वारकरी असणं हा एक

संस्‍कार : तेजस्वी सातपुते

वारी हा माझ्या आवडीचा सोहळा आहे. त्‍यात सहभागी होणं माझ्या आनंदाचा भाग आहे. मी पुण्याला पोलीस अधिक्षक असताना दोन वेळा आळंदी ते नीरेपर्यंत माऊलींच्या रथासोबत पायी वारी केली आहे. सासवडच्या घाटात होणारी गर्दी, रथाभोवतीचा बंदोबस्त मी प्रत्‍यक्ष केला आहे. नंतरच्या काळात माझ्याकडं साताऱ्याच्या पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार आला, तेव्हा मी नीरा ते धर्मापुरीपर्यंत पायी वारी केली आहे. आता माझ्याकडं सोलापूर जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार असल्‍यानं मी धर्मापुरी ते पंढरपूरपर्यंतच्या पायी वारीत सहभागी होत आहे. यामुळं माझ्या कर्तव्यकाळाचा एक वारीमार्ग पूर्ण झाला, याचं मला खूप समाधान आहे.

तेजस्‍वी सातपुते, पोलीस अधिक्षक, सोलापूर जिल्‍हा

वारीचा, वारकरी असण्याचा माझ्यावरील संस्‍कार हा खूप लहापणापासूनचा आहे. कारण, माझ्या कुटुंबाला वारकरी पार्श्वभूमी आहे. माझे आजी-आजोबा वारी करत होते. माझ्या सासूबाई, नणंदबाई वारी करतात. माझ्या माहेरात म्‍हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आणि याच जिल्ह्यात नेवासा या माझ्या सासरगावी दोन्ही ठिकाणी पंढरीची वारी केली जाते.

पंढरीची वारी आहे माझे घरी

माझे आजी-आजोबा अगदी चालता येईपर्यंत पायी वारी करत राहिले. त्‍यामुळे वारीचा सोहळा किंवा वारीची अनुभूती मी पहिल्‍यांदाच घेतेय, पहिल्‍यांदाचा अनुभवतेय असं नाही. मला आठवतंय, माझे आजी-आजोबा पंढरपूरची वारी करून आले, की आख्खं गाव त्‍यांचं पददर्शन करण्यासाठी आमच्या घरी येत असे. धारणा अशी होती, की ही पावलं पंढरपूरपर्यंत गेली आहेत. यांचं दर्शन घेतलं म्‍हणजे आपल्‍याला विठ्ठलाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. त्‍यामुळं वारी उलटून गेल्‍यानंतर बरेच दिवस लोक येत असत. त्‍यांचं चहापाणी मी केल्‍याचं मला लख्ख आठवतंय. त्‍यामुळं वारकऱ्यांच्या सेवेची, वारी करण्याची ही अनुभूती मी लहानपणापासूनच घेतलीय.

यंदा मी सोलापूरची एसपी म्‍हणून काम करताना प्रत्‍यक्ष वारीत सहभागी होते आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे. याबाबत माझ्या घरचे लोकही खूप उत्‍सुक आहेत. कारण माझ्याकडून जे काही होतंय, ते माझ्याकडून देवच करवून घेतोय, अशी धारणा माझ्या कुटुंबीयांची आहे. आमच्यापैकी एकाला वारीत सहभागी होता येतं, ही पूर्वजन्माची, पूर्वपिढ्यांची पुण्याई आहे, असंच त्‍यांना वाटतं.

वारीतील बंदोबस्‍ताचं स्‍वरूप

गणपतीच्या मिरवणुकीचा ताण जसा असतो, तसा वारीदरम्यान असतोच असं नाही. कारण दोन्ही उत्सवात सहभागी होणार्‍या समुदायाचं स्वरूप वेगळं आहे. आळंदी हे तसं छोटं गाव. वारीदरम्यान खूप मोठ्या संख्येनं वारकरी बांधव येत असतात. तसंच देहूचंही आहे. इथंही मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र होतात. पहिल्यांदा माऊलींची पालखी निघाली, की लगेच दुसर्‍या दिवशी तुकोबांच्या पालखीचंही प्रस्थान होतं. दोन्ही सोहळ्यांदरम्यान येणारा जनसमुदाय खूप विशाल असतो. खरं पाहता या विशाल वारकरी समुदायाकडून कुणाला उपद्रव होत नाही. स्वयंशिस्त, सहनशील, सुहृदयी अशी सगळी विशेषणं त्यांना लावता येऊ शकतात. मात्र अगदी कमी जागेत मोठ्या संख्येनं वारी सोहळ्यासाठी ते गोळा होत असल्यानं या दोन्ही गावांचं नियोजन अगदी काटेकोर करणं गरजेचं असतं.

या छोट्या गावांमध्ये विशाल जनसमुदाय लोटल्यानं कित्येकजण हरवणे आणि सापडणे अशा बाबी घडत राहतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाला ‘हरवले आणि सापडले’ यासाठीचं नियोजन प्रॉपर करावं लागतं. एखाद्या प्रसंगी वारकर्‍यांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग नाही सापडला, सगळ्यांचीच एकमेकांपासून चुकामूक झाली, तर ते पुढे मार्गस्थ होऊ शकत नाहीत. त्यामुळं आतलं जे नियोजन असतं ते एकमार्गी असतं. एका दिशेनं चालणं सुरू केल्‍यानंतर त्‍याच रस्त्यावरून लगेच परत उलट दिशेनं जाता येणार नाही, अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं.

हॉकर्स जर रस्त्यावर असतील, तर वस्तू खरेदीसाठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी फेरीवाल्यांचं योग्य नियोजन करणं आवश्यक असतं. त्यांच्यासाठी वेगळा झोन करणं गरजेचं असतं. वारकरी जरी पायी चालत असले, तरी त्यांचं साहित्य घेऊन जाणार्‍या गाड्याही बर्‍याच असतात. एका ठराविक काळापर्यंत त्यांना पुढं जाऊ देता येत नाही. शिवाय वारकर्‍यांचं साहित्य असल्यामुळं त्यांना जास्त काळ थांबूनही ठेवता येत नाही. त्या दृष्टिकोनातून या वाहनांचंही नियोजन करणं क्रमप्राप्त ठरतं.

कारण वाहनांचं नियोजन बिघडलं, तर वारीतून जाणाऱ्या वारकर्‍यांचा अपघात होण्यासारख्या घटना घडू शकतात. त्याच काळात नदीला पाणी सोडलेलं असतं. त्याचा अंदाज न आल्याने नदीत उतरलेल्‍यांपैकी एखाद्या वारकरी वाहून जाण्याचा धोका असतो. अशा वेळी नदीकिनारी असलेल्या पोलिसांमुळे वारकर्‍यांचे प्राण वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारचा कोणताही अपघात होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील असते.

वारीदरम्यान पाकीटमार, सोनसाखळीचोर असे भुरटे चोर सक्रिय होत असतात. पोलिसांना ओळखता येऊ नये, यासाठी तेही वारकर्‍यांच्या रुपात येत असतात. अशा फसव्या वारकर्‍यांना शोधून वारकर्‍यांची जमापुंजी सुरक्षित ठेवणे मोठे आव्हानात्मक असते. कारण अगदी तुटपुंजी रक्कम घेऊन बाहेर पडलेले वारकरी वारीदरम्यान पैसे गमावल्याने हतबल होऊन जातात आणि आता गावी परतायचे कसे असा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा वेळी त्यांना धीर देणं, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या गावी परतण्याची तरतूद करणं, संपर्क न झाल्यास प्रशासनाकडून आर्थिक मदत करून त्यांना सुखरूप पोहोचवणं, त्याचबरोबर त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करणं, त्या गुन्ह्याचा तपास करणं अशी अनेक कामं यावेळी पोलिस प्रशासन करत असतं. यासाठी पालखी प्रस्थानादरम्यान देहू आणि आळंदीत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो.

सेवा म्हणून मागतात वारीची ड्युटी
वारीदरम्यान पाऊस असतो, गर्दी मोठी असते. त्यामुळं एखाद्या जागी पोस्‍टिंग मिळालेल्‍या पोलीस कर्मचाऱ्यांना दुसरा व्यक्ती आल्याशिवाय जागा सोडता येत नाही. साहजिकच तिथं वाहतूक नियमन वा अन्य कामासाठी नेमलेल्‍या कर्मचार्‍यांवर मोठा ताण असतो. कारण नियमनादरम्यान बळाच्या वापराऐवजी प्रत्यक्ष बोलून नियमन करावं लागतं. खूप पेशन्स ठेवून काम करावं लागतं. म्हणायला गेलं तर खूप काम असतं, मात्र ते सेवा म्हणून केलं जात असल्यानं त्याचा ताण कर्मचारी घेत नाहीत. अनेकदा आमच्या कर्मचार्‍यांना विशेषतः आडवळणावर, हायवेवर वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचार्‍याला जेवायलासुद्धा मिळत नाही. मात्र तेही काम सेवा म्हणून केलं जात असल्यानं कर्मचारी तो त्रास आनंदानं सहन करतात.

अनेक कर्मचारी वारीतील बंदोबस्ताची ड्युटी स्वत:हून मागून घेतात. जेव्हा पंढरपुरात वारी येते, तेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला तो बंदोबस्त पेलवत नाही. तेवढा फोर्सही नाही. त्यामुळं पुणे, सातारा, लातूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद येथील पोलीस प्रशासनातील कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी बोलवावं लागतं. याबाबत जेव्हा त्या त्या प्रमुखांच्या कर्मचार्‍यांसोबत बैठका होतात, तेव्हा तेथील कर्मचारी आम्हाला बंदोबस्तासाठी पाठवा, अशी मागणी करतात. ‘मी गेल्या वर्षी गेलो होतो, मला यंदाही जाऊ द्या’ अशी विनंती करतात. मुळात तिथं जाऊन विठ्ठलाची सेवा करणं, अशी त्या ड्युटीमागे भावना असते.

एरवी बाहेर बंदोबस्तासाठी पाठवायचं म्हटलं, की शक्यतो कुणीही तयार नसतो. घरी कुणी आजारी आहे, अमुक कारण आहे, अशी कारणं सांगितली जातात. वारीसाठी मात्र प्रत्येकजण तयार असतो. त्यामुळं वारी हा जसा वारकर्‍यांचा आनंदाचा सोहळा असतो, तसाच पोलिसांसाठीसुद्धा आनंदाचा सोहळा असतो. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांच्या कामी आपण पडतोय हाच एक मोठा आनंद असतो. कर्तव्य करता करता भक्ती करणं, एकमेकांची सेवा हीच ईश्‍वरसेवा, हाच विचार या बंदोबस्तादरम्यान कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचार्‍याचा असतो. हा खूप वेगळ्या प्रकारचा बंदोबस्त आहे, ज्यात सद्भावना आणि आपुलकी असते.

वारीदरम्यान स्वतःला शांत ठेऊन, खूप सहनशीलता बाळगून, कधीही आवाज वाढवू न देता हा बंदोबस्त केला जातो. वारी जेव्हा देहूतून, आळंदीतून निघते, पुणे शहरात प्रवेश करते. तिथं दोन दोन मुक्काम असतात. त्यानंतर माऊलींची पालखी सासवड घाटामधून पास होते, तेव्हा सासवड घाटामध्ये खूप गर्दी असते. वारी सोहळा अनुभवण्यासाठी अनेक जण आलेले असतात. या सोहळ्यासोबत पुण्यातले खूप लोक सासवडपर्यंत येतात. साहजिकच पालखीत समाविष्ट झालेल्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढलेली असते. माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी लोकांची प्रचंड धडपड सुरू असते. सगळी गर्दी रथाच्या भोवती गोळा होते. मग त्यांना सुरक्षितपणे बाजूला काढणं गरजेचं असतं. कारण रथ मार्गक्रमण करतच असतो. घाईगडबडीत एखादा भाविक रथाच्या चाकाखाली पडू शकतो, येणारी गर्दी खाली पडलेल्याच्या अंगावरून जाऊ शकते. म्हणजे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते. मग अशा वेळेला पोलीस रथाला कडं करतात.

दर्शनासाठी आलेल्या लोकांना दर्शन घेतल्यानंतर सुरक्षितपणे बाहेर काढणं आणि दुसर्‍या भाविकाला दर्शन घेण्यासाठी येऊ देणं, हे मोठं अवघड काम असतं. कारण रथ चालत असतो आणि दर्शन घेणंही सुरू असतं. यात भाविकांना दर्शनासाठी खूप वाट पाहावी लागणार नाही, हे पाहावं लागतं. हे सर्व घाटात सुरू असतं. त्यामुळं तिथून पालखीला मार्गस्थ करणं हे खूप चॅलेंजिंग असतं. यात शारिरीक कष्ट खूप आहेत. दमणूकही होते, पण सेवा हाच स्‍थायीभाव असल्‍यानं आपल्याला कळतही नाही, की आपण हा घाट कसा पूर्ण केला.

आजूबाजूला अभंग गायन सुरू असते. टाळ-मृदंगांचा आवाज घुमत असतो. अशा प्रसन्न वातावरणात वाटचाल करत पालखी नीरेकाठी पोहोचते. नीरास्नानानंतर पालखी सातारा पोलिसांच्या हद्दीत पोहोचते. पुढचं बंदोबस्ताचं काम सातारा जिल्ह्याचे पोलीस करतात. हा बंदोबस्त सातारा पोलीस सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील धर्मपुरीपर्यंत पाहतात. यादरम्यान अनेक पोलीस अधिकारीही बंदोबस्त करता करता पायी वारीत सहभागी होऊन वारकर्‍यांसोबत चालत राहतात.

आपण सावधगिरी बाळगलीच पाहिजे
वारीदरम्यान काही काळजी, सावधगिरी आपण बाळगलीच पाहिजे. कारण वारीमध्ये सहभाग होणारा समुदाय खूप अफाट असतो. अशा वेळेला कुणी घातपात करायचे ठरवलं, तर ते अशक्य नाही. वारीदरम्यान वारकऱ्यांना कुणी इजा पोहोचवायचं ठरवलं, तर ते सहज करू शकतात. एखाद्या बेवारस वस्तूंच्या माध्यमातून तिथं स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. त्याबाबतची सर्व काळजी घेण्यासाठी वारीच्या बंदोबस्तादरम्यान पोलीस प्रशासनाकडून बॉम्बशोधक पथकाची नेमणूक केली जाते. हे पथक पहिल्यांदा पालखीतळाची तपासणी करतं. तुकोबारायांची पालखी वा माऊलींची पालखी जिथे कुठे जाणार असेल, तिथे अगोदर हे पथक पोहोचतं. तिथली बारकाईनं पाहणी करतं. बेवारस वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन नागरिकांना केलं जातं.

त्याबाबतची जागृती आम्ही त्यांच्यात घडवून आणतो. ‘तुमच्या मौल्यवान वस्तू जपा, तुमच्या बॅगा व्यवस्थित सांभाळा, ढकलाढकली करू नका, वाहनास मनाई आहे किंवा एकेरी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावरून विरूद्ध दिशेनं वाहनं चालवू नका, कुठं अनुचित प्रकार घडला असेल, वा बेवारस वस्तू आढळली असेल, तर पोलिसांशी त्वरीत संपर्क साधा’ आदी सूचना आम्ही देत राहतो.

हा सगळा सोहळा अधिक सुखकर कसा होईल, यावर आमचा अधिक भर असतो. त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या बाबी शक्य आहेत, त्या त्या आम्ही करतो. गावागावांतून पालखी मार्गस्थ होत असताना दर्शनासाठी अचानक मोठी गर्दी होत असते. कधी कधी मूळ पालखीतल्या लोकांना पुढं चालणंही अशक्य होतं. पायी वारीत सहभागी असणारेही विठ्ठलभक्त असतात आणि पालखीच्या दर्शनासाठी येणारेही भक्त असतात. पण पालखी न थांबता मार्गस्थ झाली पाहिजे, याकडे कटाक्ष ठेवावा लागतो. अशा वेळी पोलीसांना पालखीला कडं करून चालावं लागते. लोकांना विनंती करत पालखी मार्गस्थ करावी लागते.

पालखीतळाच्या ठिकाणी भाविकांची पालखी येण्याअगोदर गर्दी जमलेली असते. मग तिथेही बॅरिकेटिंग करणं गरजेचं असतं. दर्शनासाठी येणार्‍या लोकांच्या पार्किंगची, दर्शनाची सुविधेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते. बॅरिकेंटींग करणं, सीसीटीव्ही लावणं आणि लोकांशी समन्वय साधणं हे गरजेचं असतं. पाऊसकाळात महसूल प्रशासनाकडून रस्त्याचं डांबरीकरण करून घेणं, खडी टाकणं, क्रेनची व्यवस्था उपलब्ध करून देणं या सगळ्या गोष्टी त्वरीत कराव्या लागतात. पालखी तळांच्या ठिकाणी स्वच्छता, आंघोळीची व्यवस्था आदी सगळ्या गोष्टी महसूल प्रशासन बघत असतं. सेक्युरिटी आणि स्मूथ फ्लो या गोष्टी पोलीस प्रशासन बघत असतं.

विना क्रमांकांच्या दिंड्यांचे व्यवस्थापन

वारीचं असं स्वतःच व्यवस्थापन असतं. पालखीच्या रथासमोरील दिंड्या आणि रथामागील दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात. त्या क्रमांकानुसार ते चालत असतात. मात्र बदलत्या काळानुसार अनेक नव्या दिंड्या या पालखीमार्गात सहभागी होत असतात. या दिंड्यांचं व्यवस्थापन करताना मूळ दिंड्यांच्या चालण्याच्या वेगावर, त्यांना लागणार्‍या साधनसामुग्रीवर ताण येऊ नये, यासाठी त्यांचं व्यवस्थापनही स्वतंत्रच करावं लागतं. विशेषतः नवीन विनाक्रमांकाच्या दिंड्या सहभागी झाल्या असतील, तर त्यांना क्रमांकाच्या दिंड्यांपासून आम्ही पुढं जाण्यास सांगतो.

एक, दोन किलोमीटर अंतर ठेवून या विनाक्रमांकाच्या दिंड्या चालत राहतात. तीच बाब रथाच्या मागील दिंड्याच्या बाबतीतही लागू करतो. तेही अंतर ठेवूनच चालतील याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाते. वारीत आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते, अशी वारकऱ्यांची मानसिकता असते. तशीच मानसिक तयारी ठेवून पोलीसह आनंदीने बंदोबस्तात सहभागी होतात.

पालखी सोहळ्यातील फेरीवाल्यांना विनंती

पालखीत जसे वारकरी सहभागी होतात, तसेच अनेक फेरीवालेही सहभागी होत असतात. मात्र या फेरीवाल्यावर काही नियंत्रण वा त्यांच्या नोंदी ठेवताच येत नाही. कारण सहभागी होणारे हे छोटे व्यावसायिक हे काही गुन्हेगार नसतात. बिचारे अतिशय गरीब असलेले हे लोक अनेक शहरांमधून, गावांतून वारीत येतात. वारीदरम्यान आपला थोडाफार व्यवसाय होईल, थोडाबहुत रोजगार उपलब्ध होईल, या ओशेनं ते वारीत सहभागी होत असतात. मात्र त्यांनीही वारीला अडथळा होईल, अशा ठिकाणी थांबू नये, यासाठी पोलीस प्रयत्न करतात.

अनेक ठिकाणी अगदी छोटे गल्लीबोळ असतात. अशा ठिकाणी हे फेरीवाले थांबले, तर सोहळा पुढे जाण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी हॉकर्स स्कॉड्स जाऊन त्याला बजावते, की ‘तू येथे आपला स्टॉल, गाडी लावू नकोस. अमूक ठिकाणी लाव. इथल्या तुलनेत तुझं गिर्‍हाईक थोडं कमी होऊ शकेल, पण इथं पालखीला अडथळा होईल’. अर्थात हे संबंधितांना समजून, समन्वयानं सांगितलं जातं.

पोलीस आणि विश्‍वस्त यांच्यात समन्वय

पालखी सोहळ्यासंदर्भात जिल्ह्यात अनेक बैठका होतात. रेंजच्या पातळीवरही दोन तीन बैठका होतात. या बैठकांदरम्यान कुणाला कोणत्या साहित्याची गरज आहे, मागील काही वारीदरम्यान राहिलेल्या त्रुटी, आलेल्या अडचणी, त्यानुसार करावयाच्या उपाययोजना अशा अनेक बाबींची चर्चा होते. शिवाय वारीदरम्यानच्या बंदोबस्तासाठी काही प्रशिक्षणही देण्याची गरज भासते. तेही दिलं जातं. मागील बर्‍याच वारींचा बंदोबस्त पाहिलेले कर्मचारी असतात. त्यातील काही निवृत्तही होत असतात. त्यांच्या जागेवर अगदी नवखे, वारी बंदोबस्ताचा काहीच अनुभव नसलेले अधिकारीही सहभागी होत असतात, त्यांना वारी समजून सांगणं आवश्यक असतं.

पंढरपुरातील बंदोबस्त म्हणजे परीक्षा

पंढरपुरात चंद्रभागेच्या महाद्वार घाटातून लोकं वर येत असतात. त्याच वेळी नगर प्रदक्षिणा मार्गावरून पालख्या येत असतात. चंद्रभागेत स्नान करून आलेल्या भाविकांना मंदिराकडं जाण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्ग ओलांडायचा असतो, जो गर्दीने वाहत असतो. अशा वेळी आम्हाला ‘होल्ड एण्ड रिलीज’ करावं लागतं. नाही तर भाविक एकमेकांत घुसून चेंगराचेंगरी होऊ शकते. त्यामुळं आम्ही काय करतो, की एका वेळेला महाद्वाराकडून येणाऱ्यांना थांबवतो आणि प्रदक्षिणावाल्यांना जाऊ देतो. तर, दुसर्‍या वेळेला प्रदिक्षणावाल्यांना थांबवतो आणि महाद्वारवाल्‍यांना जाऊ देतो.

ते ट्राफिकचं काम प्रचंड अवघजड असतं. पोलिसांना तिथं दोर पकडून उभं राहावं लागतं. तिथं कुणाचा आवाज कुणालाच येत नाही. तुम्ही कितीही ओरडा. या बंदोबस्‍ताचं पोलीसांना व्यवस्‍थित प्रशिक्षण द्यावं लागतं. नाही तर मंदिराकडं सोडणं वा रोखून धरणं याचं टायमिंग चुकलं तरी मोठा गोंधळ उडू शकतो.

अशीच स्‍थिती रिंगणाच्या वेळीही असते. रिंगणात अश्‍व धावतात, त्याच्या पाठोपाठ झेंड्यावाले धावतात, वीणेकरी धावतात, वीणेकऱ्यांचा राऊंड पूर्ण झाला की तुळशी डोक्यावर घेतलेल्या महिला धावतात, त्यानंतर टाळकरी धावतात. असे पाच-सहा राऊंड झाल्यानंतर सर्वजणच धावतात. तेव्हा खूप गोंधळ होण्याची शक्यता असते. तिथंही ‘होल्ड एण्ड रिलिज’ करावं लागतं. अश्‍व पळत असतात तेव्हा लोकांना त्यांची पायधूळ घ्यायची असते. त्यांना हात लावायचा असतो. हे सगळे श्रद्धेचे भाग असतात. या सर्व प्रकारांत जीविताची हानी होऊ नये, कुणालाही इजा होऊ नये हे पोलीसांना बघावं लागतं. त्यामुळं पोलीस जवान वारकऱ्यांना सतत प्रेमानं समजावत असतात.

गावकरी होतात स्‍वयंसेवक

पालखी जिथं जाते, त्‍या गावांसाठी तो आनंदाचा सोहळा असतो. गावकरी स्‍वयंस्‍फूर्तीनं पोलिसांशी को-ऑर्डिनेट करत विविध उपक्रमांत सहभागी होत असतात. पालखीच्या तारखा निश्चित झाल्‍यानंतर लगेचच गावागावांतील स्‍वयंसेवकाचं पथक पोलीसांच्या समन्वयात राहून आवश्यक ती मदत करत राहतात. हे गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कोरोना काळात दोन वर्षे पायी वारी झाली नाही. त्यामुळं यंदा दरवर्षी पेक्षा किमान दोन ते तीन लाख वारकरी वाढण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळं जिथं १० ते १२ लाख वारकरी येतात, तिथं १२ ते १४ लाख वारकरी येण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार पोलीसांनी बंदोबस्‍ताचं नियोजन केलं आहे.

सहृदयतेनं वारकऱ्यांना मदत करा

वारीनिमित्त मी सर्वांना विशेषतः वारी मार्गावरील ग्रामस्‍थांना एक आवाहन करू इच्छिते की, वारीसाठी देशाच्या कानोकापऱ्यातून सर्व स्‍तरातील माणसं येत असतात. तेव्हा माणुसकीच्या नात्‍यानं वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या छोट्या छोट्या गरजांसाठी आपण उपयोगी कसं पडू शकू, त्‍यांना मदत करण्यासाठी सकारात्‍मक कसं राहू, याबाबत विचार करावा. उदा. अनेक महिलांना वॉशरूम, पिरीयड्‌स, आजार आदींच्या अनुषंगाने अडचणी येत असतात.

त्यावेळी तुमच्या घरातल्या सदस्य म्हणून त्यांना मदत करणं, आपल्‍या घरात जागा उपलब्‍ध करून देणं अशी छोटी छोटी मदतही खूप महत्त्वाची ठरू शकते. अनेकदा एखादा रस्‍ता पोलीस वाहतुकीसाठी वारीदरम्‍यान एकेरी करतात वा बंद करतात. तरीही अनेकजण त्‍या रस्‍त्‍यात घुसतात. ज्‍यातून अपघाताची शक्‍यता असते. तसं न करता नागरिकांनी आपल्या आणि वारकऱ्यांच्या जीवाला जपण्याला प्राधान्य द्यावं आणि प्रेमानं वारीत सहभागी व्हावं, असं आवाहन यानिमित्तानं मी करते.

(तेजस्‍वी सातपुते या सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक आहेत.)

1 thought on “कर्तव्याची एक वारी पूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *