सद्गुरू भोजलिंग महाराज

यांची घेरडीत मूर्ती प्रतिष्ठापना

सांगोला : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच वारकरी संतांचे वंशज येत्या २ ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एकत्र येत आहेत. निमित्त आहे, वै. सद्गुरु भोजलिंग महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे.

वारकरी संप्रदायातील सत्पुरुष वै. सद्गुरु भोजलिंग महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून मंगळवारी (दि. २ ऑगस्ट) सांगोला तालुक्यातील घेरडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वै. सद्गुरु भोजलिंग महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायातून समाज प्रबोधनाचे काम केले. निरपेक्ष सेवाभावनेने वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला. त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, समाधी स्मारकाचे कलशारोहण आणि त्यांच्या स्मृती विशेषांकाचा प्रकाशन सोहळा २ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानिमित्त वारकरी संप्रदायात प्रमाण असलेल्या नऊ थोर वारकरी संतांचे वंशज प्रथमच एकत्रित उपस्थित राहत आहेत.

संत नामदेव महाराजांचे वंशज ह. भ. प. माधव महाराज नामदास, संत सावता महाराजांचे वंशज ह. भ. प. रविकांत महाराज वसेकर, संत नरहरी महाराजांचे वंशज ह. भ. प. प्रमोद महाराज महामुनी, संत चोखामेळा महाराजांचे वंशज ह. भ. प. अभिमन्यू महाराज सर्वगोड, संत भानुदास आणि संत एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, संत शेख महंमद महाराजांचे वंशज ह. भ. प. मोसिम महाराज शेख, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, संत संताजी महाराजांचे वंशज ह. भ. प. जनार्दन महाराज जगनाडे तसेच फडकरी प्रतिनिधी म्हणून ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर या सर्वांच्या शुभहस्ते सद्गुरु संत भोजलिंग महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन घेरडीकर फडाचे प्रमुख आणि सद्गुरु भोजलिंग महाराजांचे वंशज ह. भ. प. स्वप्निल महाराज बंडगर तसेच ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी केले आहे.

असे आहेत कार्यक्रम –
दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ०८:४५ वाजेपर्यंत सद्गुरु भोजलिंग महाराज मूर्तीची नगरप्रदक्षिणा, सकाळी ०९:४५ ते १०:१५ सद्गुरु भोजलिंग महाराज मूर्ती प्रतिष्ठापना, सकाळी १०:१५ ते १०:३० कलशारोहण सोहळा ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांचे हस्ते होईल. सकाळी १०: ४५ ते १२: ४५ पुष्पवृष्टीनिमित्त ह. भ. प. स्वप्निल महाराज बंडगर यांचे कीर्तन होईल.

त्यानंतर  ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर संपादित सद्गुरु भोजलिंग महाराज स्मृती विशेषांकाचे प्रकाशन आणि दुपारी ०१:२० ते ०२:२० सकल संत वंशज आशीर्वचनपर मनोगत व्यक्त करतील. दुपारी ०२:३० पासून पुढे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. हा कार्यक्रम घेरडीतील सद्गुरू भोजलिंग महाराजांच्या समाधी स्मारक परिसरात पार पडेल.

1 thought on “संतांचे वंशज येणार एकत्र

  1. ह.भ.प.संत भोजलि‌ं‌ग महाराज मुर्ती प्रतिष्ठापना या भक्तीमय सोहळ्यास मनस्वी शुभेच्छा …,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *