नवीन भारताच्या निर्मितीसाठी
संत साहित्य गरजेचे : सहस्त्रबुद्धे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवे राष्ट्रीय धोरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे नव्या पिढीला आमच्या मातीशी जोडले पाहिजे. हे कार्य भारतीय अध्यात्म म्हणजे संत साहित्यच करू शकते. विवेकपूर्ण विचार करण्यासाठी संत साहित्य गरजेचे आहे. त्यातूनच नव भारत निर्माण होईल, असे विचार माजी राज्यसभा सदस्य आणि आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी (देवाची), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय दुसर्या भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ही परिषद कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहामध्ये भरविण्यात आली आहे.
या प्रसंगी मोक्षयतं आंतरराष्ट्रीय योगाश्रमचे संस्थापक पद्मश्री स्वामी भारत भूषण प्रमुख पाहुणे होते. केरळच्या रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन सेवाश्रमचे सचिव स्वामी नरसिंहनानंद आणि विद्वान आणि श्रीपीठमचे संस्थापक स्वामी परिपूर्णानंद सरस्वती हे सन्माननीय अध्यक्ष होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्लूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, संयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प बापूसाहेब मोरे, कार्यकारी अध्यक्ष ह. भ. प. रविदास महाराज शिरसाठ आणि समन्वयक डॉ. संजय उपाध्ये उपस्थित हेाते. डॉ. विनय सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले, संताचा उपदेश मनावर खोल परिणाम करून जातो. संत साहित्यात गुणवत्ता आहे. त्याची व्यापकता असून त्याला आधुनिक शास्त्राच्या चौकटीत बसविता येणार नाही. संतांनी गुरू शिष्याची परंपरा सांगितली आहे. भारताची सौम्य संपदा संत साहित्य असून आजच्या काळात पाठ्यक्रमात त्याचा समावेश असावा. त्यात ब्रह्माकुमारी, जग्गी वासूदेव, सत्य साईबाबा सारख्या अन्य संतांच्या साहित्याचा समावेश असावा. हे साहित्य एकाच व्यासपीठावर आणण्याचे कार्य एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून होत आहे.
पद्मश्री स्वामी भारत भूषण म्हणाले, संतांनी राष्ट्र निर्मितीचेही कार्य केले आहे. या देशात जे संत होऊन गेलेत त्यांची वाणी त्यांचे कार्य हे साहित्याच्या रुपात समोर येत आहे. योगसुद्धा संत परंपरेची देणगी असून ते मानवाच्या मनाला स्पर्श करते. वर्तमान शिक्षण पद्धतीत भक्ती, योग, ज्ञान आणि लय यांचा समन्वय करावा. संत साहित्य हे मानव कल्याणासाठी असून संपूर्ण ज्ञान शांतीच्या शोधात आहे. शांतीमध्येच सृजनात्मकतेचे रहस्य दडलेले आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, संतांनी सदैव समाज कल्याणासाठी कार्य केले आहे. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याचे ज्ञान त्यांचे साहित्य देते. संत ज्ञानेश्वर यांनी ७०० वर्षापूर्वी वैज्ञानिक गोष्टी नमूद करून ठेवल्या आहेत. या जगात अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच शांती नांदेल. आज संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या डोमच्या माध्यमातून विश्व शांतीची गाथा गायली जाईल. स्वामी विवेकानंद यांच्यानुसार भविष्यात भारत माता ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि संपूर्ण जगाला विश्व शांतीचा मार्ग दाखवेल. स्वामी परिपूर्णानंद सरस्वती म्हणाले, शांती ही तीन प्रकारची असते. आध्यात्मिक शांती, आदी दैविक शांती आणि आदि भौतिक शांती. मानवाला आज विज्ञानापेक्षा अध्यात्माची अधिक गरज आहे. पारंपारिक विज्ञान हे पूर्ण आहे त्यात अध्यात्माचा संपूर्ण समावेश आहे. तर आधुनिक विज्ञान हे भौतिकतेकडे वळते. अध्यात्मिक शास्त्र हे वैज्ञानिक शास्त्राचा मूळ गाभा आहे. संत साहित्य हे सौम्य शक्ती असून त्याच जोरावर भारत विश्व गुरू बनेल.
स्वामी नरसिंहनानंद म्हणाले, भारताला गर्व आहे, की त्यांनी संपूर्ण जगाला संत साहित्य उपलब्ध करून दिले आहे. आधुनिक काळात विज्ञानाचा उपयोग करून संत साहित्याचा अॅप बनवावा आणि ते उपलब्ध करून द्यावे. तसेच संतांचे साहित्य कथेच्या माध्यमातून प्रसृत करावे. आजचे शिक्षण हे केवळ डिग्रीचे असल्याने त्यात मूल्यांचा समावेश होणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतरिक बदल घडतील. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, सरकारने राष्ट्रीय शिक्षण नितीचे जे नवे धोरण मांडले आहे. त्याला पूर्ण करण्यासाठी संत साहित्याचे शिक्षणात खूप महत्व आहे. या संस्थेने हा विचार करून उच्च शिक्षीत विद्यार्थी नितिमूल्यवान कसे बनविता येईल यावर भर देत आहोत. सर्व संताच्या साहित्यात विज्ञानाचा किती समावेश आहे. यावर अद्याप कोणीही संशोधन केलेले नाही. त्यामुळे यावर संशोधन होणे गरजेचे आहे. ह. भ. प. बापूसाहेब मोरे यांनी स्वागतपर भाषण आणि प्रास्ताविक केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.