संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे
भल्या सकाळी शेगाव येथून झाले प्रस्थान
बुलडाणा : संत श्री गजानन महाराज, सर्व वारकरी संत आणि विठुरायाच्या जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने आज (दि. १३) येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सकाळी सात वाजता प्रस्थान ठेवले.
भल्या सकाळी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, संस्थानचे विश्वस्त, वारकरी आणि भाविक उपस्थित होते. २५० पताकाधारी, २५० टाळकरी २०० सेवेकरी असा ७०० शिस्तबद्ध वारकऱ्यांचा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली. पुढील एक महिना पायी प्रवास करून १५ जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचेल. पालखी सोहळ्याचे यंदा ५५वे वर्षे आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविले जाते. गजानन महाराजांनी हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे या पालखी सोहळ्याला विदर्भात मोठे महत्त्व आहे.
संत गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्याकरिता अनेक भाविक शेगावात दाखल झाले होते. गुरुवारी वारीला येणारे भाविक तसेच विदर्भ, खान्देश, मराठवाडा, मुंबई, पुणे, नागपूर येथील भाविक प्रस्थानासाठी शेगावात जमले होते. सर्वांनी श्री क्षेत्र नागझरीपर्यंत पायी वारी करुन महाराजांच्या पालखीला निरोप दिला.
शेगावातून प्रस्थान झाल्यानंतर पालखी दुपारी नागझरी येथे विसावली. तेथे संत गोमाजी महाराजांच्या भूमीत महाप्रसाद घेतल्यावर पालखी पुढे मार्गस्थ झाली. आज पालखीचा पहिला मुक्काम पारस (जि. अकोला) येथे आहे. १४ जूनला पारस येथून गायगाव येथे महाप्रसाद आणि त्यानंतर भौराद येथे मुक्काम राहील. आजवरच्या परंपरेप्रमाणे पालखी १५ आणि १६ जून असे सलग दोन दिवस अकोला महानगरीत मुक्कामी राहणार आहे.
आषाढी एकादशी १७ जुलैला आहे. या दिवशी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतात. राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. त्यात विदर्भातून सामील होणारा हा सोहळा सर्वाधिक अंतराची वाटचाल करतो.
श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून ३३ दिवस मार्गक्रमण करीत ७५० किलोमीटरचे अंतर पार करते. सोहळ्यात अँम्बुलन्स, डॉक्टर, टँकर आदी सुविधा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी २९ जूनला प्रस्थान होणार आहे. त्याअगोदर एक दिवस म्हणजे २८ जून रोजी देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.