कारवाईच्या मागणीसाठी

महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने

पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी संतांविषयी अपशब्द वापरत वादग्रस्त वक्तव्ये केली. त्याचे काही व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. त्यावर समस्त वारकरी आणि संबंधित संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

या वादात आता राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच अंधारे यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी केली जाते आहे. यावर वारकरी संप्रदायाने शनिवारी (दि. १७) ‘ठाणे बंद’ पुकारला. त्याला शिंदे गट आणि भाजपनेही पाठिंबा दिला.

पुण्यातही वारकरी संप्रदाय पुणे शहर, परिसर आणि उपनगरांतील संघटनांनी सुषमा अंधारे यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदंग वादन करीत भजन करून प्रशासन आणि पोलिसांनी अंधारे यांना योग्य समज देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. भारतीय वारकरी मंडळ, वारकरी संप्रदाय युवा मंच, अद्वैत वारकरी मंडळ, क्षत्रिय मराठा दिंडी, पश्चिम विभाग वारकरी, भवानी पेठ पालखी मंडळ, कसबा पेठ भजनी मंडळ, पाषाण आणि बाणेर वारकरी भजनी मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मवीर अध्यात्मिक सेना यांसह शहरातील भजनी मंडळांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. माणिक महाराज मोरे, ह. भ. प. शिरीष महाराज मोरे, ह. भ. प. भाऊ महाराज फुरसुंगीकर, ह. भ. प. अक्षय महाराज भोसले, ह. भ. प. माधवी निगडे, मृदुंगाचार्य दातार गुरुजी, सुनील रासने आदी उपस्थित होते. यावेळी वारकरी संप्रदायातील उपस्थितांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वाद नेमका काय? अंधारे यांचा व्हिडिओ…
“संतांनी रेड्याला शिकवले. पण माणसांना कुठे शिकवले?’, असे सुषमा अंधारे यांनी म्हटल्याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. याशिवाय संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्याबद्दलही अंधारे यांनी वादग्रस्त टिप्पणी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्व वारकरी संघटना एकवटल्या आहेत.

अंधारे यांनी मांडली भूमिका
दरम्यान, हे व्हिडिओ व्हायरल झाले आणि चौफेर टीका सुरू झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणतात, “शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही. आधी मी भाष्य केलं असलं, तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही. माझे जुने व्हिडिओ व्हायरल केले जातात, मग हे लोक १० ते १५ वर्षे हे कुठे गेले होते?’

वारकरी साहित्य परिषदेचे निवेदन
महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा ही केवळ संतांच्या विचाराची द्योतक आहे. पण सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. भागवत धर्माची उभारणी करणाऱ्या संतांचे असे विकृत टीकात्मक विडंबन करणे निषेधार्ह असल्याने अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे. देहुरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी निवेदन स्वीकारले. परिषदेचे अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे, लक्ष्मण शेरकर, सविता गवते, विठ्ठल अण्णा भापकर, आनंदराव महाराज कदम, श्यामराव महाराज गायकवाड, आदींनी ही मागणी केली आहे.

…तर किंमत मोजावी लागेल
“वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. पण, राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली, तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,’ असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.

पंढरपूर येथील वारकरी म्हणतात :
अंधारे यांच्या वक्तव्यांबाबत पंढरपूर येथील ह.भ.प. राणा महाराज वासकर म्हणाले, ” वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. परंतु आमच्या श्रद्धास्थानांची राजकीय स्वार्थासाठी कोणी खोड काढली, तर आक्रमक भूमिका घेतली जाईल. अंधारे यांचे हे वक्तव्य जुने किंवा नवे असा मुद्दा मुळीच नाही. पण, त्यात वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माविषयी तिरस्कारयुक्त भाषा आणि देहबोली हा मुद्दा आहे. त्यामुळे फक्त माफी मागून हा मुद्दा संपणारा नाही. यापुढे असा प्रकार झाला, तर आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबवू. ‘

तर, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनीही अंधारे यांचा निषेध केला आहे. ते म्हणातात, “आपण केलेली वक्तव्ये आजही कोणीही ऐकू शकतो, हे लक्षात आल्यावर आणि निषेध होऊ लागताच अंधारे या केवळ शब्द फिरवत आहेत. याला माफी मागितली असे म्हणता येत नाही. त्यांच्या वक्तव्यांनी फक्त वारकरी संप्रदायाच्याच नाही, तर तमाम हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर म्हणाले, “वारकरी संप्रदायामध्ये संतांबद्दल मोठी श्रद्धा आहे. अंधारे यांनी केलेली वक्तव्ये निषेधार्ह आहेत. यापुढे अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्यांविरुद्ध सरकारने कायदा करावा.’

“वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली, तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नाही. त्यांच्याविरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी विश्व वारकरी संघाच्या वतीने तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे.

महानुभव पंथही आक्रमक
याशिवाय सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *