डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या

जिल्हा प्रशासनाला सूचना

मुंबई : कोरोनानंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने यंदा पंढरपुरात गर्दी होईल. सर्व भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. महिला भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. त्यासाठी ‘पंढरीची वारी’ या ‘ॲप’चा प्रभावी वापर करा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला आज (दि. ६ जुलै) दिल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज होणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाचा आराखडा, भक्त निवास आणि पंढरपूर शहराची स्वच्छता आणि नगरपालिकेचे प्रश्न चर्चिले गेले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, सामाजिक कार्यकर्ते सुनील उंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलापूरचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सोलापूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव, पंढरपूर देवस्थान समितीचे प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे पंढरीची वारी ॲप

पंढरीची वारी हे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेले ॲप हे महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड संदर्भातील नियम पाळण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्त्व देताना यावर्षीच्या वारीमध्ये आरोग्य दूत नेमण्यात आले आहेत. महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद अशा तीनही यंत्रणांचे नोडल अधिकारी नेमण्यात आले असल्याने वारीला येणाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यास मदत होईल. वारी काळात मंदिर परिसरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे निगराणी, गर्दीचे व्यवस्थापन अचूक होण्यासाठी विशेष युनिफॉर्म असलेले अधिकारी यामुळे या काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. वारीदरम्यान येथील स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन केंद्रावरील कचरा उचलणे, निर्माल्य वेळोवेळी उचलले जाईल याची सुध्दा काळजी घेण्यात यावी, अशाही सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

भाविकांशी सौजन्याने वागावे

यात्रा काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांशी तेथे नियुक्त सेवकांनी सौजन्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असून याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोविडचे संकट अजूनही संपले नाही. त्यामुळे मंदिरात भाविकांची खूप गर्दी होणार नाही, महिला भाविकांशी कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी आवश्यक ते सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले.

रुक्मिणी मंदिरात पंखे लावा

विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आता ९ आणि १० जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे तातडीने रुक्मिणी मंदिरात एक्झॉस्ट पंखे तातडीने लावण्यात यावेत. वारीसाठी मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी होत असल्याने मूर्तीची काळजीही घेण्यात यावी. तसेच मंदिर परिसरातील किरकोळ कामेही तातडीने करुन घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाच्या उपस्थितांना दिल्या.

तातडीची मदत पोहोचवा

या वारीसाठी आलेल्या भाविकांपैकी १६ वारकऱ्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यापैकी २ वारकरी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या वारकऱ्यांची काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी श्री. गोऱ्हे यांनी दिल्या. वारकऱ्यांसाठी शुध्द पिण्याचे पाणी, गॅस उपलब्ध करून देण्यासोबतच ठिकठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे उभी करावीत, महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, वेन्डिंग मशीन उपलब्ध करून द्यावीत, वारीदरम्यान ठिकठिकाणचा कचरा आणि मैला तातडीने उचलावा, वाळूउपशामुळे नदीपात्रात पडलेले खड्डे बुजवावेत आदी सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *