७५० ऐवजी ६०० किलोमीटर

चालणार; २ जूनला प्रस्थान

मुक्ताईनगर : संत मुक्ताईंच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गात यंदा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ३४ दिवसांचा पायी प्रवास आता २४ दिवसांवर येणार आहे. सुमारे ४० वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे. यातून पूर्वीचे ७५० किलोमीटरचे अंतर आता ६०० किलोमीटरवर आले आहे. पालखीचे प्रस्थान २ जून रोजी कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिरातून होत आहे.

संत मुक्ताईच्या आषाढी वारी पालखीला ३१२ वर्षांची परंपरा आहे. मुक्ताईंची पालखी आल्याशिवाय इतर कोणत्याही संतांच्या पालखीला पंढरपुरात प्रवेश मिळत नाही, असा या पालखीला मान आहे. दरवर्षी हा पालखी सोहळा वैशाख शुद्ध पंचमीला मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील मूळ समाधी स्थळावरून निघत असतो. पुढे ३४ दिवसांत सहा जिल्हांमधून ७५० किलोमीटर पायी प्रवास करून सोहळा पंढरपुरात दाखल होतो. पण, या पारंपरिक मार्गात पालखीला अनेक वेळा मुख्य मार्ग (महामार्ग) सोडून आडमार्गाने, फेऱ्याने प्रवास करावा लागतो. त्यात मुक्कामांची संख्या म्हणजेच प्रवासाचे दिवस वाढतात. शिवाय ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे अनेकदा पायी दिंडी वेगळी आणि रथ, पालखीचा मार्ग वेगवेगळा होतो. पालखी मुक्कामाच्या गावात गेल्यानंतर नगर प्रदक्षिणा होते. पण, वारकरी दिवसभर पायी चालून थकल्याने ही प्रदक्षिणा त्रासदायक होत असे. आता पालखी तळावरच भाविकांना दर्शनासाठी यावे लागेल. जुन्या नियोजनामुळे अडचणी येत होत्या. तसेच खराब रस्त्यांमुळे रथ नेताना अडचणींचा सामना होत होता, असे विश्वस्तांनी स्पष्ट केले.

१५० किलोमीटर अंतर कमी
जुन्या नियोजनात कोथळीतून निघाल्यावर सातोड (ता. मुक्ताईनगर), भालेगाव (ता. मलकापूर), मलकापूर नंतर चौथा मुक्काम शेलापूर येथे असे. येथून आडमार्गावरील तालखेड आणि पाचव्या मुक्कामाला पालखी टाकरखेडला दाखल होई. नंतर तांदलवाडीतून सहावा मुक्काम मोताळा येथे होत असे. मात्र, मोताळा आणि शेलापूर हे अंतर फक्त १२ किलोमीटर आहे. त्यात पालखीला वळसा घेत प्रवास करावा लागत असे. मोताळ्याहून पालखी ७ व्या मुक्कामासाठी बुलडाणा गाठत असे. नवीन नियोजनात प्रवासाचे १० दिवस, तर अंतर १५० किलोमीटरने कमी झाले आहे. यामुळे पालखी सोहळा २६ जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे.

बुलढाण्यात आता चौथ्या दिवशीच दाखल
पालखी सोहळ्याचा मुक्काम बुलडाणा येथून येडगावला आठवा, तर चिखलीत नववा मुक्काम होत असे. चिखलीवरून खंडाळा (१० वा मुक्काम), मेरा बुद्रक येथून (११ वा मुक्काम), तर मेरा भरोसा येथे १२ वा मुक्काम व्हायचा. येथे मुख्य मार्ग सोडून डावीकडे दोन दिवस जात असत. रस्त्याअभावी रथ नेण्यात अडचणी येत. पाऊस आल्यास गैरसोय होई. पुढे या मुक्कामासाठी देऊळगाव मही येथे जाताना अडचणी येत असत. नंतर सरळ प्रवास होई. यंदा पालखी २ जूनला कोथळी येथून निघेल, नवीन मंदिरात विसावा घेऊन दुसऱ्या दिवशी दसरखेड मार्गे मलकापूरला दुसरा मुक्काम, मोताळा तिसरा आणि चौथा मुक्काम बुलडाणा येथे होईल. जुन्या नियोजनात पालखी बुलडाण्याला ७ व्या दिवशी पोहोचत होती. बुलडाणा येथून येडगाव फाट्यावरून पालखी चिखली (५ वा मुक्काम) येईल. पूर्वी पालखी बेडगावात मुक्कामी असे. तसेच आता भरोसा गावाऐवजी महामार्गावरील भरोसा फाट्यावर सहावा मुक्काम होईल.

माऊलींच्या पालखी सोहळ्याप्रमाणे स्वरुप
मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे अंतर राज्यात सर्वाधिक होते. शिवाय ३४ दिवस मुक्काम असल्याने अनेक भाविकांना पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नव्हते. यंदा अंतर १५० किलोमीटरने कमी आणि मुक्काम केवळ २४ दिवसांचा असल्याने अनेक भाविकांना सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. खान्देश, मध्य प्रदेश तसेच विदर्भातील भाविक वारकरी मोठ्या संख्येने यंदा या पायी सोहळ्यात सहभागी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे संत मुक्ताई पालखी सोहळ्याला माऊलींच्या पालखी सोहळ्याप्रमाणे स्वरुप येईल, अशी भाविकांत चर्चा आहे. या पालखी सोहळ्याचे नियोजन संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे, श्री क्षेत्र मुक्ताईनगरच्या मूळ समाधी स्थान मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक ह. भ. प. उद्धव महाराज जुनारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *