आळंदीत प्रस्थान सोहळ्याला आलेल्या

एकनाथ शिंदे यांचे नदी स्वच्छतेचे वचन

पुणे : आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या तोंडावर नदी केमिकलयुक्त पाण्याने पूर्ण फेसाळून गेली होती. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेची ग्वाही दिली आहे. आज (दि. २९) आळंदीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार यावर काम करत असल्याची माहिती वारकऱ्यांना दिली.

इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचे काम असून त्यावर काम सुरू झाले आहे. नगरविकास विभागाने ८०० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे निश्चितपणे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पंढरपूर वारी प्रस्थान सोहळ्याला येणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हजेरी लावली. मंदिरात माऊलींचे दर्शन घेतल्यावर ते इंद्रायणीच्या घाटावर नदी पाहणीसाठी गेले. त्यावेळी वारकरी आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

शेतकरी संकट मुक्त व्हावा, चांगला पाऊस व्हावा, तसेच राज्यातील जनतेच्या जीवनात आनंद, सुखसमृद्धी यावी, अशी माऊलींकडे प्रार्थना केल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार-आरफळकर, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह. भ. प राणा महाराज वासकर, ह. भ. प. संग्राम बापू भंडारे महाराज आदी उपस्थित होते.

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर आळंदीत इंद्रायणी नदीतील पाण्यावर रसायनमिश्रित फेस, तवंग आला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री यांनी त्याबाबत दखल घेतली. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषदेने विविध उपाययोजना हाती घेतल्या. पाटबंधारे विभागाला विनंती करून इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यास सांगितले. पाण्याच्या प्रवाहामुळे नदीतील तवंग वाहून गेला. त्यामुळे वारकऱ्यांना नदीत स्नान करणे शक्य झाले.

प्रदूषणामुळे इंद्रायणीतील मासे आणि इतर जलचर मृत्यूमुखी पडण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बटवालवस्ती आणि कुदळवाडी नाल्यातून रसायन मिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषित झाल्याने नदीला फेस येतो. तीर्थ म्हणून हे प्रदूषणयुक्त पाणी प्यायल्याने अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे अनेक संस्था, संघटना, वारकरी आणि आळंदीकरांनी हे प्रदूषण रोखण्याची मागणी केली आहे.

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासनाने इंद्रायणी सुधार प्रकल्पाचा ५७७ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल ऑगस्ट २०२३मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर केला. त्याला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार इंद्रायणी नदीच्या तीरावरील एकूण ४८ गावांमधील पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घातल्याने पवित्र इंद्रायणी नदी कायमस्वरूपी स्वच्छ होईल, अशी आशा आळंदीकर आणि वारकऱ्यांना वाटू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *