चैत्र वारीसाठी २ लाख भाविक दाखल
पंढरपूर : गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात वारकरी, भक्तांविना ओस पडलेले विठुरायाचे पंढरपूर चैत्री वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्री विठ्ठलाचा जयजयकार, टाळ मृदंगाचा गजर, भजन कीर्तनादी कार्यक्रमांनी दुमदुमून गेले आहे.
कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने आज (दि. १२) चैत्री वारीच्या मुख्य दिवशी म्हणजे कामदा एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.
मराठी नववर्षातील पंढरपूरमधील ही पहिलीच यात्रा असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
पहाटेपासूनच दर्शनासाठी बारी
पहाटे मंदिर समितीच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आणि प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते श्री रुक्मिणीचे महापूजा झाली. भल्या पहाटेपासूनच भाविकांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी रांग लावली आहे.
यंदा भाविकांसाठी दर्शनरांगेत आणि दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदिर आणि परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे.
भाविकांसाठी सुविधा
दर्शनरांगेत भाविकांना एकादशी (दि. १२) आणि द्वादशी (दि. १३) हे दोन दिवस भाविकांना मोफत खिचडी, चहा, पाणी, सरबत, ताक वाटप करण्यात येणार आहे. चंद्रभागा वाळवंट आणि पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम आणि दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे.
यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये यासाठी प्रतिबंधक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात्रेत पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहण्यास मिळत आहे.
यंदाची चैत्री यात्रा दोन वर्षांनंतर पूर्णपणे निर्बंधमुक्त परिस्थितीत होत असल्याने पंढरपूर नगरीतील मठ, मंदिरे, धर्मशाळा, चंद्रभागेचे वाळवंट आणि ६५ एकरांत वारकऱ्यांची गर्दी, भजन कीर्तनाचा कल्लोळ रंगला आहे.
(फोटो सौजन्य : प्रसाद हरिदास, #माझाक्लिक_PH)