
१ एप्रिलपासून सांभाळणार
देहू देवस्थानाचा कार्यभार
देहूगाव : तीर्थक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष पदासाठी रविवारी (दि. २६) झालेल्या निवडणुकीत ह. भ. प. पुरुषोत्तम दत्तात्रेय मोरे यांची निवड झाली. या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे यांनी केली.
संस्थानच्या विश्वस्तांचा सहा वर्षांचा, तर अध्यक्षांचा कार्यकाल दोन वर्षांचा असतो. तो पूर्ण झाल्यावर निवडणुकीद्वारे गोविंद बुवा, आबाजी बुवा आणि गणेश बुवा अशा तीन शाखांतून अनुक्रमे दोन वर्षांसाठी अध्यक्ष निवडले जातात. चार वर्षांपूर्वी गोविंद बुवा शाखेतून श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी ह. भ. प. मधुकर भिकाजी मोरे निवडून आले होते. त्यानंतर आबाजी बुवा शाखेतून ह. भ. प. नितीन गोपाळ मोरे यांची निवडणुकीद्वारे निवड झाली होती. या वेळी गणेश बुवा शाखेतून अध्यक्षांची निवड झाली आहे.
नितीन महाराज मोरे यांचा कार्यकाल ३१ मार्च रोजी पूर्ण होत असल्याने रविवारी देहूच्या मुख्य मंदिरालगत असणाऱ्या पित्ती धर्म शाळेमध्ये निवडणुकीद्वारे मतदान घेण्यात आले. गणेश बुवा शाखेतून अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम महाराज मोरे आणि उमेश महाराज मोरे या दोघांनी नामनिर्देशन पत्र भरले होते.
निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी ८ ते ५ या वेळेत झालेल्या मतदानामध्ये ३७२ पैकी ३२२ ( ८५ टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आबाजी बुवा शाखेतील ९२ पैकी ७६, गणेश बुवा शाखेतून १४० पैकी १३०, तर गोविंद बुवा शाखातून १४० पैकी ११६ मतदारांनी मतदान केले. मतमोजणी सायंकाळी करण्यात आली. त्यात ३२२ पैकी तिघांचे मतदान बाद झाले.
ह. भ. प. पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे यांना १६४, तर ह. भ. प. उमेश सुरेश मोरे यांना १५५ मते मिळाली. ९ मतांनी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.विद्यमान अध्यक्ष यांचा कार्यकाल ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार असून, १ एप्रिलपासून निवडून आलेले नवे अध्यक्ष कार्यभार स्वीकारणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अंकुश बाळकृष्ण मोरे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुजित बाळकृष्ण मोरे, भास्कर ज्ञानेश्वर मोरे, श्यामकांत एकनाथ मोरे यांनी काम पाहिले.