शैव आणि वैष्णवांचा वाद
मिटविणारे महान संत
परधावी नाम संवत्सरे शके अकराशे पंधरा।
प्रातःकाळी जन्मला नरहरी।।
श्रावण मास शुक्लपक्ष त्रयोदशी।
नक्षत्र अनुराधा बुधवारी।।
अशी ज्यांची जन्मतिथी नोंदवून ठेवली गेली आहे, त्या थोर संत विठ्ठलभक्त श्री नरहरी महाराज यांची आज जयंती. त्यांच्या काळात शैव-वैष्णव वाद जोमात होता. शिवशंकर आणि विठ्ठल हे एकच आहेत, असा साक्षात्कार संत नरहरी महाराजांना झाला आणि ते विठ्ठलमय झाले, तसेच या ऐक्याची शिकवण त्यांनी समाजात रुजवली.
जन्म पंढरपुरात
संत नरहरी महाराज यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ शके १११५, इसवीसन ११९३ च्या आसपास पंढरपूर येथे झाला, अशी नोंद आहे. तर काही जणांच्या मते त्यांचा जन्म देवगिरी येथे झाला. मंगळवेढेजवळील ब्रह्मपुरी येथील श्रीपती पोतदार (वेदपाठक) यांची मुलगी गंगाबाई यांच्यासोबत नरहरी महाराजांचा विवाह झाला. नरहरी महाराजांचे वडील अच्युतराव आणि आई सावित्रीबाई आपला परंपरागत दागिने घडवण्याचा व्यवसाय करत. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसवला होता. त्यामुळेच त्यांचे आडनाव सोनार पडले. संत नरहरी महाराज भगवान महादेवाचे म्हणजेच शिवाचे उपासक होते. दररोज सकाळी ते शिव आराधना करून शंकराला बेलपत्र अर्पण करत असत.
शिव हाच विठ्ठल असल्याचा साक्षात्कार
पंढरपुरातील एका सावकारांना पांडुरंगासाठी सोनसाखळी तयार करायची होती. ते नरहरी महाराज यांच्याकडे आले. पण, शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख आपण बघणार नाही, असे म्हणत संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास नकार दिला. त्यावर सावकारांनीच विठ्ठलाच्या कंबरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी सुंदर सोनसाखळी तयार केली. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली, पण ती वीतभर जास्त झाली. म्हणून सावकाराने सेवकाला संत नरहरी याच्याकडे पाठवले आणि साखळीचे माप बरोबर करण्यास सागितले. संत नरहरी यांनी साखळी त्याप्रमाणे करून दिली. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे, या विचारात संत नरहरी पडले आणि शेवटी स्वतः मंदिरात गेले.
शैव असल्याने श्रीविष्णूचे रूप असेलल्या श्री विठ्ठलाचे तोंडही बघायचे नाही, असा त्यांचा निश्चय होता. त्यामुळे ते डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठल मूर्तीसमोर गेले आणि विठ्ठलाची मूर्ती हाताने चाचपून माप घेऊ लागले. तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. नरहरी सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले, तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच डोळ्यांवरील पट्टी काढून पाहिले, तर समोर विठ्ठल मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. शेवटी त्यांच्या लक्षात आले, की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले आणि देवा तुझा मी सोनार। तुझ्या नामाचा व्यवहार।। असे म्हणत विठ्ठलमय होऊन गेले.
मूळ आडनाव महामुनी
नरहरी महाराजांचा जन्म जणू हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार (महामुनी) होते, असे असे म्हटले आहे. संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद-विश्वब्राह्मण अशी सांगितली जाते. आजही त्यांच्या समाधीची पूजा त्यांचे वंशज महामुनी यांच्यातर्फे केली जाते.
एकूण ६३ अभंग उपलब्ध
नरहरी सोनारांच्या नावावर ६३ अभंग उपलब्ध आहेत. त्यात “सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’, “शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’, “माझे प्रेम तुझे पायी’, आणि “देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार’ हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत. संत नरहरी महाराज हे वारकरी परंपरेत वयोवृद्ध आणि ज्येष्ठ संत मानले जातात. समाधीच्या वेळी त्यांचे वय ९२ होते, असे सांगितले जाते. त्याकाळी नरहरी महाराज यांच्या समाधीचा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला. साक्षात विठ्ठल-रुक्मिणी यांच्यासह संत ज्ञानदेव, संत निवृत्तीनाथ, संत चोखामेळा, संत नामदेव हे समाधी सोहळ्याला उपस्थित होते, अशी श्रद्धा आहे. समाजातील एकोपा वाढीस लागून विठ्ठलभक्ती रुजवण्यात संत नरहरी महाराज यांचा मोठा वाटा आहे. आपल्या अभंगरचनेतून त्यांनी ईश्वरभक्ती आणि साधनेचा मार्ग दाखवला. या थोर विठ्ठलभक्तास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे वंदन.