उत्तम प्रशासक, तत्त्वज्ञानी, न्यायी,

दानशूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी

कर्तृत्त्ववान, कार्यक्षम, दानशूर, धर्मपरायण असलेल्या आणि जनतेने ज्यांना संत आणि देवीपद बहाल केले, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. देशभर आपल्या कर्तृत्त्वाचा झेंडा फडकविणाऱ्या अहिल्यादेवी यांचा जन्म महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. अहिल्यादेवींना वयाच्या २८व्या वर्षी वैधव्य आले. मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. उलट त्यांच्यातील हुशारी आणि कर्तृत्त्व ओळखलेल्या मल्हाररावांनी त्यांच्या हाती राज्यकारभार सोपविला.

मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणपोई
उत्तम प्रशासक, तत्त्वज्ञानी, न्यायी, दानशूर म्हणून भारतभर कीर्ती मिळवलेल्या अहिल्यादेवींनी जनतेच्या धार्मिक श्रद्धांचा सन्मान केला. त्यांनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची, धर्मशाळांची, निर्मिती केली. द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार, सारख्या अनेक मंदिरांचा अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केला. तेथे अनेक धर्मशाळा उभारल्या. याशिवाय बनारस येथे अन्नपूर्णा मंदिर, गया येथे विष्णू मंदिर उभारले. आपल्या शासनकाळात त्यांनी रस्ते, विहिरी, घाट, पाणपोई निर्माण केल्या. महिलांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या. अहिल्यादेवींची शंभू महादेवावर नितांत श्रद्धा होती. अगदी राजाज्ञा देताना आणि स्वाक्षरी करताही त्या शिवाचे नाव लिहित असत. “परमेश्वराने माझ्या खांद्यांवर जे उत्तरदायीत्व सोपविलेले आहे, मला ते पार पाडायचे आहे. प्रजेला सुखी ठेवणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या प्रत्येक कर्माप्रती जबाबदार आहे. सामर्थ्य आणि सत्तेच्या बळावर मी येथे जे काही करते आहे, त्याचे ईश्वराच्या दरबारी मला उत्तर द्यावे लागणार आहे. येथे माझे काहीही नाही, ज्याचे आहे त्याच्याच जवळ पाठवते. जे काही घेते आहे ते माझ्यावर कर्ज आहे. मला माहीत नाही मी याची परतफेड कशी करेल…” असे अहिल्यादेवींनी म्हटले आहे.

देशभरातील मंदिरांचा जीर्णोद्धार
अहिल्यादेवींनी बांधलेल्या देवळात शंकराच्या देवळांची संख्या अधिक आहे. उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला रामेश्वरम आणि पश्चिमेला द्वारका-सोमनाथ पासून काशी-गयापर्यंत अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्त्वाच्या पाऊलखुणा ठेवल्या आहेत.अहिल्यादेवींनी बारा जोतिर्लिंगे, प्राचीन सप्तपुऱ्या आणि चारधाम तीर्थे अशी हिंदूंची पवित्रस्थाने त्यांनी बळकट केली. त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी कुशावर्त कुंड, दगडी मंदिर, विहीर आणि धर्मशाळा बांधल्या. श्री घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांतील आद्य ज्योतिर्लिंग असून भारतातील अतिप्राचीन शैवक्षेत्र आहे. १७८३ मध्ये अहिल्यादेवींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. याशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे चार धामे या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंड, धर्मशाळा बांधून यात्रेकरूंना सुविधा निर्माण केल्या. हिंदू देवालयां व्यतिरिक्त त्यांनी मुसलमानांच्या पीर आणि दर्गे यांनाही मदत केली.
श्री काशी विश्वेश्वर मंदिराला नवजीवन
सध्याचे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा १७७० च्या दशकात अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईंनी फक्त काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही, तर गंगेच्या किनारी अनेक घाटही बांधले. सध्या काशीत सगळ्यांत जास्त गर्दी असते तो दश्वाश्वमेध घाटही अहिल्यादेवींनीच बांधला. त्यांच्या या महान कर्तृत्त्वामुळे काशीत अहिल्यादेवींची पार्वती रूपात पूजा केली जाते.

पंढरपुरात भव्य वाडा
पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर श्री विठ्ठल मंदिराच्या समोरच, महाद्वार घाटाच्या बाजूला अहिल्यादेवींनी २५४ वर्षांपूर्वी भव्य वाडा बांधला. १७५४ मध्ये या वाड्याची पायाभरणी झाली. सुमारे १३ वर्षे या भव्य वाड्याचे काम सुरू होते. वाड्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली सागवान लाकडे मध्य प्रदेशमधील जंगलातून आणण्यात आली होती. ही लाकडे नर्मदा नदीत टाकून ती गुजरातमध्ये समुद्रात आणून तेथून ती समुद्रातून रत्नागिरीजवळ आणत. तिथे ती पाण्यातून बाहेर काढून हत्तींच्या पाठीवर टाकून पंढरपुरात आणली गेली. वाड्याचा वास्तुशांती समारंभ १७६७ च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच पाडव्याला झाला. मराठेशाहीच्या समृद्धीचे दर्शन घडविणारा हा भव्य वाडा सुमारे दोन एकर जागेवर उभा आहे. १२५ लाकडी खणांच्या या वाड्यात विठुरायासाठी आणि श्रीरामासाठी म्हणून तुळशीबागही होती. वाड्याचे बांधकाम सुरू असताना वाड्यात श्री महादेवाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु खोदकाम सुरू असताना तिथे मारुतीची प्राचीन मूर्ती सापडली होती. याविषयीची माहिती माता अहिल्यादेवींना समजल्यावर त्यांनी तिथे श्रीराम मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानुसार वाड्यात अतिशय सुंदर श्रीराम मंदिर बांधण्यात आले. वाड्याच्या दक्षिणेला दगडी दोन मंडपांचे श्रीराम मंदिर आहे. त्यामध्ये उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या संगमरवरी मूर्ती आहेत. ल पूर्वेला हनुमानाची मूर्ती आहे. देशात कोठेही नसणारी माता अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती येथे श्रीरामासमोर बसवलेली आहे. वाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षी श्रावण महिन्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी ह्या या वाड्यात मुक्कामास होत्या. याची नोंद दफ्तरी आहे.

विठुरायाच्या अभिषेकासाठी गंगाजल
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहिल्यादेवींमुळे होळकर घराण्याला मान आहे. शिवभक्त अहिल्यादेवींनी महाशिवरात्रीच्या दिवशी श्री विठ्ठलाला गंगेच्या पाण्याचा महाभिषेक करण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा आज अडीचशे वर्षांनीही सुरू आहे. होळकरांचे प्रतिनिधी गंगा नदीचा उगम असलेल्या गंगोत्री येथून गंगाजल कलशात भरून आणतात. मंदिरे समितीतर्फे मध्यरात्री १२ वाजता या गंगाजलाने श्री विठ्ठलाला अभिषेक केला जातो. शैव आणि वैष्णव ऐक्याची ही थोर परंपरा आहे. एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मागरिट म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी  एलिझाबेथ, डेन्मार्कची राणी मागरिट यांच्याशी केली आहे. अशा या महान धर्मपरायण, लोककल्याणकारी विभूतीला जयंतीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *