मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे;

करणार विठ्ठलाची महापूजा 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली, की आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री म्हणून कोण करणार, अशी चर्चा सुरू होते. यंदाही गेले काही दिवस ही चर्चा सुरू होती. तिला आता पूर्णविराम मिळाला असून शिवसेनेचे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून आषाढीला महापूजा करतील हे स्पष्ट झाले आहे.

शिंदे यांनी ५० आमदारांसोबत केलेल्या सुमारे १० दिवसांच्या बंडाची अखेर आज (दि. ३० जून) राजभवनावर झाली. सायंकाळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित केले.

अखेर शिवसेनेचाच मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. काही दिवसांपूर्वीच पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते. तर, आमदारांचे बंड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा सपत्निक महापूजेला येतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण भाजपने हे सर्व अंदाज साफ चुकवत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना संधी दिली आहे. शिवाय आमचीच शिवसेना खरी आहे, असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे अखेर शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीच्या महापूजा होत आहे अशी चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली आहे.

महापूजेची परंपरा ब्रिटीश काळापासून

उभ्या मऱ्हाटी मुलुखाचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीची महापूजेची परंपरा ब्रिटिश कालावधीपासून सुरू आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी ही महापूजा करत असत. त्यासाठी ब्रिटिशांकडून दोन हजार रुपयांचे वार्षिक अनुदानही दिले जात असे. त्याहीपूर्वी १८४० च्या दरम्यान विठ्ठलपुजेचा मान सातारा गादीकडे असल्याचे संदर्भ आहेत. पेशवाईत थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती नियुक्त स्थापन केली, या समितीमार्फत पूजा केली जात असे, असेही सांगितले जाते.

पुढे संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर या प्रथेत थोडा बदल झाला. ही पूजा महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या हस्ते होऊ लागली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीची पहिली महापूजा केली. १९६३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना, तर १९७७ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना ही महापूजा केली. पुढे या पूजेवरूनही मानपान होऊ लागले. १९९५ मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही महापूजा शासकीय पूजा म्हणून जाहीर केली. त्यानंतर ही महापूजा फक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ लागली.

सर्वाधिक वेळा मान विलासरावांना

आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय महापूजेचा मान काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. त्यांना तब्बल सहा वेळा मान मिळाला. त्यांच्या खालोखाल शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा हा शासकीय महापूजेचा मान मिळाला.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी आषाढी वारी होऊ शकली नाही. त्यामुळे लाखो वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वारकऱ्यांशिवाय ही महापूजा करावी लागली होती.

गेले काही दिवस घडत असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रपती राजवट लागू होऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महापूजा केली जाईल, असाही अंदाज व्यक्त होत होता. कारण यापूर्वी एकदा शंकर दयाळ शर्मा आणि त्यानंतर दुसऱ्यांदा सी. सुब्रमण्यम या राज्यपालांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली होती. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली नव्हती. यावेळी मात्र या सर्व अंदाजांना एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

शासकीय महापूजेला विरोध

धर्मनिरपेक्ष राज्यात सरकारतर्फे पूजाअर्चा होणे योग्य नाही म्हणून १९७० मध्ये आंदोलन झाले होते. या आंदोलनाच्या अग्रभागी ज्येष्ठ नेते बाबा आढाव होते. बाबांना मोठा पाठींबाही मिळाला होता. परिणामी १९७१ मध्ये मंत्र्यांच्या हस्ते महापूजा झाली नाही. पुढे या आंदोलनाचा प्रभाव ओसरला.
त्यानंतरच्या पुढच्याच वर्षी राज्यात १९७२चा मोठा दुष्काळ पडला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने श्री विठ्ठलाची महापूजा बंद झाल्यामुळे दुष्काळ पडला, असे सांगत पुन्हा महापूजा सुरू करावी अशी विनंती केली. त्यानंतर १९७३ मध्ये महाराष्ट्र सरकारने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ताब्यात घेतले आणि मंदिरासाठी विशेष कायदा पास केला. त्यानुसार मंदिराचा कारभार सुरू झाला. १९७३, ७४, ७५ ला देवस्थानच्या पंचांनी आषाढीची महापूजा केली. १९७६ मध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर वसंतदादा पाटील, शरद पवार यांनीही हा शासकीय महापूजा केली. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी दोन वेळा शासकीय पूजा केली.

१९९६मध्ये मुंबईत रमाबाई आंबेडकरनगरमध्ये गोळीबार झाला होता. दलित संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजा करू नये म्हणून विरोध केला. त्यामुळे १९९६ मध्ये मुख्यमंत्र्यांना महापूजा करता आली नव्हती.

नगरसेवक ते मुख्यमंत्री, सामान्य रिक्षावाला ते राज्याचा प्रमुख असा प्रवास केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा सर्वसामान्य वारकऱ्यांचे, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून महापूजा करणार असल्याचे नक्की झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *