‘भानुदास-एकनाथ’च्या गजरामध्ये
श्री नाथबाबांच्या पालखीचे प्रस्थान
पैठण : पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीने आज (दि. २८) सायंकाळी साडेसहा वाजता पालखीप्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
यावेळी रेणुकादेवी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांनी नाथांच्या पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल, पैठण दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, माजी आमदार संजय वाघचौरे, तहसीलदार सारंग चव्हाण, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी आदी मान्यवर आणि हजारो वारकरी, भाविक उपस्थित होते. एकनाथ महाराजांच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले होते.
जेष्ठ वद्य सप्तमी (दि. २८) जून रोजी दुपारी १२ वाजता ४२५ व्या प्रस्थान सोहळ्याचे औचित्य साधून पालखी सोहळ्याचे मालक ह. भ. प. रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी पालखीवाले यांच्या शिष्य परिवाराच्या वतीने अर्पण करण्यात आलेल्या नूतन चांदीच्या पालखीचे पूजन ह. भ. प. रघुनाथबुवा पालखीवाले, संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी, शिवराज भुमरे पाटील ह. भ. प. रखमाजी महाराज नवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर परंपरेप्रमाणे भजन झाल्यावर संस्थानाधिपती ह. भ. प. रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवल्यानंतर सुवासिनींनी देवाला औक्षण केले. त्यानंतर पालखीचे समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले. समाधी मंदिरात सोहळा विसावल्यावर पैठणकरांच्या वतीने हजारो भाविकांना झेंडुजी महाराज मठात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर साडेचार वाजता प्रस्थान होऊन पालखी सोहळा गागाभट्ट चौक येथील पालखी प्रस्थान ओट्यावर विसावला. याप्रसंगी ह. भ. प. कैवल्य महाराज चातुर्मास्ये, श्रीरुख्मिणी पांडुरंग संस्थान अनवा यांची विशेष उपस्थिती होती. याठिकाणी हजारो भाविकांनी नाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
वारकरी विद्यार्थ्यांनी लेझिम खेळून पांडुरंगाचे नामस्मरण केले. ‘यंदा चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट हटू दे’, अशी प्रार्थना वारकरी-शेतकऱ्यांनी एकनाथ महाराजांच्या चरणी केली. त्यानंतर सूर्यास्त समयी नाथ महाराजांचे पहिला मुक्काम चनकवाडीकडे प्रस्थान झाले. नाथ महाराजांची ही पालखी जवळपास १९ दिवस प्रवास करुन पंढरपूरला पोहोचते. रोज २५ ते ३० किलोमीटर प्रवास केला जातो. पालखी सोहळ्याचे हे ४२५वे वर्ष आहे.
पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण १ जुलै रोजी श्रीसंत भगवान बाबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या मिडसांगवी या ठिकाणी होणार आहे. दुसरे रिंगण ५ जुलै रोजी पारगाव घुमरे येथे, तिसरे ८ जुलै रोजी नांगरडोह, ११ जुलै रोजी चौथे रिंगण कव्हेदंड येथे, तर पाचवे रिंगण १६ जुलै रोजी पार पडणार आहे.
नाथांच्या पायी पालखी दिंडीसाठी प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संत एकनाथ महाराज यांची पालखी वाहून नेणारी रथाची बैलजोडी अहमदनगर जिल्ह्यातील हातगाव (ता. शेवगाव) येथील डॉ. नीलेश मंत्री कुटुंबाची आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांना हा मान आहे. तरथाचे सारथ्य देविदास गादे हे करत आहेत.