विविध धार्मिक उपक्रमांतून

माऊलींचे भावपूर्ण स्मरण

आळंदी : ‘माऊली माऊली’च्या गजरात, पुष्पवृष्टी, घंटानाद करून आज (दि. ११) श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७वा संजीवन समाधी सोहळा येथे दुपारी १२ वाजता हरिनाम गजरात पार पडला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पहाटे तीन वाजता प्रमुख विश्‍वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक झाला. सकाळी सात ते नऊ वाजता हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे कीर्तन झाले. ह. भ. प. नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले. कीर्तनात नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले. समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवार (दि. ५) पासून सुरुवात झाली होती. सोमवारपर्यंत (दि. ११) सुमारे तीन लाख भाविकांनी माऊलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन केले. या काळात अभिषेक, आरती, नैवेद्य असे नित्योपचार वगळता २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. तसेच लाखो भाविकांनी महाद्वारातून मुख दर्शन घेतले. आठवडाभराच्या सोहळ्या दरम्यान पाच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी आळंदीला भेट दिली. अनेक भाविक आठवडाभर आळंदी मुक्कामी राहिले. लाखो भाविक दशमीच्या रात्री आणि एकादशीच्या दिवशी आळंदीत पोहोचले आणि द्वादशीला (दि. १०) गावी परतले. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर जवळपास ९० टक्के भाविक गावी परतले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्यातर्फेही आळंदीतील विश्वरूपदर्शन मंचावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर वारकर्‍यांनी गुलाल, बुक्का, फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलींचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. या वेळी विश्वरुप दर्शनमंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केद्राच्या वतीने वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह. भ. प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.

या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह. भ. प. तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा. स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. मिलिंद पांडे आणि योगगुरू पाडेकर गुरूजी आदी उपस्थित होते.

यानिमित्त आयोजित सप्ताहात अर्जुन महाराज लाड गुरूजी, हरिहर महाराज दिवेगांवकर, रामराव महाराज ढोक, यशोधन महाराज साखरे आणि चिन्मय महाराज सातारकर या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन सेवा सादर केली. तसेच, प्रियंका ढेरंगे चौधरी, गायिका अपर्णा संत, ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके, पं. शौनक अभिषेकी आणि विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी अभंगवाणी, भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.

यावेळी ह. भ. प. बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले, “दुष्काळ पडला, तर जनावरे मरतात. मोठा दुष्काळ पडला माणसेही मृत्यूमुखी पडतात. तसेच चांगल्या संस्कार, विचारांचा दुष्काळ पडला, तर संपूर्ण मानवता मरते. त्यामुळे संताच्या विचारांची नितांत गरज आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन आणि भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रूजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर होेणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता, निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.” शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन, तर महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *