पंढरपुरात ‘कॉरिडॉर रद्द’च्या

आंदोलकांनी दिला इशारा

पंढरपूर : वारंवार एकाच परिसरात विकासाच्या नावाखाली रुंदीकरणाचा घाट घातला जात असेल, तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कर्नाटक राज्यात समावेश करा. तसेच पंढरपूर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढील वर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचा इशारा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक आणि व्यापार्‍यांनी दिला आहे.

पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. २५) श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिमव्दार येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर करण्याची घोषणा केली असून यास येथील स्थानिकांचा कडाडून विरोध होत आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी व्यापारी आणि बचाव समितीच्या सदस्यांसमवेत बैठक घेतली होती. यामध्ये अधिकार्‍यांनी दिलेल्या आराखड्याप्रमाणेच वारकरी आणि स्थानिकांना अपेक्षित असलेला विकासाचा आराखडा सादर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती.

पालकमंत्री विखे पाटील यांनी एक महिन्याची मुदत देत हा आराखडा प्रशासनास सादर केल्यानंतर पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यापूर्वीच शासनाने दीड हजार कोटी रुपयाच्या कामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रसिध्दी केली आहे. तर पंढरपूर नगरपरिषदेकडून मंदिर परिसरात रस्त्याची लांबी, रूंदी, घरांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले असताना देखील आराखड्याची कामे प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याने बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी मंदिरानजिक ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, यावेळी स्थानिकांनी सकाळपासून भजन आंदोलन सुरू केले. यात विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होवून पाठींबा दर्शविला. यावेळी बोलताना बचाव समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी ‘पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध नसून हा आराखडा मंदिर परिसरात करू नये’, अशी मागणी असल्याचे सांगितले. यापूर्वी या परिसरात तीन वेळा विकासकामे आणि रुंदीकरणासाठी स्थानिकांची घरे ताब्यात घेण्यात आली आहेत. नव्या कॉरिडॉरमध्येदेखील अनेक प्राचीन मठ, मंदिरे, बाधित होणार आहेत. संत नामदेव महाराज यांचे जन्म ठिकाण, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांचा मठ, अमळनेरकर महाराज यांचा मठ आदी महत्वाची ठिकाणे बाधित होणार आहेत. यामुळे पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेचे वाळवंट, ६५ एकर परिसर अथवा नदीवर मोठा पूल उभारून करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, कॉरिडॉरबाबत चर्चा सुरू असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याचे वेगाने काम सुरू असल्याने आमचा विश्‍वासघात केला जात आहे. आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल, तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा समावेश कर्नाटकात राज्यात केला जावा, अशी आम्ही मागणी करू असा इशारा दिला. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा ‘कानडा ओ विठ्ठलु कर्नाटकु’ असा अभंग आहे. यामुळे विठुराया मूळचा कर्नाटकातील असून त्याचे हे गाव कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच पुढील वर्षी आषाढीस कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणार आहोत.

यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून निवेदन स्वीकारले. तसेच आंदोलकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्‍वासन दिले. या आंदोलनात बचाव समितीचे ऋषिकेश उत्पात, शैलेश बडवे, भागवत बडवे, कौस्तुभ गुंडेवार, डॉ. प्राजक्ता बेणारे, राजेंद्र वट्टमवार, गणेश लंके, श्रीकांत हरिदास, गणेश महाजन यांच्यासह युवक नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सतीश मुळे, माजी नगरसेवक इब्राहीम बोहरी, अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, राजू सर्वगोड, विवेक परदेशी, रा. पां. कटेकर, मनसेचे संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, राहुल परचंडे, किशोर खंडागळे, हरि गोमासे आदी सहभागी झाले होते.

आंदोलनात फूट?
कॉरिडॉरवरून आषाढीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याच्या इशाऱ्यावरून आंदोलनात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण बोलावण्याचा मतप्रवाह तयार होत असल्याचे या आंदोलनाची सुरुवात करणारे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी या इशाऱ्याला कडाडून विरोध केला आहे. मंदिर परिसरातील शेकडो व्यापारी आणि नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवू नये, अशी भूमिका घेत धोत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे आंदोलन उभे केले आहे. मात्र शुक्रवारच्या ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान हा आराखडा रद्द न झाल्यास कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेस बोलावण्याची मानसिकता काही जणांची झाल्याचे वक्तव्य रामकृष्ण महाराज वीर आणि इतरांनी केले.

त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ज्याला कर्नाटकात जायचे त्याने खुशाल जावे, मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री पंढरपूरला आल्यास त्यांना जोडे मारून पळवून लावू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. मंदिर परिसरात कोणताही आराखडा आम्ही राबवू देणार नसून त्यासाठी आम्ही खंबीर आहोत. यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे राहू, असे दिलीप धोत्रे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आंदोलकांमध्ये फूट पडण्याच्या शक्यतेची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे कॉरिडॉर?
या कॉरिडॉर अंतर्गत मंदिराच्या चारही बाजूस २०० आणि त्याहून अधिक फूट रूंदीकरण सुचविण्यात आले आहे. तसेच मंदिराकडे येणार्‍या १२ गल्ली बोळांमध्ये देखील रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी ३०० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ कॉरिडॉर; तसेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर प्रकल्पांच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी हा कॉरिडॉर उभारण्यात करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या घोषणेनंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात यापूर्वी रूंदीकरण झाले असून पंढरपूर कॉरिडॉरसाठी चौफळा ते महाद्वार चौक हा रस्ता निवडण्याऐवजीचंद्रभागेचे वाळवंट किंवा ६५ एकर परिसर निवडावा, तसेच महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या पैलतीरावर ८० फूट रुंदीचा भव्य पूल बांधून यावर देखील कॉरिडॉर उभारावा, अशीही मागणी या परिसरातील नागरिक आणि व्यापारी यांनी केली आहे. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *