छायाचित्र : माऊली वैद्य

छायाचित्र : माऊली वैद्य

नऊ कोटी रुपयांच्या निधीची

मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई : पंढरपूर पालखी मार्गावरील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना २ कोटी ५९ लाख ७५ हजार, तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी ६ कोटी ७३ लाख २० हजार रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि. १९) ही माहिती दिली. पंढरपूरची आषाढी वारी ‘निर्मल वारी’ होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून जातात. विविध संतांच्या या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी २ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या ५० टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेला ८२ लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला २० लाख २५ हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला १ कोटी ५७ लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

 

पुणे जिल्हा परिषदेला ६ कोटी ७३ लाख 
भाविकांसाठी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी ६ कोटी ७३ लाख २० हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकूण मंजुरीच्या २० टक्के प्रमाणात म्हणजेच १ कोटी ३४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *