पांडुरंगरायाच्या पालखी सोहळ्याचे
२३ मे रोजी मुक्ताईनगरकडे प्रस्थान
पंढरपूर : टाळ, मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत संत मुक्ताबाईंच्या ७२५ व्या अंतर्धान समाधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंढरी निवासी श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे २३ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.
औरंगाबाद येथे पहिला मुक्काम
२३ मे रोजी सोमवारी सकाळी ६ वाजता श्री पांडुरंगरायाच्या पादुकांची विधिवत पूजा, आरती होईल. यानंतर पालखी सोहळा करमाळा, नगरमार्गे पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी औरंगाबाद येथील मुक्कामी पोहोचेल. सोहळा गारखेडा-औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात पालखीचा मुक्काम होईल. यानंतर २४ मे रोजी मंगळवारी सोहळ्याचा दुसरा मुक्काम भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वॉर्डात होईल. नंतर २५ मे रोजी बुधवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे आगमन, दिंडी आणि दर्शन सोहळा सोहळा होईल. २६ मे गुरुवारी जुनी कोथळी ते नवीन मुक्ताई मंदिर पालखी व दिंडी सोहळा काढण्यात येईल.
२९ मे रोजी पालखी सोहळा सांगता
२७ मे रोजी शुक्रवारी द्वादश पारणे, नैवेद्य होऊन सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल. याच दिवशी पालखी सोहळा चिखली येथे मुक्कामी पोहोचेल. २८ मे रोजी दुसरा मुक्काम बीड येथे होईल. यानंतर २९ मे रोजी रविवारी स्वस्थानी पंढरपूर येथे पालखी सोहळ्याची सांगता होईल. या पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. पालखीसोबत येणारे वारकरी आणि भाविकांसाठी सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्यात आली आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी आगळावेगळा भक्तीसोहळा भाविकांना अनुभवता येणार आहे.
जामनेरात संत नामदेव पादुकांची भेट
श्री पांडुरंगराय पादुका सोहळा २४ मे रोजी दुपारी जामनेर येथे पोहोचेल. येथे श्री पांडुरंगराय आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेल्या संत नामदेव महाराज पादुका भेटीचा सोहळा होईल. सायंकाळी ६ वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पादुका भेटीचा सोहळा होईल. संत मुक्ताबाई महाराजांचा हा ७२५ वा अंतर्धान सोहळा असल्याने कौंडण्यपूरहून माता रुख्मिणी, आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि सासवडहून संत सोपानदेव यांच्या पादुका व विश्वस्त मंडळ सोहळ्यासाठी उपस्थित राहतील, अशी माहिती संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. यावेळी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे उपस्थित होते.