महाराष्ट्राच्या बाहेरही प्रभाव

असणारे संत सेना महाराज

सेना न्हावी भक्त भला।
तेणें देव भुलविला॥
अशी संत जनाबाई यांनी ज्यांची महती गायली आहे, त्या संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी. सेना महाराजांचा जन्म नेमका कोठे झाला याबाबत संशोधकांमध्ये मतमतांतरे आहेत. पंजाब, मध्यप्रदेश, गुजराथ, राजपुताना अशी त्यांची वेगवेगळी जन्मस्थळे सांगितली जातात. तसेच ते पूर्णपणे मराठी असून त्यांचे वास्तव्य मुख्यतः महाराष्ट्रात होते, असे संशोधकांचे मत आहे.

संत सेना महाराजांचा काळ शके १२०० ते १२८० (इसवी सन १२७२ ते १३५८) असा सांगितला जातो. त्यांच्या वडिलांचे नाव देविदास आणि आईचे नाव प्रेमकुंवरबाई, याशिवाय अजूनही दोन नावांचा उल्लेख काही चरित्रकारांनी केलेला आहे. कुटुंबात धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासूननच संत सेना महाराजांना ईश्वरभक्तीची गोडी लागली. वडिलांसोबत मंदिरात दररोज जाणाऱ्या सेना महाराजांनी अनेक पौराणिक कथा, कीर्तने ऐकली. त्यामुळे मोठेपणी त्यांनी लिहिलेल्या अनेक अभंगांमध्ये पौराणिक कथांचे संदर्भ आलेले दिसतात.

सेना महाराजांच्या जीवनातील एक कथा मात्र सर्वच चरित्रकारांनी सांगितली आहे. सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. १३ व्या शतकात रेवा संस्थानामधील वाघेला रजपूत वंशाचे राजे राज्य करीत होते. आजच्या मध्यप्रदेशात रेवा संस्थानचा समावेश होतो. या संस्थानात बांधवगड नावाचा कैमूरच्या डोंगरावर किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे रेवा संस्थानची राजधानी होती. येथील वाघेला वंशातील महाराजा रामसिंह राज्य करीत होता. या राजाची हजामत करण्याचा मान सेना महाराजांच्या घराला होता. आपले काम कर्तव्यबुद्धीने करणारे सेना महाराज देवाच्या चिंतनात रमलेले असे. एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तेव्हा सेना महाराज ईश्वरचिंतनात दंग झाले होते. त्यामुळे बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले, मात्र प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. संत जनाबाईंनीही आपल्या अभंगात हा प्रसंग सांगितला आहे. पंढरपूरच्या संतमेळ्यात सेना महाराज रमून गेले होते.

संत सेना महाराज महाराष्ट्रीय, की महाराष्ट्राबाहेरचे याबाबत मतभेद आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषांमध्ये अभंगरचना केली आहे. संत सेना महाराज आयुष्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतामध्ये गेले असावेत. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी, असाही मतप्रवाह आहे. याचा अर्थ संत नामदेवांप्रमाणेच संत सेना महाराज महाराष्ट्रातून उत्तर भारतात गेले आणि तेथे त्यांनी हिंदी, मारवाडी, पंजाबी भाषेतील अभंगरचना केली. शिखांचा धर्मग्रंथ, गुरुग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथात संत सेना महाराजांच्या एका पदाचा समावेश केलेला आहे. स्वामी रामानंदांच्या १४ शिष्यांपैकी सेना महाराज एक होते. परंतु सेना महाराज आपल्या गुरूंनी सांगितलेल्या राम सीतेच्या भक्तीऐवजी पुढे पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करू लागले. उत्तर भारतातील हिमाचल प्रवेश, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांमध्ये फिरून संत सेना महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा प्रसार केला. उत्तर काळातील उत्तर भारतातील संत कबीर, संत मीराबाई, नरसी मेहता, नानकदेव यांनी आपल्या रचनांतून संत सेना महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

पंढरपुरात आल्यावर त्यांची संत नामदेवांची भेट झाली. महाराष्ट्रात गेल्यावर ज्ञानदेवादी भावंडांची भेट होईल, असे त्यांना वाटले होते. पण तोपर्यंत या चारही भावंडांनी समाधी घेतली होती. मग सेना महाराज या भावंडांनी जिथे समाधी घेतली त्या गावांना म्हणजे त्र्यंबकेश्वर, जळगाव, आळंदी, सासवड या गावी गेले. तेथे या विभुतींचे दर्शन घेऊन सेवा केली. तीर्थमाहात्म्य अभंगातून त्यांनी या संतांचे आणि त्यांच्या स्थानांचे वर्णन केले आहे. पंढरी आणि पांडुरंगाचा महिमा त्यांनी आपल्या अनेक अभंगांमधून व्यक्त केला आहे. त्यापैकी ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।’ हा पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग प्रसिद्ध आहे. नाममहिमा, विठ्ठलाविषयी, आत्मपर, संतांविषयी, उपदेशपर, व्यवसायाविषयी, तीर्थमाहात्म्य, पाखंडाविषयी अशा विषयांवर सेना महाराजांनी अभंगरचना केली आहे. सध्या त्यांचे २५७ अभंग उपलब्ध आहेत. त्यात अभंग, ओवी, गवळणी, विराण्या, पाळणा, आरत्या आणि भारूडे या काव्यप्रकारांचा समावेश आहे. संत नामदेव, संत जनाबाई आणि कुटुंबीयांनी पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या पायरीशी घेतलेल्या समाधीच्या वेळी संत सेना महाराज उपस्थित असावेत, असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्यांनी संत नामदेवांची आरती लिहिली आहे.

संत सेना महाराजांच्या समाधीचेही नेमके वर्ष उपलब्ध नाही. अभ्यासक पां. ना. कुलकर्णी यांनी त्यांचे समाधीचे वर्ष साधारणपणे इसवीसन १३५८ असावे असे म्हटले आहे. श्रावण वद्य द्वादशी या दिवशी सर्वत्र सेना महाराजांची पुण्यतिथी पाळली जाते. सेना महाराजांची नाभिक ज्ञातिबांधवांनी त्यांच्या स्मरणार्थ अनेक ठिकाणी मठ, मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या आहेत. बांधवगड येथे त्यांच्या स्मरणार्थ राजा वीरसिंहाने एक भव्य समाधी मंदिर बांधले होते. आज ढासाळलेल्या बांधवगडावर सेना महाराजांचे समाधीस्थळ एका चबुतऱ्याच्या स्वरुपात उरले आहे. संत नामदेवांप्रमाणे उत्तर भारतात भ्रमण करून समता, बंधुभावाचा विचार रुजविणाऱ्या संत सेना महाराजांना त्यांच्या पुण्यतिथिच्या निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published.