दरवर्षी नियमाने वारी करणाऱ्या

एका टीव्ही पत्रकाराचा भक्तीभाव

मी अनुभवला आहे, वारकऱ्यांमधला निरागस पांडुरंग. नीरामाईच्या खळाळत्या पाण्यात संताच्या पादुकांना स्नान घालणारा पांडुरंग. दिवे घाटाच्या चढणीवर वारकऱ्यांसोबत नाचणारा पांडुरंग. मल्हारीच्या जेजुरीत माऊलींच्या पादुकांवर भंडाऱ्याची उधळण करणारा पांडुरंग. मी त्याला वारीच्या प्रत्येक टप्प्यावर असा अनंत रुपांत, अनंत वेषात पाहिला आहे. तो तुम्हालाही दिसेल, फक्त हृदयात भक्तीभाव हवा…

विशाल सवने

वारी खूप काही शिकवते. वारी क्षणाक्षणाला समृध्द करत असते.अशीच वारीच्या वाटेवरची एक आठवण सांगतो. तुम्ही पायी वारी सोहळ्यात असला की, तुमच्या कानावर एक आवाज पडत असतो. तो म्हणजे, “माऊली गंध… माऊली गंध” अनेकदा साधारण ८ ते १३ वयोगटातील लहान मुलं आपल्याला नाम लावतात. म्हणजे वारकऱ्यांच्या कपाळावर जो इंग्रजी ‘यू’ आकाराचा टिळा असतो तो. मग ज्यांना हा नाम लावलेला असतो ती माणसं यांना दोन-पाच रुपये देतात. मी इंद्रायणीच्या काठावर बातमी लिहित बसलो होतो.

माझ्या कानावर आवाज आला “माऊली गंध…” मी वळून पाहिलं आणि म्हटलं, “अहो माऊली आहे की कपाळावर नाम” समोर उत्तर आलं. “गेला पुसून पार…” मी म्हटलं, “मग लावा बरं…” मी त्या लहान मुलाला काही पैसे दिले. आणि सहज विचारलं खूप पैसे जमत असतील ना? काय करता इतक्या पैशांचं? तो म्हणे, “काही नाही तेवढीच घरी मदत होते आईला. आता शाळा सुरू झालीय ना… तर वह्या, पुस्तकं घेतो.”

त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र होता. त्यालाही विचारलं, काय करणार पैशाचं? तो सुद्धा म्हणे “यंदा शाईचा पेन घेणार आहे. शाईचा पेन हातात असला की, लय भारी वाटतं”. त्यांची उत्तर ऐकून मी मनातच म्हटलं, या वयात यांना इतकी समज आहे. यांच्या वयाचा मी असताना मला तर इतकी समज नव्हतीच. या वारीत या लहान माऊलींनी मला मोठं आर्थिक नियोजन शिकवलं.

चालविसी हाती धरोनिया

आणखीन एक असाच प्रसंग. मी दिवेघाटात होतो. वारकरी सासवडच्या दिशेने चालत होतो. अभंग, कीर्तनात माऊलींच्या नामस्मरणात, टाळ मृदंगाच्या गजरात, हे वारकरी दंग होते. या सगळ्यांमध्ये एक वारकरी चालत होते. वयस्कर होते ते. साधारण वय सत्तरीच्या आसपासचं. त्यांच्या चेहऱ्यावर वयोमानानुसार सुरकुत्या होत्या. त्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी मळलेली होती.

त्यांनी तीन गुंड्यांचा शर्ट घातलेला होता. शर्टाची वरची दोन बटणं तुटलेली होती. त्यातून त्यांच्या गळ्यातली असणारी तुळशीची माळ बाहेर डोकावत होती. पायात चप्पल नव्हतीच. मी त्यांच्याजवळ गेलो म्हटलं विचारपूस करावी. जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तेव्हा ते नेत्रहीन असल्याचा लक्षात आलं. म्हटलं, “माऊली बरं आहे का”? ते म्हणाले, “होय बरं आहे पोरा”. म्हटलं, माऊली पंढरीकडे निघालाय, राग येणार नसेल तर एक विचारू का? ते, म्हणाले “विचारा”.

मी विचारलं, “तुमच्या सोबत कोण नाही. एवढ्या लांबचा पल्ला एकट्याने कसं काय गाठणार? हातात तुमच्या काठी पण नाही. एखादी काठी आणून देऊ का?” त्यांनी उत्तर दिलं, “एकटा कुठे आहे मी? माझा हात साक्षात पांडुरंगानं पकडला आहे. पोरा माझा डोळा तो पांडुरंग आहे. तोच मला वाट दाखवतो मी फक्त चालतो”. मी त्यांना नमस्कार केला…

आषाढी एकादशीच्या दिवशी मी पांडुरंगाच्या मंदिरात मानाचे वारकरी कोण आहेत? याचा शोध घेत होतो. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भल्याची, शेतकऱ्यांच्या भल्याची प्रार्थना पांडुरंगाकडे केली होती. पण त्या सगळ्या गर्दीत ते आजोबा मला पुन्हा दिसले. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना माझी ओळख सांगितली आपली भेट झाली होती हेही सांगितलं. त्यांनी मान डोलावली. आणि ते पांडुरंगाच्या दर्शन रांगेकडे जाऊ लागले. “माझा हात पांडुरंगाने धरला आहे”. हे त्यांचं वाक्य मला पुन्हा आठवलं…

वारी जीवनाचा अर्थ सांगते

अनेक जण मला विचारतात की, वारी म्हणजे काय? तुझ्या नजरेतून वारी सांग. मी त्यांना एकच सांगतो, जीवनाचा अर्थ सांगते ती वारी. संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेनं रवाना होतात. मला वाटतं तो आपला जन्म आहे. वारीत आपण चालतो, दमतो, थकतो थोडा विसावा घेतो. ऊन, वारा, पाऊस झेलत वारकरी चालत असतो. पायात काटा मोडला, दगड रुतला तरी तो थांबत नाही.

तसंच आपल्या आयुष्यात चढ-उतार, संघर्ष येतात. अखेर वारकरी त्या सावळ्या विठुरायाच्या चरणावर माथा ठेकवतो आणि सर्व त्रास विसरून जातो. तसंच माणसाच्या जीवनाचा खरा उद्देश हा ज्ञान मिळवणं आहे. एका पुस्तकात वाचलं होतं वि म्हणजे ज्ञान आणि ठ्ठल म्हणजे स्थान. अर्थात ज्ञानाचं स्थान म्हणजे विठ्ठल. ज्ञानाचा पुतळा म्हणजे विठ्ठल. फक्त त्या माऊलीकडून मिळणारं ज्ञान आपल्याला घेता आलं पाहिजे.

मित्रांनो, आणखी एक. या पालखी सोहळ्यात रिंगण होतं, हे सुद्धा आपल्याला काही तरी शिकवत असतं. काय शिकवतं, तर ते आपल्याला नेहमी चालत राहायला शिकवतं. चालत राहाणं हे सजीवपणाचं लक्षण आहे. कसं? या सृष्टीत जी गोष्ट चालते, ती सजीव आहे. ज्यामध्ये हालचाल नाही तो तो मृत किंवा निर्जीव आहे. आकाशातील ग्रह तारे सुद्धा सजीव आहेत. ते सूर्याला केंद्र स्थानी ठेवून त्याच्या भोवती फिरत असतात. सूर्याकडून उर्जा मिळवत असतात.

तसंच रिंगणात सुद्धा संताच्या पादुका मध्यभागी ठेवून रिंगण सोहळा होत असतो. जणू हे रिंगण सूर्यमालेचं प्रतीक. सूर्याकडून जशी ग्रहांना उर्जा मिळते, तशीच उर्जा रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांना मिळत असते. याचं उत्तम उदाहरण वारीत पहायला मिळतं. तिथं ९० वर्षांचे आजोबासुद्धा १६ वर्षांच्या मुलाप्रमाणे फुगडी खेळत असतात.

एखाद्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यावर तो आपण चार्ज करतो. तसंच ही वारी आपल्याला चार्ज करत असते. जगण्याचं बळ देत असते. आलेल्या संकटावर मात कशी करायची हे शिकवत असते. भविष्याचे नियोजन हे कसं करावं हे सुद्धा वारीच शिकवत असते. संतांनी सांगितले ‘भेदाभेद अमंगळ…’ भेदभाव विसरून एक व्हायला वारीच शिकवते. शिस्तसुद्धा वारी शिकवते. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी करावी? हे सुद्धा शिकवते.

देवा, कोरोनाला नाहिसा कर

सलग दोन वर्षे कोरोनाचा संकट गडद होतं. त्यामुळे पायी वारी सोहळा झाला नाही. लाखो वारकऱ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. पालखी प्रस्थान, आषाढी एकादशी, पालखी मार्गावर होणारे सोहळे. हे सारं काही या दोन वर्षात आठवत होतं. प्रत्येक दिवशी वारीच्या वाटेवर वारकरी मनाने चालत होते. मात्र यंदा पांडुरंगानं या सगळ्यांवर कृपा केली. पायी वारी सोहळ्यावरचं संकट दूर झालं. या दोन वर्षांच्या काळात आपण कुठे जरी असलो; तरी त्या सावळ्या विठुरायाचं लक्ष आपल्यावर होतंच, असा माझा ठाम विश्वास आहे.

आता त्या परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना, देवा तुझं सावळं रूप आम्हाला दर वर्षी पाहायचंय आहे. तुझ्या समचरणावर‌ माथा ठेकवायचा आहे. पण आपल्या दोघांत आता ही कोरोनाची वगैरे बाधा नसावी. ही बाधा संपूर्ण जगातून नष्ट करून टाक एकदाची. राम कृष्ण हरी.

(विशाल सवने, झी २४ तास या न्यूज चॅनेलचे पत्रकार आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *