मुक्ताई मंदिर जीर्णोद्धाराचा
प्रश्न सोडवू : खा. सुप्रिया सुळे
मुक्ताईनगर : अपूर्णावस्थेत असलेल्या कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना विशेष विनंती करू आणि मुक्ताई मंदिराच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावू असे, आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. १७) येथे दिले.
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता खासदार सुप्रिया सुळे यांनी कोथळी येथे संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी मंगळवारी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मुक्ताईची आरती करण्यात आली. यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. मुक्ताई संस्थानतर्फे आदिशक्ती संत मुक्ताईंची प्रतिमा देऊन खासदार सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर सुळे यांनी रवींद्र महाराज हरणे यांच्याकडून त्यांनी ताटीचे अभंग समजून घेतले. मुक्ताई संस्थानच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी विविध विकास कामासंदर्भात खासदार सुळे यांच्यासोबत चर्चा केली. ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
निधीअभावी बांधकाम थांबले
श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असून वारकरी संप्रदायात आदिशक्ती मुक्ताईला मानाचे स्थान आहे. श्री क्षेत्र कोथळी येथे वर्षभर भाविक भक्तांचा राबता असतो. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नाने या तीर्थ स्थळाला ‘ब’ दर्जा मिळाला आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. यात मुक्ताई मंदिराला प्राचीन हेमाडपंथी लरूप देण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत ९ कोटी ९७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
मिळालेल्या निधीतून आतापर्यंत मंदिरातील गाभारा, सभामंडप, दुमजली दर्शनबारी, पहिला मजला मंदिराचे दर्शनी घुमट, मंदिराचा कळस हे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. परंतु रंगरंगोटी, विद्युतीकरण, संगणकीकरण, हिरवळ आणि इतर बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. निधीअभावी मंदिराचे जीर्णोद्धाराचे बांधकाम थांबले आहे.