संत सोपानकाका मंदिरात
होणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
मुक्ताईनगर : श्री क्षेत्र सासवड येथे संत सोपानकाकांच्या समाधी मंदिरात त्यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांचे नूतन मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुक्ताबाईंचे समाधीस्थळ जळगावमधील मुक्ताईनगर येथून मुक्ताईंची सुंदर संगमरवरी मूर्ती रवाना करण्यात आली. या मूर्तीचे मोठ्या उत्साहात रविवारी (दि. २०) सासवडमध्ये स्वागत करण्यात आले.
लहानपणी संत मुक्ताईंचा सांभाळ बंधू सोपानकाका यांनी केला. त्याची आठवण म्हणून सासवडच्या संत सोपानकाका संस्थानाने देऊळवाड्यात संत मुक्ताबाईंचे नूतन मंदिर बांधले आहे. या मंदिरात या मूर्तीची दोन डिसेंबर रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, रविंद्र महाराज हरणे, सम्राट पाटील, लखन महाराज आदी मुक्ताबाईंची मूर्ती घेऊन सासवडला आले. मूर्ती रवाना करण्यापूर्वी महापूजा अभिषेक करून भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.
उत्पत्ती एकादशीच्या मुहूर्तावर देवस्थानच्या वतीने वाजत गाजत दिंडीसोबत नामघोषाच्या गजरात मूर्ती मंदिरात आणण्यात आली. सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी आईसाहेबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजा केली. यावेळी चोपदार सिद्धेश आणि ओंकार निरगुडे, विनायक जाधव आदी उपस्थित होते.