
श्री संत गजानन महाराजांच्या
पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान
शेगाव (बुलडाणा) : यंदाच्या आषाढी वारीसाठी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज (दि. ६) सकाळी साडेसात वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत गजानन महाराजांच्या पालखीचे हे ५३ वे वर्ष आहे. शेगाव येथून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीत ७०० भाविकांचा समावेश आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे आषाढी वारीच्या सोहळ्यात खंड पडला होता. मात्र, यंदा निर्बंध हटविल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे.
गजानन महाराजांच्या पालखीने दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथे विसावा घेतला. नंतर रात्री पालखीचा मुक्काम पारस आहे. मंगळवारी (दि. ७) दुपारी गायगावसाठी पालखी प्रस्थान करेल, तर रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. करोनामुळे गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांचा काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे.
विदर्भातील सर्वात मोठा सोहळा
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. त्यापैकी विदर्भातील सर्वात मोठी दिंडी श्री संत गजानन महाराज संस्थानची आहे. आज शेगावहून ही या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखी निघण्यापूर्वी सोमवारी सकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी ‘गण गण गणात बोते’च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता.
पंढरपूरपर्यंतचा प्रवास ७२५ किलोमीटरचा
यावर्षी पालखीचे ५३ वे वर्ष आहे. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकूण प्रवास १२७४ किलोमीटरचा पालखीचा प्रवास आहे. शेगाव संस्थानने श्री गजानन महाराजांची चांदीची पालखी बनारस येथील कारागिरांकडून तयार करवून घेतली आहे. त्यावरील आकर्षक नक्षीकाम कलाकुसरीने परिपूर्ण आहे. श्रींच्या पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापान आणि अल्पोपहाराची, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनाची तसेच औषधपाण्याचीही व्यवस्था व्यवस्था केली जाते. वाटेवरील गावातील नागरीकांकडून महाराजांना शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले जाते.
असा आहे पालखीचा कार्यक्रम –
६ जून रोजी सकाळी श्री क्षेत्र शेगाव येथून प्रस्थान, त्यानंतर श्री क्षेत्र नागझरी, पारस, ७ जूनला गायगाव, भौरद, ८ आणि ९ जूनला अकोला मुक्काम. १० जून भरतपूर, वाडेगाव, ११ जून देऊळगाव, पातूर, १२ जून मेडशी, श्रीक्षेत्र डव्हा, १३ जून मालेगाव, शिरपूर जैन, १४ जून चिंचाबा पेन, म्हसला पेन, १५ जून किनखेडा, रिसोड, १६ जून पानकन्हेरगाव, सेनगाव, १७ जून श्रीक्षेत्र नरसी, डिग्रस, १८ जून श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जवळा बाजार, १९ जून हट्टा, श्री क्षेत्र त्रिभारा, २० जून परभणी, २१ जून ब्राह्मणगाव, दैठणा, २२ जून खळी, गंगाखेड, २३ जून वडगाव, (दादा हरी), परळी थर्मल, २४ जून परळी, परळी वैजनाथ, २५ जून कन्हेरवाडी, अंबाजोगाई, २६ जून लोखंडी सावरगाव, बोरी सावरगाव, २७ जून गोटेगाव, कळंब, २८ जून गोविंदपूर, तेरणा साखर कारखाना, २९ जून किनी, उपळा माकडाचे, ३० जून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर उस्मानाबाद, उस्मानाबाद, १ जुलै वडगाव सिध्देश्वर, श्री क्षेत्र तुळजापूर, २ जुलै सांगवी, उळे, ३ व ४ जुलै सोलापूर, ५ जुलैला सोलापूर, तिऱ्हे, ६ जुलै कामती खुर्द (वाघोली), माचणूर, ७ जुलै ब्रह्मपुरी, श्री क्षेत्र मंगळवेढा आणि ८ जुलैला पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. ८ ते १२ जुलैदरम्यान पालखीचा पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. १३ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.