शिळा मंदिर लोकार्पणासाठी विनंती
नवी दिल्ली : श्री क्षेत्र देहू येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. २९) देण्यात आले.
देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले आदींच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांना केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलिकडेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने या शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांना श्री तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या, तुळशीहार घालून तसेच तुकोबारायांचा गाथा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
गेले काही वर्षे देहूतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकवर्गणीतून काम सुरू होते. इंद्रायणी नदीत गाथा बुडविल्यानंतर आनंद डोहाशेजारी ज्या दगडी शिळेवर संत तुकाराम महाराज अनुष्ठानाला बसले त्याच शिळेचा काही भाग तुकोबारायांच्या पूर्वजांनी उभारलेल्या विठ्ठल रुक्मिणी आणला गेला. त्यावर मंदिर उभारण्यात आले.
याच मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मूळ मंदिराचे सौंदर्य अबाधित ठेऊन आकर्षक असे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम पूर्ण होण्यास १२ वर्षे लागली. या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च झाला. शिवाजी बुट्टे या शिल्पकाराने मंदिराचे हे काम केलेले आहे.
मंदिराला दोन सोन्याचे कळस बसविण्यात येणार आहेत. अकलूज येथील विजयश्री पाटील, सुशांत पाटील, निशांत पाटील, ऋतुराज पाटील यांच्या वतीने हे सोन्याचे कळस देण्यात आले आहेत. देहूत येणारा प्रत्येक भाविक या शिळा मंदिरात नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही.