श्री ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा
आषाढी वारी करून आळंदीत
आळंदी : रिमझिम पाऊस झेलत, रांगोळीच्या पायघड्या ओलांडत, बँडच्या सुरावटींमध्ये, टाळमृदंगाच्या तालावर, पुष्पवृष्टी करत आषाढी वारीला पंढरपूरला गेलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीकरांनी आज (दि. २३ जुलै) मोठ्या उत्साहात स्वागत केले. तब्बल ३३ दिवसांच्या प्रवासानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी सहाच्या दरम्यान आळंदीत आगमन झाले. त्यामुळे आळंदी एकदम चैतन्यमय होऊन गेली.
परतीच्या प्रवासात पालखी गेले दोन दिवस पुण्यात मुक्कामी होती. आज पहाटे पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. सकाळी १० वाजता भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून पालखी आळंदीच्या दिशेने निघाली. सव्वा अकराच्या दरम्यान येरवडा, फुलेनगरमार्गे सोहळा तीन वाजता वडमुखवाडीतील थोरल्या पादुका येथे पोहोचला. त्यावेळी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या रथाभोवती दर्शनासाठी गर्दी केली.
माऊलींच्या स्वागतासाठी आळंदीकर सायंकाळी साडेचार वाजल्यापासूनच धाकट्या पादुकांपाशी येऊन थांबले होते. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान आळंदी शहराच्या वेशीपाशी सोहळा आला. यावेळी शहरात ठिकठिकाणी विद्यार्थी, महिला, भाविक माऊलींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. माऊलीच्या रथाने आळंदीत प्रवेश करताच ‘माऊली माऊली’चा एकच जयघोष झाला.
दरम्यान, माऊलींची पालखी पालिका चौकात आल्यावर दुतर्फा जमलेल्या आळंदीकर ग्रामस्थांनी पालखी उतरवून खांद्यावर घेतली आणि मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात नेली. त्यानंतर माउलींची आरती झाली. आरतीनंतर माउलींच्या पादुका मंदिरात विसावल्या.
उद्या एकादशीला माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर पडेल. हजेरी मारुती येथे दिंड्यांच्या हजेरी घेण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री पालखी पुन्हा मंदिरात विसावेल आणि वारीची सांगता होईल. बारस सोडून माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरीला गेलेले वारकरी आपापल्या गावी परततील.