ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर
पुष्पवर्षाव, घंटानाद, नामगजर
आळंदी : सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे उघडून देणाऱ्या, विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६ वा समाधी सोहळा आज (दि. २२) हरिनामाच्या गजरात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
पहाटे तीन ते चार या वेळेत माऊलींच्या समाधीला पवमानाभिषेक तसेच महापूजा झाली. सकाळी सात वाजता हैबतबाबा पायरीपुढे आणि वीणामंडपात कीर्तन पार पडले. सकाळी १० वाजता संजीवन समाधी सोहळ्याचे परंपरेप्रमाणे संत नामदेव महाराजांचे वंशज ह. भ. प. नामदास महाराज यांचे कीर्तन झाले. तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा झाली. दुपारी १२ वाजता समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती होणार आहे.
आळंदीत दि. १७ नोव्हेंबरपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला आहे. एकादशीच्या दिवशी (दि. २०) सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी अलंकापुरीत हजेरी लावली होती. द्वादशी दिनी सोमवारी (दि. २१) वीणा, टाळ, मृदंगाच्या गजरात, माऊलींच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींचा वैभवी रथोत्सव सोहळा पार पडला. अनेक भाविकांनी माऊलींचा रथ ओढण्यास हातभार लावला.
माऊलींची पालखी खांद्यावर घेत महाद्वारातून शनिमंदिर मार्गे गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात आली. श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली. ‘माऊली माऊली‘च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत चाकण चौक,भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक या मार्गे ग्रामप्रदक्षिणा झाली. नंतर मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली.
आज (दि. २२) संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध धर्मशाळा, इंद्रायणी नदी घाट आदी ठिकाणी संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रसंगांवर आधारित कीर्तने, संत नामदेवरायांच्या वतीने नामदास महाराज परिवाराच्या वतीने महापूजा, परंपरेनुसार वीणामंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे कीर्तन सेवा रुजू होईल.
सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन, महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षाव,आरती आणि घंटानाद होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप आणि महानैवेद्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी श्रींचा गाभारा खुला होईल. सोपानकाका देहूकर यांचे वतीने वीणा मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांच्या वतीने हरिजागर होणार आहे.