आज दुपारी दोन वाजता होणार

तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

देहू : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठीआज (दि. २८) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी वारकऱ्यांनी फुलून गेली आहे. देवस्थान आणि प्रशासन प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाले असून, पहाटे साडेचार वाजल्यापासूनच मुख्य मंदिरात कार्यक्रम सुरू झाले आहेत. दुपारी दोन वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे.

श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९ वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. त्या अनुषंगाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयी सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे.

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

प्रस्थान कार्यक्रमाची रुपरेषा-

पहाटे ४.३० – महापूजा

५ ते ७ – काकडा८

ते ९ – गाथा भजन१

० ते १२ – काल्याचे किर्तन१

२ ते १ – जरीपटका सन्मान

१ ते २ – पादुका पूजन व सत्कार

दुपारी २ – पालखी प्रस्थान

सायंकाळी ६ – पालखी मुक्काम

रात्री ९ ते ११ – किर्तन, जागर

प्रशासनाची तयारी-

– शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक
– सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर
– मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा
– दिंडीप्रमुखांचा सत्कार
– पालखी मार्गावर वृक्षारोपण
– फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे
– वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध
देहू नगरपंचायतीच्या वतीने यंदा प्रथमच भाविक आणि वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी, सुविधांचा स्थानदर्शक नकाशा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फलकांवर ‘क्यूआर कोड’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो स्कॅन करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

देहू परिसरात वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरती शौचालये, अग्निशमन वाहने, दवाखाना, सरकारी एनडीआरएफ (जीवरक्षक जवान), वाहनतळ, स्थानदर्शक फलक, इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्या त्या सुविधेचा क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

क्यूआर कोडमुळे भाविकांनी त्या ठराविक ठिकाणापासून सुविधा किती अंतरावर आहे याची माहिती मिळेल. देहूत विविध ठिकाणी हे क्यूआर कोडचे फलक उभारण्यात आले आहेत. हे क्यूआर कोड सर्व विणेकरी, दिंडीकरी यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *