दोन्ही पालख्या दोन दिवस
पुण्यामध्ये मुक्काम करणारआळंदी/आकुर्डी :
टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीची॥या संत चोखामेळा यांच्या अभंगाप्रमाणे भल्या सकाळी मोठ्या उत्साहात ॥ज्ञानबातुकाराम॥च्या गजरात संत ज्ञानेश्वर माउली आणि जगदगुरू तुकोबाराय यांच्या पालख्या पुणे मुक्कामी निघाल्या.
काल (दि. २१) रोजी प्रस्थान झाल्यानंतर माउलींची पालखी आळंदीतच आजोळघरी गांधीवाड्यात मुक्कामी होती. सकाळी आरतीनंतर सहा वाजता पालखी पुण्याच्या दिशेने निघाली. दुसरीकडे देहूतून निघाल्यानंतर आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखीही भल्या सकाळी पुण्याकडे निघाली आहे. वाटेत ठिकठिकाणी पालख्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. संपूर्ण वारी नाही, तरी आळंदी ते पुणे किंवा आकुर्डी ते पुणे पालखी सोहळ्यात चालण्याचा अनेकांचा नित्यनेम आहे. दोन वर्षांनंतर पायी पालखी सोहळा निघाल्याने यंदा वारकरी आणि भाविकांची सोहळ्यात मोठी गर्दी दिसत आहे. दोन्ही पालख्यांवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
तुकोबारायांचा पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गावरून चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, खराळवाडी, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी मार्गे पुण्याकडे निघाला आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी-पुणे पालखी मार्गाने चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघी मार्गे पुण्याकडे निघाला आहे.
वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्यांचा संगम पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे शहरात प्रवेश करेल. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा शहरात प्रवेश करेल. नागरिकांकडून वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ देण्यात येत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे वारकऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली. वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेशखिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल.
श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल.
वारकऱ्यांसाठी पालिकेतर्फे सुविधा
पालखी मार्गात आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे नळकोंडाळी उभारण्यात आली आहेत. काही ठिकाणी टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिकेचा एक टँकर संपूर्ण पालखी मार्गावर पालखीसोबत राहणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिनचे वितरण आणि त्यासाठीचे इन्सिनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सार्वजनिक शौचालये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बोपोडी, नाना पेठ, भवानी पेठ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बाह्यरुग्ण विभाग २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. तसेच जवळच्या पालिका आणि अन्य दवाखान्यांमधून औषधोपचार सुविधांचेही नियोजन करण्यात आले आहे. पालिकेतर्फे सव्च्छता यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.