टाळ -मृदंगाच्या गजरात देहूतून

तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

देहू : ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’ या संत तुकाराम महाराजांनी अभंगातून केलेल्या आवाहनाप्रमाणे टाळ आणि मृदंगाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीने आज (दि. २८) दुपारी दोन वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. परंपरेप्रमाणे सायंकाळच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात विसावली.

शुक्रवारी पहाटे मुख्य मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा झाली. पालखी सोहळा सुरू करणारे तपोनिधी नारायण महाराज यांची समाधीपूजा झाली. तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. तिथून त्या मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या. सकाळी १० ते १२ या कालावधीत पालखी सोहळा सप्ताहाचा काला झाल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे यांच्यासह राजकीय प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांचा हा ३३९वा पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. मानाचा वारकरी आणि पाहुण्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून पादुका पालखीत विराजमान झाल्या.

पालखीने जसे प्रस्थान ठेवले, तसा टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारकऱ्यांच्या अंगात उत्साह संचारला. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर त्यांनी ताल धरला. तल्लीन होऊन ते डोलू लागले, नाचू लागले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. दुसरीकडे तुकोबांच्या पादुकांवर माथा ठेवण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली होती.

प्रस्थानाच्या वेळी देहू येथे समाधी मंदिरात खासदार सुनेत्रा पवार यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. ‘संत तुकाराम महाराज यांच्या भूमीतला वैष्णवांचा मेळा पाहून मिळणारे अध्यात्मिक समाधान शाश्वत आहे. संत तुकाराम महाराज यांनी मला जनतेची सेवा करण्याचे बळ द्यावे’, अशी प्रार्थना खासदार सुनेत्रा पवार यांनी केली.

‘वारी हा महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. वारीची परंपरा मोठी आहे. वारी ही संतांनी सुरू केलेली समतेची चळवळ आहे. देशभरातून भाविक वारीला येतात, विठ्ठलाचा नामघोष करतात. आबालवृद्ध विठ्ठलभक्तीत तल्लीन होतात. इथे आल्यावर ऊर्जा मिळते. ही अध्यात्मिक ऊर्जा प्रेरणादायी असते,’ असेही त्या यावेळी म्हणाल्या.

देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्यांचे व्यक्तीशः लक्ष घालून निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी महिला वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचे प्रश्न समजून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *