पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात;
लोणंद येथे दोन दिवसांचा मुक्काम
नीरा : ‘माऊली माऊली’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना आज (दि. ६) नीरा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. लोणंद गावातील नागरिकांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पालखीचा या ठिकाणी अडीच दिवस मुक्काम आहे.
माऊलींच्या पालखीने पाडेगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मुख्यकार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.
पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माउलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता.
पालखी सोहळा लोणंद येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचल्यावर लोणंद गावच्या वतीने सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य आदी ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तानाजी चौकात पालखी रथातून उतरवून लोणंद ग्रामस्थांनी वाजतगाजत पालखी तळावर नेली. सायंकाळच्या समाज आरतीनंतर पालखी सोहळा मुक्कामी विसावला. नंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.