संतमंडळातील खरा चमत्कार
म्हणजे संत चोखा मेळा कुटुंब
संत चोखामेळा म्हणजे भारतीय समाजातील एक सांस्कृतिक चमत्कारच. ज्यांना अस्पृश्य म्हणून समाजानं अत्यंत हीन, अमानवी वागणूक दिली त्याच समाजाचं भलं चिंतणारे अभंग या संतानं लिहिले, जे त्यातील अलौकिक साहित्य गुणांमुळे अजूनपर्यंत म्हणजे गेली साडेसातशे वर्षे टिकून राहिले आहेत.
– डॉ. श्रीरंग गायकवाड
जन्मस्थळाबद्दल अनेक मते
काही इतिहासकारांच्या मते बुलडाण्यातील मेहुणपुरा गाव चोखोबांचे जन्मस्थळ, काही म्हणतात पंढरपूर. तर अनेकजण म्हणतात, मंगळवेढ्यातच चोखोबांचा जन्म झाला.
प्रा. देविदास इथापे यांच्या मते १४ जानेवारी १२६८, शके ११९० ही चोखोबांची जन्मतारीख आहे. चोखोबांच्या आईचे नाव सावित्रीबाई, तर वडील सुदामा येसकर. गावकीची कामे करता करता संत चोखा मेळा यांनी स्वतः तर अभंग लिहिलेच, पण आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लिहायला, वाचायला शिकवलं. त्यामुळं त्यांच्या पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका यांनीही उच्च कोटीचे अभंग लिहिले, जे संत साहित्यात अजरामर झाले आहेत.
सध्या संत चोखामेळा यांचे ३५८, सोयराबाईचे ६२, कर्ममेळाचे २७, बंका यांचे ४१, तर निर्मळाचे २४ अभंग उपलब्ध आहेत. चोखोबांच्या काळात त्यांचे संतसांगाती होते, निवृत्तीनाथ, नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, गोरा कुंभार, जगमित्र नागा, सावतामाळी, नरहरी सोनार. या संतांच्या संगतीतच चोखोबांची प्रतिभा बहरली. चोखोबा कुटुंबाचं मुक्कामाचं कायमस्वरुपीचं ठिकाण, पोटापाण्याचा उद्योग नातेवाईक, याबद्दल ठोस माहिती मिळत नाही. चोखोबाचं बुलडाण्यातील कथित जन्मस्थळ मेहुणपुरा, मुक्कामस्थळ मंगळवेढा आणि कर्मस्थळ पंढरपूर या तीन ठिकाणी हे थोर संत कुटुंब आपलं ऐतिहासिक आयुष्य जगलं. या तीनही ठिकाणांशी त्यांचं जीवाभावाचं नातं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते चोखोबा वर्हाडातील आहेत. चोखोबांचे चरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या मते चोखोबा पंढरपूरचे आहेत.
मेहुणपुरामध्ये चोखोबा कटुंबाच्या स्मृतीखुणा पाहायला मिळतात. चोखोबांची बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका याच गावात राहत. मेहुणपुराशी असलेलं नातं सोयराबाईच्या अभंगांतून उलगडतं.
झाली निर्मळेची भेटी। सोयरा पायी घाली मिठी।।
धन्य बाई मेहुणपुरी। म्हणे चोख्याची महारी।।
कर्ममेळ्याच्या वेळी सोयराबाईच्या पोटात दुखत असताना चोखोबा मदतीसाठी बहीण निर्मळेकडे गेला. चोखोबा निर्मळेला घेऊन लवकर येत नाही म्हणून देवच निर्मळेचं रुप घेऊन सोयराबाईचं बाळंतपण करतो, अशी कथा प्रचलित आहे. मेहुणपुर्यात चोखोबांचं जन्मस्थळ, बंका आणि निर्मळेची समाधी पाहायला मिळते. या गावात दरवर्षी १४ जानेवारी रोजी चोखोबांचा जन्मोत्सवही साजरा केला जातो.
मंगळवेढ्याशी घट्ट नातं
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा गावाचा उल्लेख आला की, पाठोपाठ संत चोखामेळा यांचं नाव येतं. एवढं त्यांचं मंगळवेढ्याशी नातं घट्ट आहे. मेहुणपुर्याहून चोखोबा कुटुंब रोजगारासाठी मंगळवेढ्याला आले असावेत. त्या काळात मंगळवेढा समृद्ध, रोजगाराची सुविधा असलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वातंत्र्य जपणारं महत्त्वाचं गाव होतं. मंगळवेढ्याला संतांच्या सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. वैदिक, जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, लिंगायत, महानुभव, सूफी असे सर्व धर्म, पंथ मंगळवेढ्यात बहरले, नांदले. परिसरावर या संतविचारांचा मोठा प्रभाव पडला. तोच प्रभाव संत चोखामेळा कुटुंबावर जाणवतो.
संत नामदेवांचा गुरुपदेश
चोखोबांच्या मंगळवेढ्याहून पंढरपूर अवघ्या १४ मैलांवर. अनेक दिंड्या मंगळवेढ्याहूनच पंढरपूरला जातात. वेगवेगळ्या उपासना पद्धती पाहिलेल्या चोखोबांना नाचत गात पंढरीला निघालेल्या वारकर्यांविषयी विशेष आपलेपण वाटलं असावं. त्यांच्यासोबतच कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटातील आषाढी-कार्तिकीचा समतेचा सोहळा त्यांनी अनिमिष नेत्रांनी पाहिला. इथंच त्यांची वारकर्यांची चळवळ उभारणार्या संत नामदेवांशी भेट झाली. अधिकारहीन जातींना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा चंग बांधलेल्या संत नामदेवांनी महार चोखोबाच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्यात गुरुशिष्याचं नातं तयार झालं. अर्थात हे नातं कसं होतं, त्याबद्दल चोखोबा म्हणतात,
चोखा म्हणे माझा नामदेव प्राण।
घालीन लोटांगण जीवें भावे।।
नामदेवांनीही
चोखा माझा जीव। चोखा माझा भाव।।
कूळ, धर्म देव। चोखा माझा।।
एवढं उच्चतम स्थान चोखोबांना दिलं. त्यातून तत्कालीन समाजाला त्यांनी योग्य तो संदेश दिला.
संत ज्ञानदेव, जनाबाईंचा सहवास
नामदेवांसोबतच्या ज्ञानदेवादी अनेक संतांचा चोखोबांना सहवास लाभला. त्यामुळं चोखोबाचं आयुष्यच बदलून गेलं. पंढरपुरात दाखल झालेल्या चोखोबा आणि सोयराबाईला सर्वाधिक जीव लावला तो नामदेवांच्या घरच्या दासी जनीने. संतमंडळीत जनाबाईचा अधिकार खूप मोठा होता.
चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला।।
अशा शब्दांत तिने चोखोबाच्या भक्तीची ताकद जगाला सांगितली. चोखोबा आणि इतर संतांमध्ये संवाद घडवून दिला. त्यांच्यातील अनुभव, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून प्रयत्न केला. संतांना कडेखांद्यावर घेतलेल्या विठोबाचं जे चित्र जनाबाईनं रंगवलं आहे, त्यात देवाने चोखामेळ्याला आवर्जून बरोबर घेतल्याचं वर्णन जनाबाई करते. या अस्पृश्य संताच्या घरी देव काम करत असल्याचं, म्हणजे अगदी चोखामेळ्याला मेलेली ढोरेसुद्धा देव ओढू लागल्याचं जनाबाईनं लिहून ठेवलंय. इतर समकालीन संतांनीही चोखोबाबद्दल लिहून ठेवलंय.
संत नरहरी सोनार यांनी थोर थोर संतांच्या मेळ्यात चोखोबा उभा असल्याचं वर्णन केलंय. तसंच चोखोबा महाद्वाराशी तिष्ठत उभा असे, याची साक्षही दिली आहे.
याशिवाय सोयराबाई, बंका, निर्मळा आणि कर्ममेळा यांच्या अभंगातून चोखामेळ्याचं दर्शन होतं. समकालीन संतांनंतर संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज तसेच मोरोपंत यांनी चोखोबांची थोरवी गायली आहे. चोखोबांना मार्गदर्शक मानणारे मेहुणे बंका यांनी तर चोखोबांची आरती लिहून या थोर संताला अजरामर केलं आहे. नंतरच्या काळातही
चोखोबाची भक्ती कैसी। प्रेमे आवडी देवासी।।
ढोरे ओढी त्याचे घरी। नीच काम सर्व करी।।
असं एकनाथ महाराज चोखोबारायांचं वर्णन करतात.
तर
चोखोबा माझा गणपती। राधाई महारीण सरस्वती।।
असं तुकाराममहाराज पहिलं नमन चोखोबा आणि सोयराबाईला करतात.
समकालीन पंतकवी मोरोपंत म्हणतात,
गावा न मानावा चोखामेळा महार सामान्य।
ज्याच्या करि साधूचा चोखामेळा महार असामान्य।।
संत संताजी जगनाडे, महिपतीबुवा यांनीही चोखोबाची महती गायली आहे.
अस्पृश्यतेचे जबर चटके
संतांच्या संगतीचे सुख लुटणार्या चोखोबाला मात्र त्यानं वर्णन केलेल्या भूवैकुंठात, पंढरपुरात अस्पृश्यतेचे जबर चटके, फटके सहन करावे लागले. नामदेवादी संतांनी समतेचा धर्म सांगणार्या ज्या विठोबाला शरण जा, असं चोखोबाला सांगितलं, त्या विठोबाचं प्रत्यक्ष दर्शन सनातन्यांनी त्याला घेऊ दिलं नाही. विठुरायाच्या मुखदर्शनासाठी सदैव महाद्वाराशी तिष्ठत उभ्या असणार्या चोखोबाला सतत हाकलून देण्यात आलं. त्यानं पुन्हा येऊ नये म्हणून त्याच्यावर नाना आळ घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली. कधी विठोबाचा हार चोरला म्हणून, तर कधी स्पर्श करून देव बाटवला म्हणून त्याला अगदी बैलांना बांधून ओढण्याची शिक्षा देण्यात आली.
या छळाचं अत्यंत हृदयद्रावक वर्णन चोखोबांनी आपल्या अभंगातून केलंय.
धाव घाली विठू आता चालू नको मंद।
बडवे मज मारिती काय केला अपराध।।
शेवटी त्या दांडग्यांनी देवळापाशी घुटमळणार्या ओढाळ चोखाबाची उचलबांगडी करून त्यांना नदीच्या पल्याड नेऊन सोडलं. इथून हालायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली. भरल्या डोळ्यांनी चोखोबांनी तिथूनच देवाला हात जोडले.
नेत्री अश्रूधारा उभा भीमातीरी।
लक्ष चरणावरी ठेवोनिया।।
का गा मोकलीले न येसी देवा।
काय मी केशवा चुकलोसे।।
असं स्वत:च्या अवस्थेचं वर्णन केलंय. मग चोखोबांनी इथं एक थोर गोष्ट केली. तिथल्या शेतातच झोपडी बांधून तिथं दगडी दीपमाळ उभारली. ही दीपमाळ म्हणजे, विरहाचं, बंडाचं, ज्ञानाचं, जागृतीचं, आत्मभानाचं प्रतिकच जणू. आषाढीला पंढरपूरला येणारी सर्व संतमंडळी मग चोखोबाला भेटायला त्याच्या या दीपमाळेच्या झोपडीत जाऊ लागली. खुद्द देवही त्या झोपडीत जाऊन जेवल्याची अख्यायिका आहे. या सर्व गोष्टींचा या जागेवर आता मागमूसही उरलेला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर
संत चोखा मेळा यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड केलं नाही. पूर्वजन्माचं पाप म्हणून आपण हीन जातीत जन्मालो, आपण अत्यंत क्षुद्र, तुमच्या दारीचा कुतरा, असं म्हणत चोखोबांनी वारंवार स्वत:कडे कमीपणा घेतला. इतरांना क्षणोक्षणी जोहार घातला. त्यांनी दुष्ट वागणूक दिली तरी नम्रतेनं त्यांना मायबाप म्हटलं. त्याविरोधात कधी विद्रोह केला नाही, म्हणून चोखोबा आणि त्याची पत्नी सोयराबाई हे प्रतिकच आम्हाला नको, अशी भूमिका आंबेडकरी चळवळीनं घेतली. पण या विनम्रतेच्या राखेखाली विद्रोहाचे चटके देणारे निखारे दडले होते, याकडं विचारवंतांचंही दुर्लक्ष झालं.
प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ते ओळखलेलं होतं. म्हणून तर आपलं The Untouchables हे पुस्तक त्यांनी संत चोखामेळा, नंदनार आणि रोहिदास या संतांना अर्पण केलं. आयुष्यभर विठोबाच्या दर्शनासाठी तळमळ करणार्या चोखोबांना मंदिरात जाऊ न देणार्या तत्कालीन मानसिकतेला आंबेडकरी भीमटोला बसणेच गरजेचंच होतं. तसा तो बसलाही. पण सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता चोखोबांचा व्यवस्थेविरोधातला एल्गार हा यत्किंचितही कमी नव्हता.
चोखोबांची हाडं पुरली देवाच्या महाद्वारासमोर
चोखोबांना पंढरपुरातून मंगळवेढ्याचं गावकूस बांधण्यासाठी जबरदस्तीनं नेण्यात आलं. काम सुरू असताना ते कूस कोसळून इतर मजुरांसोबत या थोर संतकवीचंही वैशाख वद्य पंचमी, गुरुवार, शके १२६० रोजी निधन झालं. आयुष्यभर देवाजवळ स्थान मिळण्याची त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा मत्यूनंतर त्यांच्या गुरूने, संत नामदेवांनी पूर्ण केली. मंगळवेढ्याहून चोखोबांची हाडं आणली. पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारात चोखोबा जिथं गहिवरून, हात जोडून उभे राहत असत, त्या ठिकाणी पुरली. तिथंच त्यांची समाधीही बांधली. समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या काळात संत नामदेवांनी उभारलेला तो मोठा क्रांतिकारी लढाच होता.
चोखोबांच्या नंतरही शेकडो वर्षे दलितांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश मिळाला नाही. त्यासाठी १९४७ साल उजाडावं लागलं. पूज्य साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून १ मे १९४७ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केलं. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आणि अखेर दलितांना मंदिरात प्रवेश मिळाला. चोखोबारायांना न्याय मिळाला!
(साभार : ‘जोहार चोखोबा’ या पुस्तकातील संपादित लेख)