दोन दिवसांत चांदी काढून झाल्यावर

गर्भगृहातील ग्रॅनाईट काढली जाणार

पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन करण्याचा भाग म्हणून गर्भगृहातील चांदी काढण्यास आज (दि. १५ मार्च २०२४) सुरुवात झाली. गाभाऱ्यासोबतच, चौखांबी, सोळखांबी या भागांतील पुरातन दगडी बांधकामास लावलेली चांदी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. साधारणपणे पुढील दोन दिवसांत ही संपूर्ण चांदी काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

दिनांक १७ मार्चपासून प्रत्यक्ष गर्भगृहातील ग्रॅनाईट काढले जाणार आहे. यासाठी आता आजपासून केवळ दिवसातून ५ तासच देवाचे मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले आहे. उर्वरित वेळात मंदिर बंद ठेवून जीर्णोध्दाराचे काम सुरू राहणार आहे. यानंतर मंदिराचे पुरातन मूळ रूप भाविकांना पाहायला मिळेल. या कामामुळे विठुरायाचे पदस्पर्श दर्शन आजपासून सुमारे दीड महिना बंद ठेवण्यात येणार आहे. तयाबाबत दि. १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

हे काम सुरू असताना पहाटे पाच ते सकाळी पावणे अकरा यादरम्यान भाविकांना मुखदर्शन खुले असेल. अर्थात या कालावधीत देवाच्या नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. तसेच गाभाऱ्यात काम सुरू असताना श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती बुलेटप्रुफ काचेत बंदिस्त केली जाईल. ज्यामुळे काम करताना धुळीचे कण वगैरे मूर्तीवर पडणार नाहीत. या काळात पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार आहे, तथापि मुखदर्शन मंदिराबाहेरच्या स्क्रीनवरही दाखविले जाईल, असे मंदिर समितीचे सह कार्याध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी सांगितले आहे.

यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचा वज्रलेप निघाल्याचे प्रकार घडले होते. भिंतींना लावलेले चांदीचे पत्रे, ग्रॅनाईट आदींमुळे गाभाऱ्यात दमटपणा निर्माण होऊन मूर्तींना त्याचा उपसर्ग होईल, असा इशारा पुरातत्त्व विभागाने दिला होता. मूर्तींचे आयुष्य वाढवावे म्हणून भिंतींना मढवलेले चांदीचे पत्रे, ग्रॅनाईट आदी काढण्याच्या सूचना पुरातत्त्व विभागाने दिल्या होत्या. त्याचीच अंमलबजावणी आता मंदिर समितीकडून होत आहे.

या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. याअंतर्गत मंदिरात नव्याने केलेले बांधकाम, ग्रेनाईट फरशी, टाईल्स, लाईट फिटिंग, ऑईल पेंट आदी काढून मंदिराला मूळ, पुरातन स्वरूप प्राप्त करून देण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाने याबाबत सूचना केल्या होत्या. या कामाचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. मंदिर आवारातील महालक्ष्मी मंदिर आणि बाजीराव पडसाळी येथीलही काम सुरू झाले आहे.

साधारपणे ४५ दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत देवाचे मुखदर्शन रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत घेता येणार आहे. तसेच मंदिराबाहेरील स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. या कालावधीत चैत्री वारी आहे. दि. १५ एप्रिल ते २१ एप्रिल या वारी कालावधीत मुखदर्शन दिवसभर सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *