माऊलींचा पालखी सोहळा

पोहोचला वेळापूर मुक्कामी

वेळापूर : पंढरीच्या वाटचालीत होणारे गोल रिंगण, धावा आणि भारुडे यांचा आनंद आज (दि. ६) एकाच दिवशी लाखो वारकऱ्यांनी लुटला. माळशिरसहून सकाळीच मार्गस्थ झालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रात्री वेळापूर मुक्कामी स्थिरावला. उद्या (दि. ७ जुलै) सकाळीच पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.

खुडूस शिवारात रंगले रिंगण

सकाळी साडेसहा वाजताच माळशिरसहून निघालेला पालखी सोहळा दुसर्‍या गोल रिंगणासाठी सकाळी साडेनऊ वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात बाळासाहेब चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरुवात झाली. सकाळी साडेदहा वाजता माऊलींचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. पुरंदावडे येथील नेत्रदिपक दौडीनंतर अश्‍वांनी आजही पानीव पाटी येथे नेत्रदिपक दोन फेर्‍या पूर्ण करून लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्‍वानेही नेत्रदिपक दौड करून प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा संपला. त्यानंतर वारकरी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला.

माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत

खुडूस ग्रामस्थांचे भक्तीपूर्ण स्वागत स्वीकारून श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा दुपारी निमगांव मगराचे (पाटी) येथे पोहोचला. निमगांव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतीच्या वतीने येथे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. शंकरराव मोहिते सूत गिरणीच्या वतीने जयसिंह मोहिते-पाटील आणि सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांनी माऊलींची विधीवत पूजा करून दर्शन घेतले. शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, इकोबोर्ड इंडस्ट्रिज, पिसेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.

वेळापूर येथे प. पू. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस उर्फ आनंदमूर्ती यांच्या समाधी मठाजवळील स्वागत स्वीकारल्यानंतर पालखी सोहळ्याने वेळापूर हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विमल जानकर, उपसरपंच जावेद मुलाणी, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव माने देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख, ओंकार माने देशमुख, शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख यांच्यासह हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले आणि लाखो वैष्णवांचे उत्साही स्वागत केले.

तुका म्हणे धावा…

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीला जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले, अशी आख्यायिका आहे. आज रस्ता रुंदीकरणात ही टेकडी नाहिशी झाली असली तरी, वारकऱ्यांनी तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा।। हा संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून वारकऱ्यांनी धाव्याचा आनंद घेतला. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी येथील उंचवट्यावर गर्दी केली होती. चोपदारांनी अश्‍वानंतर एक एक दिंडी सोडली. त्यावेळी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत अबालवृद्ध वैष्णव पंढरी समीप आल्याने पंढरीच्या दिशेने धावत सुटले.

भारुडाने सोहळ्यात रंगत

संत एकनाथ महाराजांनी लोकसंस्कृती, लोककलाकारांची भाषा, रुपके संत साहित्यात आणली. त्यातून त्यांनी ‘जन खेळकर’ केला असे म्हणतात. नाथबाबांची ही परंपरा वारकरी वारीच्या वाटेवरही जोपासतात. लोकरंजनातून लोकशिक्षण देणारी नाथांची भारूडे धाव्यानंतर सादर केली जातात. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीसमोर जयसिंग मोरे यांच्या रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक तीनच्या वतीने इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ह. भ. प. लक्ष्मण महाराज राजगुरू यांनी ‘बुरगुंडा होइल तुला बुरगुंडा होइल’, ‘वेडी गं, बाय मी झाले वेडी’ ही भारूडे सादर केली. तर, ‘ऐका दादांनो व्होरा ऐका दादांनो’ हे भारूड माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील ह. भ. प. महादेव महाराज शेंडे यांनी सादर करून मनोरंजनातून प्रबोधन केले. सायंकाळी सात वाजता हा सोहळा समाजआरतीनंतर वेळापूर मुक्कामी विसावला. रात्री ठाकुरबुवांच्या वतीने पालखी तळावर कीर्तनाची सेवा सादर झाली.

वेळापूर येथे स. म. शंकरराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने माऊली भक्तांना अन्नदान करण्यात आले. आनंदमूर्ती पतसंस्था, मोरया गणेशोत्सव मंडळ, आनंदमूर्ती सेवा मंडळ यांच्या वतीने भाविकांना चहा आणि नाश्त्याचे वाटप करण्यात आले. अकलूज, वेळापूर, उघडेवाडी येथील बॅंक ऑफ बडोदा यांच्या वतीने शाखाधिकारी एजीएम निजासुरे, विजयराम, हनुमंत अहिर यांनी वारकऱ्यांना अन्नदान केले.

उद्या (दि. ७ जुलै) सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेऊन संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीचा सोहळा होणार आहे. त्यानंतर संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत चांगा वटेश्वर, संताजी महाराज जगनाडे, संत वसंत गडकर महाराज आदी संतांचे सोहळे टप्पा येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतील. माऊली आणि सोपानदेव पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचेल.

(फोटो : शिवराज तलवार, ओंकार आडत, वेळापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *