दरम्यान काल्याचे कीर्तन झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. दुपारी अडीच वाजता माऊलींचे अश्व आणि मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात घेण्यास सुरुवात झाली. ४७ दिंड्यांच्या प्रत्येकी ७५ वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला. मंदिरसायंकाळी ४ वाजता प्रस्थान पूजा सुरू झाली. श्री गुरु हैबतबाबा आणि संस्थानातर्फे आरती झाली.

आषाढी वारीसाठी माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील आणि सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यांनी या पादुका वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत ठेवल्या. मानकरी, फडकरी आणि दिंडीप्रमुखांना नारळप्रसाद देण्यात आला आणि सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर विणा मंडपातील माऊलींची पालखी खांद्यावर घेवून ‘माऊली माऊली’ नामाचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी वीणा मंडपातून बाहेर आणली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर महाद्वारातून बाहेर पडत पालखीने नगरप्रदक्षिणा केली आणि नंतर पालखी माऊलींच्या आजोळघरी म्हणजे गांधीवाड्यात विसावली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून भाविक अलंकापुरीत दाखल झालेले आहेत. इंद्रायणीचा घाट, विविध धर्मशाळा, सिद्धबेट, मंदिरे ही ठिकाणे गर्दीने व्यापली आहेत. नदी घाटावर ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू आहेत. सर्वत्र हरिनामाचा अखंड गजर होत आहे. यंदा मोजक्याच वारकऱ्यांना प्रस्थानासाठी मंदिरात प्रवेश असल्याने महाद्वारापुढे वारकऱ्यांची पोलिसांशी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

आज पालखीचा मुक्काम गांधीवाड्यात असेल. तर उद्या (दि. ११) भल्या सकाळी हा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होईल. सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *