रा. चिं. ढेरेंचे विठ्ठलमूर्ती संशोधन;

डॉ. सदानंद मोरेंचा साधार प्रतिवाद

यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोशल मीडियावर ‘पंढरपूरचा श्री विठ्ठल खरा, की माढा गावचा?’ अशा पोस्ट फिरताना दिसल्या. त्याला संदर्भ दिला गेला आहे, लेखक रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेल्या श्री विठ्ठल : एक महासमन्वय या पुस्तकाचा. ढेरे यांनी १९८१ मध्ये पंढरपूरमधील विठ्ठलमूर्ती ही आद्य विठ्ठलमूर्ती नसून माढा येथील विठ्ठलमूर्ती आद्य आहे, असा दावा केला होता. यामुळे संशोधक, वारकरी आणि सामान्य जनतेत खळबळ माजली होती. ढेरे यांच्या या संशोधनाचा साधार प्रतिवाद ह. भ. प. प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केला. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी यावर सविस्तर व्याख्यान दिलं आणि सध्या पंढरीत असणारी श्री विठ्ठलमूर्ती हीच आद्य विठ्ठलमूर्ती असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं. डॉ. मोरे यांचं हे संशोधन जुलै १९८४ मधील ‘स्वराज्य’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झालं. हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.

महाराष्ट्रातील एक मान्यवर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. डॉ. ढेरे यांनी ‘विठ्ठलाच्या आद्यमूर्तीचा शोध’ सर्वप्रथम ( ता. १५ आणि १६ फेब्रु १९८१) च्या ‘दै केसरी’ मधून प्रसिद्ध केला. त्याच्या या शोधासंबंधी काही महत्त्वाचे आक्षेप मी त्याचवेळी एका लेखात मांडले होते. (दै. विशाल सह्याद्री). सदर लेख माझ्या ‘मंथन’ या शोधलेखांच्या संग्रहात समाविष्ट आहे. हा लेख आपला प्रतिवाद करणाऱ्या लेखांमधील सर्वात महत्त्वपूर्ण लेख असल्याचे डॉ. ढेरे यांनी त्यावेळी खासगीत आणि पत्रव्यवहारात मान्य केलेले होते; परंतु त्यांच्या ‘महासमन्वयात’ त्यांनी माझ्या लेखाचा प्रत्यक्ष संदर्भ दिलेला नाही किंवा त्यातील मुद्द्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्नही केलेला नाही. अर्थात आपल्या सिद्धांताची पुस्तकरुपाने पुनर्मांडणी करताना त्यांना या लेखाचा उपयोग झालेला असावा. हे लेख आणि पुस्तक वाचणाऱ्या कोणालाही जाणवेल. असो.

डॉ. ढेरे यांनी आद्य मूर्तीच्या शोधात स्कांद पांडुरंग माहात्म्यातील विठ्ठल वर्णनावर भर दिलेला असून, या वर्णनातील वक्षःस्थळावरील मंत्र म्हणजे आद्य विठ्ठलमूर्तीचे अनन्यसाधारण लक्षण असे ते मानतात. अशा प्रकारचा मंत्र असलेली मूर्ती सोलापूर जिल्ह्यातील माढे येथे आहे. तेव्हा तीच विठ्ठलाची आद्य मूर्ती असली पाहिजे, असे त्यांचे पूर्वी मत होते. (दै. कैसरी ता. १५ व १६ फेब्रु. १९८१) महासमन्वयात त्यांनी हे मत बदलले आहे. परंतु वक्षःस्थळावरील मंत्र हे आद्य मूर्तीचे लक्षण हा त्यांचा सिद्धांत अद्याप कायम आहे. त्यांच्या आताच्या मांडणीनुसार माढ्याची मूर्ती आद्य नसून आद्य मूर्तीसारखी आहे आणि आद्य मूर्ती इ. स. १८७३ पर्यंत पंढरपुरात विराजमान होती. (महासमन्वय १४९)

अफजलखान स्वारीच्या वेळी मूर्ती हलविली

इ. स. १६५९ मध्ये अफजलखान स्वारी करून आला तेव्हा संभाव्य धोक्यापासून मूर्तीचा बचाव करण्यासाठी बडव्यांनी मूर्ती माढ्याला हलविली. पुढे खानाचे संकट टळल्यावर मूर्ती परत पंढरपुरात आणण्यात आली. या घटनेच्या स्मरणार्थ महादजी निंबाळकरांनी बांधलेल्या मंदिरात माढेकरांनी आद्य विठ्ठल मूर्तीवर हुकूम (अर्थात हृदयावर मंत्राक्षरे असलेली) दुसरी मूर्ती बनविली असे डॉ. ढेरे आता कै. वि. का. राजवाडे आणि परंपरा यांच्या आधारे म्हणतात. मूर्ती माढ्याला हलविण्यात आली, असे राजवाड्यांनी पूर्वीच म्हटले होते. पण ढेऱ्यांना ते मान्य नव्हते. आता त्यांना ते मान्य झाले, याचे कारण म्हणजे इ. स. १८०५ मध्ये धर्मसिंधूकार बाबा पाध्ये यांनी आपल्या ‘विठ्ठलध्यान मानसपूजा’ या स्तोत्रात विठ्ठलाचे वर्णन करताना ‘वक्षस्थळावर षडक्षर मंत्र असलेला’ असे केलेले आहे. त्यानुसार बाबा पाध्यांच्या समोरील मूर्ती आद्यमूर्तीच असली पाहिजे हे स्पष्ट होते.

मग आता पंढरपूर येथे आज विराजमान असणाऱ्या विठ्ठलमूर्तीच्या छातीवर मंत्राक्षरे नाहीत, म्हणजे ती बाबा पाध्यांच्या समोरील इ. स. १८०५ मधील मूर्ती नाही. पण मग ती गेली कोठे? डॉ. ढेरे म्हणतात इ. स. १८७६ मध्ये कोण्या एका माथेफिरूने तिच्यावर धोंडा फेकला. त्या अपघाताने तिचा एक पाय भंगला. बडव्यांनी ती बदलली. (महासमन्वय, पृ. १४९-१५०). डॉ. ढेरे म्हणतात तसा अपघात ता. २० जुलै १८७३ रोजी झालेला होता ही वस्तुस्थिती आहे. या घटनेची चर्चा इंदुप्रकाश ज्ञानोदय (ठाणे), वन्हऱ्हाड समाचार इ. तत्कालीन पत्रांमध्ये सापडते. या घटनेनंतर दहाच वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या बॉम्बे गॅझिटिअरमध्ये सोलापूर जिल्ह्यासंबंधीच्या मजकुरात या घटनेबद्दलची मतमतांतरे दिलेली आहेत; परंतु डॉ. ढेरे यांना या सर्व पुराव्यांची छाननी करून मगच निष्कर्ष मांडावा असे वाटलेले दिसत नाही.

गोसाव्यांनी केला मूर्तीवर हल्ला

२० जुलै १८७३ रोजी काही गोसावी मंदिरात आले होते. त्यातील एकाने मूर्तीवर धोंडा मारला किंवा मूर्तीचे पाय धरून तिला ढकलले. ती पडली आणि तिचा डावा पाय, घोटा आणि गुडघा या दरम्यान मोडला. असे या अपघाताचे स्वरूप आहे. सदर गोसावी मूर्तीला फळाचा नैवेद्य दाखवत होता आणि विठ्ठलाने आपले फळ भक्षण करावे असे त्याला वाटत होते; पण तसे न झाल्याने त्याने हा प्रकार केला. त्याला नंतर गावकऱ्यांनी मारहाण केली. तो शैव होता, इत्यादी आनुषंगिक माहितीही प्रसिद्ध झालेली आहे. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर बडव्यांनी दोन-तीन दिवस मंदिर बंद ठेवले आणि मूर्तीच्या पायामध्ये लोखंडी किंवा तांब्याची पट्टी घालून ती सांधून घेतली आणि पाठीमागून गुडघ्यापर्यंत आधार, धीरा किंवा टेकू दिला; परंतु एकूण हा साराच प्रकार रहस्यमय वाटल्यामुळे बडव्यांनी मूर्तीच बदलली असा एक प्रवाद त्या काळात प्रचलित होता. गॅझिटियरकारांनी असे काही घडले नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. मूर्ती सांधली आणि बदलली अशी दोन मते प्रचलित असताना त्यातील एक स्वीकारण्यासाठी आणि दुसरा नाकारण्यासाठी जेवढा बळकट पुरावा द्यायला हवा तितका ढेरे देत नाहीत. ते फक्त मूर्ती बदलली एवढेच सांगतात.

वस्तुस्थिती अशी आहे –

वरील दोन मतांचे प्रत्यंतर पाहताना १८७३ पूर्वीच्या आणि नंतरच्या काही महत्त्वाच्या वस्तुस्थितीची नोंद घ्यावी लागते. त्या काळच्या कोणत्या वर्तमानपत्राचे काय मत होते एवढे पाहून या संबंधीचा उलगडा होणार नाही, या वस्तुस्थिती अशा – १. आजच्या विठ्ठलमूर्तीच्या पायावर डोके ठेवता येते. पायांना मिठी मारता येत नाही, कवटाळता येत नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेताना पूर्वी मूर्तीच्या पायांना मिठी मारता येत असे किंबहुना ही दर्शनपद्धती हे विठ्ठल सांप्रदायाचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य होते. संत तुकाराम महाराज म्हणतात नाही आडकाठी। तुका म्हणे जाता भेटी॥ न बोलता मिठी । उगाच पायी घालावी॥ अर्थात या उक्तींचा उपयोग ऐतिहासिक पुरावा म्हणून करता येईल का, अशी शंका कोणी उपस्थित करील. सुदैवाने ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे. तो म्हणजे सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी. या रोजनिशीत पंढरपूर येथील कमाविसदार चिं. तो रामचंद्र यांस पाठविलेली सात कलमी याद आहे. पहिल्याच कलमाने भक्तास देवाला भेटण्याची बंदी केलेली असून, फक्त मस्तक ठेवून नमस्कार करण्यास सांगितले आहे. (३।२७६) यावरून पूर्वी मूर्तीच्या पायाला मिठी घालण्याचा प्रघात संपुष्टात आला. याला कारण मूर्तीला आधार देण्यात आल्याने मिठी मारण्यासाठी आवश्यक असणारा अवकाशच नष्ट झाला.

२. १८७३ पूर्वी जे सिंहासन अस्तित्वात होते त्याचा पुढील बाजूने विस्तार करण्यात आला. हेतू हा की कोणाला सहजासहजी मूर्तीच्या एकदम जवळ जाऊन काही अपकृत्य करता येऊ नये. ३. मूर्तीचा पाय दुखावल्याने आणि मूर्तीच्या पायाला पाठीमागून आधार दिल्याने अवकाशाचा प्रश्न उपस्थित झाला. पायाला मिठी मारण्यास वाव राहिला नाही. याच कारणामुळे अन्य काही रचनात्मक बदलही करावे लागले, ते असे – (अ) पूर्वी देवावर छत्री होती ती काढून टाकण्यात आली. (ब) पूर्वी पाच फण्यांचा सर्प, तीन मोर व्याघ्र इत्यादींनी युक्त असलेली मोठी पीठिका ऊर्फ प्रभावळ होती, तीदेखील काढली. हल्ली जी प्रभावळ दिसते ती नंतरची असून पूर्वीच्या प्रभावळीपेक्षा लहान आहे. ४. १८७३ पूर्वी मूर्तीला केशर स्नान घालताना साखरेने चोळल्यानंतर गरम पाण्याने धुवून काढण्यात येई. त्यानंतर गरम पाण्याऐवजी गार पाणी वापरण्यात येऊ लागले. कारण की गरम पाण्याने (काही रासायनिक प्रक्रिया होऊन) मूर्तीची जी सांधेजोड केली होती तिला धक्का पोहोचण्याचा संभव जास्त होता. १८७३ पूर्वीची स्थिती आणि तद्नंतरची स्थिती यामध्ये हा एवढा फरक आहे. मूर्ती बदलली असती तर एवढा फरक होण्याचे कारण नव्हते. पूर्वीचीच मूर्ती दुरुस्त करून बसविली असणे जास्त संयुक्तिक वाटते. माझ्या लहानपणी देहू गावी श्रीमती बापट नावाच्या बालविधवा बाई राहत, पाच एक वर्षांपूर्वी त्या नव्वदी गाठून मरण पावल्या. त्या चांगल्या सुशिक्षित असून, एका शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका होत्या. विठोबाची मूर्ती भंगली असता आपल्या एका जवळच्या नातेवाईकाने ती दुरुस्ती केली, असे त्या अभिमानाने सांगत, हे मला चांगले आठवते.

साधक-बाधक पुराव्याकडे दुर्लक्ष

परंतु असल्या कोणत्याही साधक-बाधक पुराव्याचा विचार न करता ढेरे येथे धर्मशास्त्राचा आधार घेतात. धर्मशास्त्रानुसार भग्न मूर्ती पूजेचा विषय होऊ शकत नाही. तिचे विसर्जन करून नवी मूर्ती बसवावी लागते. असा धर्मशास्त्राचा दंडक आहे. (महासमन्वय, १४९- १५०) त्यामुळे बडव्यांनी १८७३ च्या प्रकारानंतर पूर्वीची मूर्ती विसर्जित केली आणि नंतर आजची मूर्ती बसविली असे ते सूचित करतात. आता याच पुस्तकाच्या १३५- १३६ पृष्ठावर डॉ. ढेरे काय म्हणतात ते पाहा ? “आज विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांत जे गणेशासहित अष्टमातृकांचे दोन शिल्पपट, नवग्रहपट म्हणून पूजिले जात आहेत, त्यांपैकी शनि मंदिरातील एक शिल्पपट पूर्वी रुक्मिणी मंदिरात होता. बडवे उत्पात संघर्षात तो रुक्मिणी मंदिरातून हलविण्याचा निर्णय झाला तेव्हा तेथून तो उखडीत असताना फुटला आणि तरीही तशाच भग्न स्थितीत त्या शिल्पपट्टाचे दोन खंड सिमेंटने जोडून दिले. या भग्न मातृकपट्टाचे नवग्रह म्हणून दर्शन पूजन करताना कोणाही दर्शनार्थीने असमाधान व्यक्त केलेले नाही.

श्रद्धेचे, भावनेचे विश्व वेगळे आहे त्या श्रद्धामय दृष्टीने भारलेल्या अवस्थेत दर्शन घेत असताना या बाह्य बाबींचे भान उरत नाही याची मला पुरेपूर जाण आहे.” डॉ. ढेरे यांच्यासारख्या मातब्बर संशोधकाने धर्मशाखांचे दंडक फक्त विठोबालाच दाखवावेत. श्रद्धेचे, भावनेचे विश्व वेगळे आहे. याची जाण त्यांना फक्त नवग्रहपट्टाच्या बाबतीत व्हावी आणि त्यामुळे पूर्ण दुभंगलेले नवग्रहपट्ट सिमेंटने जोडण्याची ‘विक्रमगाथा’ त्यांनी स्वीकारावी; परंतु विठोबाच्या बाबतीत त्याच्या फक्त पायाला गेलेला तडा सांधला असल्याचे कोणी सांगितल्यास त्यांना तो ‘स्वार्थरक्षणाचा बनाव’ वाटावा याचे आश्चर्य वाटते.

वृत्तपत्रांचे संदर्भ देण्यात गफलत

‘महासमन्वया’तील ‘श्री विठ्ठल आणि ख्रिस्ती धर्मप्रसारक’ या प्रकरणात डॉ. ढेरे यांनी ‘दंभहारक’ या तत्कालीन मासिक पत्राच्या पुस्तक २, अंक १०, ता. २५ जुलै १८७३ च्या अंकाचा संदर्भ दिलेला आहे. अर्थात या संदर्भाचा बडव्यांनी मूर्ती बदलली हे सिद्ध करण्यासाठी काहीएक उपयोग होत नाही. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी वरील अंक पाहिला पण त्यात मला डॉ. ढेरे यांनी उद्धृत केलेला मजकूर आढळला नाही. २० जुलैला मूर्तीला इजा होणे, नंतर लगोलग ‘ज्ञानप्रकाश’, सुबोधपत्रिका या पत्रांनी विठ्ठलाची हेळणा करणे आणि २५ जुलैला दंभहारकाने त्यांचा समाचार घेणे एवढी गतिमानता भारतीय पत्रकारितेला एकोणिसाव्या शतकात कधी आली? संदर्भ देण्याच्या बाबतीत डॉ. ढेरे यांची काही तरी गफलत झालेली दिसते. दंभहारकच्या या अंकाची व्याप्ती पृ. १८१ ते २०२ इतकी आहे आणि नंतर लागलीच अकराव्या अंकाची सुरूवात सलगपणे झालेली आहे. या अंकात अशी एक गोष्ट मात्र आहे की जी दुसऱ्या एका बाबतीत डॉ. ढेरे यांच्याविरुद्ध जाते. तत्कालीन मराठी कवी व सनातनी शास्त्री पंडिताचे अध्वर्यू विठोबा अण्णा हे १८७३ चा प्रसंग घडण्यापूर्वीच मरण पावले होते. त्यामुळे त्यांनी जे वर्णन केले ते तथाकथित बडवे प्रतिष्ठित विठ्ठल मूर्तीचे नसून आद्य मूर्तीचे असणार हे उघड आहे. या वर्णनात विशाल वक्षःस्थळ, कौस्तुभमणी, श्रीवत्सलांछन, त्रिवली अशांसारख्या वैशिष्ट्यांचे निर्देश आहेत. वक्षःस्थळावरील मंत्राचा नाही.

मूर्तीच्या छातीवर खरोखरच मंत्र होता काय?

विठ्ठलाच्या आद्यमूर्तीच्या बाबतीत डॉ. ढेरे ज्यांना सर्वात महत्त्वाचे साधन मानतात, त्या स्कांद पांडुरंग माहात्म्याची सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची एक हस्तलिखित प्रत नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त श्री. सुरेश जोशी यांच्याकडे पाहायला मिळाली. या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य असे की डॉ. ढेरे यांनी स्कांद माहात्म्यातील जो कूट श्लोक आचार्य वि. प्र. लिमये यांजकडून उलगडून घेऊन ‘कृष्णाय नमः’ या मंत्रमाळेचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य विशद केले, तो मंत्र त्याच्या समासातील उलगड्यासकट त्यात आहे. त्यामुळे आचार्य लिमये यांच्या वाचनाबद्दल कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही. प्रश्न असा आहे की, मूर्तीच्या छातीवर खरोखरच मंत्र होता काय आणि असल्यास कोणता होता, एकाही मराठी संताने या मंत्राचा उल्लेख केलेला नाही. या आक्षेपावर डॉ. ढेरे यांचे म्हणणे असे की संत मूर्तीकडे भावदृष्टीने पाहात होते, तरी पण आक्षेप उरतोच. मूर्तीच्या छातीवरील वत्सलांछन, कौस्तुभमणी, वैजयंतीमाला अशा गोष्टींचा संत वारंवार उल्लेख करतात. या सर्व गोष्टी त्यांच्या भावदृष्टीला बरोबर दिसाव्यात आणि नेमका मंत्रच दिसू नये असे का व्हावे? यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी ‘भावदृष्टी’ ही संकल्पना पुरेशी नाही. अर्थात संत सामान्य माणसाच्या डोळ्यांनी मूर्तीकडे पाहातच नव्हते. हा ढेरे यांचा समज चुकीचा आहे.

पुढीलप्रमाणे पाहा – १. तू विश्वरूप पटाची घडी। तारक ब्रह्माची उघडी।। मिया निजदृष्टीने चोखडी। तुझी मूर्ती न्याहाळिली।। (ज्ञानदेव) २. ते आम्ही देखिले चर्मचक्षू। दृष्टी उभे वाळवंटी पंढरीये॥ (नामदेव) आता डॉ. ढेरे यांना सावता माळ्याचा एक अभंग सापडला आहे. त्यात मंत्राचा उल्लेख आहे. पण हा अभंग सावता माळ्यांचा नाही हे स्पष्ट करण्यात त्याची संस्कृत प्रचुर भाषाच पुरेशी आहे. शिवाय तो उपलब्ध झालेला आहे. प्रसिद्ध श्री. झोडगे यांच्या संग्रहातून झोडगे यांच्या संग्रहाची विश्वसनीयता हाच मुळी एक संशोधनाचा भाग आहे हे सावित्रीबाईंच्या संदर्भात डॉ. मालसे यांनी उपस्थित केलेल्या वादाची ज्यांना माहिती आहे त्यांना वेगळे सांगायला नको,

संतांनी केला नाही छातीवरील मंत्राचा उल्लेख

स्कांद महात्म्यात काय आहे हे पाहण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अनुल्लेखांकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. विष्णुदास नामा, बहिणाबाई आणि महापती यानी स्कांद वा पादम माहात्म्यांच्या आधारे पंढरीवर रचना केल्या आहेत. पण ते मंत्राक्षरांचा उल्लेख करीत नाहीत. अमृतानुभवावर नित्यानंदी टीका लिहिणारे (इ. स. १६३५) शिवकल्याण हे पंढरपूरचेच. इतकेच नव्हे तर त्यांनी ही टीका पंढरपूर येथेच लिहिलेली आहे. पंढरीची विठ्ठलमूर्ती त्यांच्या नित्य दर्शनातील होती. त्यांनी या टीकेत विठ्ठलमूर्तीचे वर्णन करताना मंत्रमालेचा उल्लेख केलेला नाही. गळ्यातील सुमनमालेचा उल्लेख मात्र केलेला आहे. (१. ३९). तसेच प्रल्हाद महाराज बडवे घराण्यातलेच. (निर्याण शके १६४०) त्यांनी स्कांद माहात्म्याच्याच आधारे मराठीमधून पंढरी माहात्म्य लिहिले आहे. या गोष्टीचा उपयोग डॉ. ढेरे स्कांद महात्म्याची प्रामाणिकत शाबीत करण्यासाठी करतात. स्कांद माहात्म्य पुढे ठेवून त्याच्या आधारे मराठीत रचना करणारे प्रल्हाद महाराज मंत्राचा उल्लेख करत नाहीत, ही फार महत्त्वाची बाब आहे. शिवकल्याण किंवा प्रल्हाद महाराज यांचेवर भावदृष्टीचा आरोप करण्यात काही तथ्य नाही. दैवतेतिहास लिहिताना स्थळपुराणांना महत्त्वाचे साधन मानले पाहिजे हे ढेरेंचे म्हणने बरोबर आहे. स्कांद महात्म्य हे पंढरसंबंधीचे अतिप्राचीन महत्त्वाचे साधन आहे. हे सिद्ध करण्यासाठी डॉक्टरांनी बरीच मेहनत घेतली आहे. आपण त्यांचे तेही मत ग्राह्य धरू. (अर्थात स्कांद महात्म्यातील चौथ्या अध्यायानंतरचे अध्याय प्रक्षेप असल्याची शक्यता मी माझ्या लेखात सूचित केली होती. पुढे डॉ. रा. पां. गोस्वामी यांनी तिला सप्रमाण दुजोरा दिला. डॉ. गोस्वामी यांचा लेख ढेरे यांच्या गौरवग्रंथात छापलेला आहे.)

पण याचा अर्थ असा होत नाही की, या महात्म्यांतील सर्व माहिती जशीच्या तशी स्वीकारावी. तारतम्याचा म्हणून काही भाग असतोच की नाही? स्कांद माहात्म्य ज्याप्रमाणे मंत्रमाला असल्याचे सांगते त्याप्रमाणे विठ्ठलाच्या हातात गदा व खड्ग असल्याचेही सांगते. (१. ४६) डॉ. ढेरे या गोष्टीचा चकार उल्लेख करीत नाहीत. तसेच अद्यापही वैशिष्ट्य पाहायला मिळते. अशा अर्थाची स्कांद माहात्म्यातील वाक्ये उद्धृत करून ढेरे, महात्म्याने वर्णिलेली लक्षणे प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञात झालेली असल्याने ती खरोखर अस्तित्वात असली पाहिजे, असे वारंवार सांगतात. आता स्कांद माहात्म्यातील पुढील उल्लेख पाहा आणि ठरवा की हे सारे परमार्थतः घ्यायचे का – १. अद्यापही तेथे धूप आणि धूर दिसतो. (८.७७) २. अद्याप रात्री ‘जय’ शब्द ऐकू येतो. (८.७७) ३. अद्याप रात्री देवांनी केलेला घंटानाद ऐकू येतो. (६.५२) माहात्म्ये असेच म्हणणार की हे फक्त पुण्यवान लोकांनाच शक्य होते. एकूण काय की स्थलपुराणांमधील कोणती वचने परमार्थतः घ्यायची, कोणती प्राधान्याने घ्यायची, कोणती गौणत्वाने घ्यायची याची काही कसोटी ठरविली पाहिजे, नाहीतर संशोधन म्हणजे कल्पितांचा खेळ होऊन बसेल.

देवाच्या छातीवर स्वतःचाच मंत्र कसा असेल?

माहात्म्याची प्रमाणितता शाबित करण्यासाठी करतात. स्कांद माहात्म्याने बहुतेक महत्त्वाच्या देवतांशी वेगवेगळे मंत्र जोडून दिलेले आहेत. १. दशाक्षरांच्या मंत्राची ब्रह्मपत्नी देवी (२.२७) २. एकाक्षर मंत्राची भुवनेश्वरी (२.३७) ३. बत्तीस अक्षरी मंत्राची क्षेत्रपाल (२.२५) ४. दशाक्षरी मंत्राची दुर्गा (२,३९) आता पांडुरंगाचासुद्धा असा एखादा मंत्र पाहिजेच. तो षडक्षरी (२.३०) मंत्र होय. हा मंत्र कोण जाणतो? अर्थात स्वतः श्री. विठ्ठलच! त्यामुळे तो गुप्त असा मंत्र आहे. (११.७०) षड्बीज तो मंत्र हृदयी धरी राजीव नेत्र। जाणती योगी पवित्र परम गुह्य असे तो।। श्रीधरस्वामीकृत पंढरी माहात्म्य. (३.७१) संस्कृतमध्ये आत आणि वर या दोहोंसाठी जी सप्तमी विभक्ती वापरतात तिचा प्रत्यय सारखाच असतो. त्यामुळे आणि ‘हृदय’ शब्द वक्षवाचक असल्याने हृदयातला मंत्र वक्षावर आला तर त्यात नवल ते काय! पण जेव्हा हा टप्पा गाळला जातो तेव्हा एका साध्या सरळ प्रश्नाचा विसर पडतो की देवाच्या छातीवर त्याचा स्वतःचाच मंत्र कसा असणार? विठ्ठल स्वतःचाच जप करीत बसतो की काय? (ॲरिस्टॉटलचा ईश्वर स्वतःचे चिंतन करतो, पण तो मूर्तिभान नाही). मारुतीच्या हृदयात रामाची प्रतिमा असायची म्हणे येथे विठ्ठलाच्या छातीवर विठ्ठलाचाच मंत्र.

देव म्हणजे कोणी नार्सिसरा असतो की काय? स्कांदमाहात्म्य आणि पाद्म माहात्म्य या मंत्राच्या वेगवेगळ्या हकिगती देतात. स्कांद महात्म्यात बलराम पंढरपूरला येतो तेव्हा त्याला मंत्राक्षरे दिसतात तर पादम माहात्म्यात स्वतः बलराम मंत्राक्षरे कोरतो! मंत्राची आणखी गंमत तर पुढेच आहे या मंत्राचा संबंध पुत्रप्राप्तीशी आहे. रुक्मिणीने हा मंत्र जपला तेव्हा तिला प्रद्युम्न झाला. (११-८४) शंकर नारदाला उपदेश करतात : तेव्हा नारदा तू देखील हा मंत्र जप (११.८५). म्हणजे आता नारदाला लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे. ज्या चांगा केशवदासाला हा षड्क्षर मंत्र मिळाल्याचा उल्लेख डॉ. ढेरे करतात (महासमन्वय १२८१२९) त्या चांगा केशवदास किंवा मुधेश यानेही या मंत्राच्या जोरावर एका विधवा स्त्रीला पुत्रप्राप्ती करून दिल्याचा उल्लेख मिळतो. (पाहा शामजी गोसावीकृत ‘चांगा मुधेशचरित्र. असो.)

मंत्राच्या संदर्भात काही तथ्ये – स्कांद आणि पाद्म माहात्म्ये गृहीत धरली असता मंत्राच्या संदर्भात काही तथ्ये मिळतात आणि काही तार्किक निष्पत्ती मिळतात. १. सर्वत्र मंत्र षड्क्षर असल्याचे म्हटले आहे. २. परंतु स्कांद माहात्म्यात प्रत्यक्ष षड्क्षर मंत्र नसून ‘श्रीकृष्णाय नमः या मंत्राचे कूटतेने वर्णन करणारा बत्तीस अक्षरी श्लोक आहे.’ डॉ. ढेरे यांनी महाराष्ट्र टाईम्समधील लेखात तो उद्धृतही केला आहे. ३. हाच कूट श्लोक माढा येथील मूर्तीवर कोरलेला आहे. ४. परंतु पाद्म माहात्म्यातील कूट श्लोक वेगळाच आहे. इतकेच नव्हे तर असे दोन कूट श्लोक पाद्म माहात्म्यात आलेले आहेत. (८.४-७, २७.१०-१२ ) ५. आता विठ्ठलमूर्तीच्या वक्षावर खालीलपैकी एक आणि फक्त एकच गोष्ट असू शकेल – अ. खुद्द षड्क्षरी मंत्र, ब. स्कांद माहात्म्यातील कूट श्लोक, क. पाद्म माहात्म्यातील कूट श्लोक, ड. पाद्म माहात्म्यातील दुसरा कूट श्लोक ६. जर खुद्द षड्क्षर मंत्रच मूर्तीवर कोरलेला असेल तर या प्रत्यक्षदृश्य मंत्राचे कूटतेने वर्णन करण्यात माहात्म्यांनी काय साधले याचे स्पष्टीकरण करता आले पाहिजे.

७. षड्क्षर मंत्राचे कूटतेने वर्णन करण्यात काही गैर नाही असे गृहीत धरले तर ज्या मंत्राचे कूटतेने वर्णन करण्यात आले तो एकच एक (कृष्णाय नमः) असल्याने पाद्म माहात्म्यातल्या कूट श्लोकातूनही तोच मंत्र निष्पन्न व्हायला पाहिजे ही गोष्ट उघड आहे. पण समजा दुसराच मंत्र निघाला तर तो पाद्म माहात्म्यकाराच्या अज्ञानाने, असे म्हणून (महासमन्वय, पृ. १३३) ढेरे यांना आपल्या सिद्धांताचा जणू विमाच उतरून ठेवला आहे. पण मंत्र धडधडीत उघड्या डोळ्यांना दिसणारा होता तर मग असे अज्ञान उत्पन्न झाले कसे? ८. मूर्तीवर षडक्षर मंत्र नसून कूट-श्लोक होता असे मानताच येत नाही. कारण मग स्कांद माहात्म्यात एक श्लोक पाद्म माहात्म्यात दुसरा (व तिसराही) श्लोक असे कसे ? परत ढेरे म्हणणार की, पाद्म माहात्म्यकाराच्या अज्ञानाने परत तोच आक्षेप घेता येतो. प्रत्यक्ष कूटश्लोकाच्या बाबतीत असे अज्ञान कसे निर्माण झाले?

माढ्याची मूर्ती आद्य नसल्याचे डॉ. ढेरेंना मान्य

माढे येथील विठ्ठलमूर्ती आद्य नाही हे डॉ. ढेरे यांनी आता मान्य केलेले आहे; परंतु तरीसुद्धा माढ्याची मूर्ती आद्य विठ्ठलमूर्तीची प्रतिकृती असल्याने ती समोर ठेवून म्हणजे प्रमाणभूत मानूनच आद्य मूर्तीचा शोध घ्यायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे. माझे इथपर्यंतचे विवेचन विचारात घेतले असता असे समजून येईल की महात्म्यांच्या वर्णनावर विसंबून राहिले असता विसंगत निष्कर्ष निघतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की एका बाजूने डॉ. ढेरे माहात्म्यांमधील वर्णन प्रमाण मानून त्यानुसार आद्य मूर्तीवर संस्कृत कूटमंत्र असल्याचे सांगतात. दुसऱ्या बाजूने लोककथांवरून विठ्ठल हा मुळात धनगरांचा लोकदेव असल्याचे प्रतिपादन करतात. आता विठ्ठल हा खरोखरच लोकदेव असेल तर त्याच्या छातीवर संस्कृत कूटश्लोक कसा काय आला? म्हणजेच ढेरे एकाचवेळी स्थळपुराणे आणि लोककथा या दोघांचेही साधन म्हणून उपयोग करीत आहेत. तत्त्वतः त्यात गैर काहीच नाही. पण डॉ. ढेरे या दोन्ही साधनांना एकाच पातळीवरून वागवतात. इतकेच नव्हे तर सोयीनुसार कधी स्थळपुराणांचा तर कधी लोककथांचा उपयोग करीत आहेत.

पद्धतीशास्त्रांचा विचार केला तर हे चूक आहे. स्कांद माहात्म्यानुसार बनविलेली मूर्ती पॅरिस येथील स्टँडर्ड मीटरप्रमाणे अधिकृत प्रमाणपट्टी ठरत नाही असे मी म्हणतो ते यासाठी की केवळ माहात्म्यामध्ये वर्णन सापडले आणि माढ्याला तशी मूर्ती सापडली. एवढ्याने माढ्याची मूर्ती प्रमाण ठरत नाही. माढ्याची मूर्ती ही आद्य विठ्ठलमूर्ती समोर ठेवून तिच्यावर हुकूम बनविलेली आहे असे म्हणता येणार नाही. म्हणता एवढेच येते की ती स्कांद माहात्म्यातील विठ्ठलमूर्तीच्या काही लक्षणांशी मिळतीजुळती आहे. ही लक्षणे आद्य मूर्तीच्या शरीरावर खरोखरच अस्तित्वात होती असे विधान करता येत नाही. माहात्म्यांचे स्वरूपच असे विधान करू देत नाही.

मिथकांची गफलत

षड्क्षरी मंत्राच्या मुळाशी एक मोठाच घोटाळा आहे. अर्थात असा घोटाळा होण्यात अस्वाभाविक असे काही नाही. माणसाची भाषा हीच कित्येकदा अशा घोटाळ्याचे उगमस्थान असते. सप्तमी विभक्तीमुळे आत आणि वर या कल्पनांमध्ये होणाऱ्या गफलतीबद्दल मी अगोदर लिहिलेच आहे. तिच्या बरोबरीची आणखी एक गफलत म्हणजे मिथकांची निर्मिती (Myth या इंग्रजी शब्दाला मला योग्य तो पर्याय मराठीत सापडत नसल्याने मी तोच शब्द वापरीत आहे.) मिथ ही भाषेमधील म्हणजेच एक भाषिक, निर्मिती आहे. पुष्कळदा मिथ ही स्पष्टीकरणात्मक असते. एखाद्या वस्तूचे स्वरूप असेच का याचे स्पष्टीकरण Explainatory Myth च्या साह्याने करण्यात येत असते. डॉ. ढेरे यांनी हे योग्य प्रकारे सांगितले आहे. पण काही वेळा मिथला अनुसरून तिच्यावर हुकूम वस्तुनिर्मिती सुद्धा केली जाते. उदाहरणे खूप देता येतील. पण पंढरपूरच्याच संदर्भातील उदाहरण देणे उचित ठरेल. वर उल्लेख केलेले प्रल्हाद महाराज बडवे यांच्याबद्दल अशी एक मिथ सांप्रदायिकांमध्ये प्रचलित आहे की, एकदा प्रल्हाद महाराजांनी रात्री मंदिर निर्मनुष्य झाल्यावर भजनाचे स्वर ऐकले. हे भजन कोठून ऐकू येत आहे हे पाहण्यासाठी ते आत गेले. पाहातात तर स्वतः पांडुरंगच गळ्यात वीणा घेऊन ‘ज्ञानोबा तुकाराम’ असे भजन करीत आहे. पंढरपुरात मध्यंतरी जे रुंदीकरण झाले त्यात प्रल्हादमहाराजांच्या वाड्याचा भागही पाडला गेला. तेथे एक मूर्ती आढळली. मूर्ती तशी अलिकडचीच आहे. पांडुरंग गळ्यात वीणा घेऊन भजन करतो आहे अशी ही मूर्ती आहे. म्हणजे वारकऱ्यांच्यात प्रचलित असलेल्या ‘ज्ञानोबा तुकाराम’ या भजनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः पांडुरंगच ते भजन करतो अशी मिथ निर्माण झाली आणि त्या मिथने वत्सावतार धारण केला. मंत्राची कथाही यापेक्षा वेगळी नाही.

मंत्राची मिथ व वस्तू यांच्यातील या घोटाळ्याचा उलगडा होऊ शकतो. याचे श्रेय श्रीधरस्वामी नाझरेकर यांच्याकडे जाते. श्रीधरस्वामी हे वास्तविक डॉ. ढेरे यांनी उभे केलेले साक्षीदार, परंतु ते विरुद्ध गेले आहेत. श्रीधरस्वामींनी पाद्म पांडुरंग माहात्म्याच्या आधारे पंढरी माहात्म्य लिहिले आहे. हे लिहिताना त्यांनी स्कांद पांडुरंग माहात्म्याचेही अवलोकन केलेले होते. हे त्या माहात्म्याच्या उल्लेखावरून सिद्ध होते. (२६:२६) आपल्या ग्रंथात श्रीधरस्वामींनी मंत्राचा उल्लेख अनेकदा केलेला आहे. १. मुक्तमाला परिकर। तेथि मंत्रमाला षड्क्षर। मंत्रमुक्तावली एकसर। ते योगीश्वर जाणती॥ (२.८३) २. हृदयी षड्क्षर मंत्र। तेची मुक्तमाळ पवित्र।। (२६.७) या ओव्यांमधून श्रीधरस्वामी हे मंत्राक्षरांसाठी ‘मंत्रमाला’ हा शब्द वापरतात. आणि ही मंत्रमाला म्हणजेच मुक्तमाला असे ऐक्य सांगतात. वास्तविक श्रीधरस्वामींना मंत्रमाला हीच मुक्तमाला असे म्हणायचे नसून, मुक्तमाला हीच मंत्रमाला आहे असे म्हणायचे आहे. परंतु डॉ. ढेरे यांची उलटपालट करतात. इतकेच नव्हे तर, ‘केसरी’मधील पूर्वोक्त लेखाची मांडणी करताना त्यांनी मंत्रमाला या शब्दाचा वारंवार उपयोग केलेला आहे. तर ‘महासमन्वया’त तो शक्यतो टाळला आहे आणि त्याही पुढे जाऊन श्रीधरस्वामींनी हे वर्णन साक्षात पाहून केलेले आहे, की मूळ संस्कृतचे ते मराठीत केवळ अवतरण घडवीत आहेत हे स्पष्ट सांगता येत नाही. (पृ. १३८) अशी शंका व्यक्त केलेली आहे. खरे तर श्रीधरस्वामी हे पंढरपूरचेच रहिवासी. जवळजवळ ऐंशी वर्षाचे आयुष्य पंढरीत व्यतीत करून त्यांनी पंढरीतच देह ठेवला. असे असताना ढेरे यांना हा संशय का यावा ? हा संशय व्यक्त करून त्यांनी जणू साक्षीदार उलटल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलेली आहे.

मृगजळाचा शोध

श्रीधरस्वामी नुसतेच पंढरपूरमधील एक सर्वसामान्य क्षेत्रस्थ नव्हते, तर रामायण, महाभारत, भागवत अशा महत्त्वाच्या पारंपरिक ग्रंथांचे आलोकन केलेले अधिकारी पुरुष होते. किंबहुना त्यामुळेच त्यांनी मुक्तमाला हीच मंत्रमाला असे म्हटले आहे. त्यांच्यासमोर महाभारतातील सर्व संदर्भ स्पष्टपणे होते. महाभारतात भगदत्त वधाची कथा आलेली आहे. प्रागज्योतिषाधिपती भगदत्त आणि अर्जुन यांच्या युद्धात अर्जुनाने भगदत्ताचे धनुष्य तोडले. अशा निर्वाणीच्या वेळी अंतिम उपाय म्हणून भगदत्ताने आपला अंकुश वैष्णवास्त्राने मंत्रून अर्जुनावर फेकला. हे वैष्णवास्त्र भगवान कृष्ण वगळता त्रैलोक्यात कोणाचाही वध करू शकेल असे होते. म्हणून अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने स्वतः पुढे होऊन वैष्णवास्त्राने अभिमंत्रित झालेला अंकुश आपल्या छातीवर झेलला तेव्हा त्याचे रूपांतर वैजयंतीमालेत झाले. “वैजयन्त्यभवन्माला तदस्य केशवोरसि” (महाभारत द्रोणपर्व, २९.१८) कृष्णविषयक सर्व मिथ्स, विठ्ठल हा कृष्णच असल्याने त्याला लागू होतात त्यानुसार विठ्ठलाच्या गळ्यातही वैजयंतीमाला आहे. तिचा उल्लेख संत साहित्यात व माहात्म्यांतही अनेक ठिकाणी आढळतो.

वैजयंतीमालेत मोती, नीळ, माणिक, पुष्कराज व हिरा ही पाच रत्ने असतात. त्यातील मोत्यांमुळे मुक्तमाला असे तिला म्हणण्यात येते. आणि तिचा उगम मंत्रात असल्याने तिला मंत्रमाला असेही म्हणण्यात येते. या माळेतील पाच मणी हे जणू “कृष्णाय नमः” या मंत्रातील पाच अक्षरे होत. श्रीकार हे सहावे. कारण कूट श्लोकात फक्त पाचच अक्षरे गुंफलेली असून, श्रीकाराचा निर्देश स्वतंत्रपणे केलेला आहे. कदाचित कौस्तुभ मण्याचाही समावेश करून तो श्रीकाराच्या ठायी कल्पून या मंत्राला षड्क्षरी म्हटले असण्याची शक्यता आहे. श्रीधरस्वामींना मंत्रमालेने किंवा षडक्षरी मंत्राने छातीवर कोरलेली सहा अक्षरे अभिप्रेत नसून, कौस्तुभमण्यासह विराजमान असलेली वैजयंतीमालाच अभिप्रेत आहे. बाबा पाध्येसुद्धा ‘वक्षःस्थलगतमंत्र’ असा उल्लेख करतात, तेव्हाही त्यांना वक्षावरील अक्षरे अभिप्रेत नसून वक्षांतर्गत (म्हणजेच हृदयातील गुप्त) मंत्र (जैसे कंठगत, भूमिगत, हृद्गत) आणि त्याचे छातीवरील मिथकात्म सांकेतिक रूपांतर म्हणजेच वैजयंतीमाला अभिप्रेत आहे.

तात्पर्य विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला अगर मुक्तमाला ही वैष्णवास्यांच्या मंत्रामुळे निर्माण झालेली असल्याने तिला मंत्रमाला असे म्हणण्यात येऊ लागले, पण माढ्याच्या मूर्तिकाराला हा संकेत माहीत नसल्याने त्याने महात्म्यांच्या शब्दांच्या आहारी जाऊन व छातीवर खरोखरच अक्षरे कोरली आणि तीदेखील षडक्षरी मंत्राच्याऐवजी मंत्र ज्यात कूटतेने गुंफला आहे अशी बत्तीस श्लोकाक्षरे कोरली. ( त्याच्यापुढे स्कांद महात्म्याच्याऐवजी पाद्म महात्म्य असते तर त्याने दुसराच कूटश्लोक कोरला असता) आणि कळस म्हणजे मूर्तीच्या छातीवर श्रीवत्स या चिन्हाचा अथवा लांछनाऐवजी ‘श्रीवत्स’ अशी अक्षरे कोरली म्हणजे जेथे आकृती पाहिजे तेथे अक्षर आणि जेथे वैजयंतीमालेचाच मिथकात्मक संकेत म्हणून मंत्र मानायचे तेथेही अक्षरेच कोरली. सारांश भाषा, मिथ आणि वस्तू यांच्यासंबंधीच्या अज्ञानातून तयार झालेल्या मूर्तीला प्रमाणभूत मानून तिच्या आधारे डॉ. ढेरे जो आद्य मूर्तीचा शोध लावायला निघाले आहेत, तो मृगजळाचा शोध आहे. १६५९ पर्यंत हे मृगजळ पंढरपुरात दिसत होते. पुढे ते माढ्याला दिसू लागले. मग परत एकदा पंढरपुरात आणि इ. स. १८७३ च्या घटनेनंतर आता ते बडवे ज्या ठिकाणी भग्न मूर्तीचे विसर्जन करतात तेथे दिसू लागले आहे. आणि उद्या आणखी कोठे दिसेल हे आज सांगता येत नाही.

(पूर्वप्रसिद्धी : स्वराज्य दि. ७ जुलै १९८४)

लेखक : ह. भ. प. प्रा. डॉ. सदानंद मोरे

मो . नं. ९८२२८३२८९६ (लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

लेख सौजन्य : वारकरी दर्पण मासिक (जुलै २०२२)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *