संवर्धनाच्या कामदरम्यान संरक्षणासाठी
विठ्ठल-रखुमाईला घातले काचेचे कवच
पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात सुरू असलेल्या कामाचा संसर्ग होऊ नये म्हणून आज (दि. १८) विठुरखुमाईच्या मूर्तींभोवती बुलेटप्रूफ काचेचे आवरण उभारण्यात आले आहे.
मूर्तींचे दीर्घकाळ संवर्धन व्हावे म्हणून गाभाऱ्यात काम सुरू झाले आहे. त्याअंतर्गत गाभाऱ्यातील, तसेच मंदिरातील चौखांबी, सोळखांबी या भागांतील पुरातन दगडी खांब आणि प्रवेशद्वारावर लावलेली चांदी नुकतीच काढण्यात आली.
दरम्यान आजपासून (दि. १८) गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. त्यापूर्वी देवतांच्या मूर्तींचे संरक्षण व्हावे यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीला बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात आले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिसरात सुमारे ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार रुपयांची विकासकामे निश्चित करण्यात आली आहेत. या कामांमध्ये मुख्य विठ्ठल मंदिरातील गाभारा, चार खांबी अर्धमंडप यांसाठी ५ कोटी ३ लाख ५८ हजार ३४ रुपये, रुक्मिणी मंदिरासाठी २ कोटी ७० लाख ५३ हजार ३१ रुपये, नामदेव पायरी आणि त्यावरील इमारतीचे नूतनीकरण ५ कोटी ५ लाख ५१ हजार ९७४ रुपये, महाद्वार आणि दोन्ही बाजूच्या पडसाळीसह विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी, चांदी काढण्यात येत आहे. ग्रॅनाइट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये, मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी बुलेटप्रूफ काच बसविण्यात आली आहे. हे काम आगामी आषाढी यात्रेपूर्वी करण्यात येणार आहे. यासाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. या काळात भाविकांना पदस्पर्श दर्शन होणार नसून केवळ मुखदर्शन सकाळच्या ठराविक वेळेत होणार आहे.
या कामांतर्गत मंदिराचे मूळ स्वरुप कायम ठेवून मूर्तींचे जतन, संवर्धन करण्यात येत आहे. मंदिरात लावण्यात आलेल्या चांदीचे कामही नव्याने करण्यात येणार आहे. मंदिरातील सर्व चांदी काढून, दुरुस्ती करुन पुन्हा बसविण्यात येणार आहे. काढलेली चांदी वितळवून आवश्यकतेनुसार त्यात भर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी समिती नेमण्यात येणार आहे. तसेच या सर्व कामाचे व्हिडिओ चित्रण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.