सेवा हाच मोक्षाचा मार्ग असे
सांगणारे लहानुजी महाराज
सेवा हाच मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे, अशी शिकवण देणारे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील टाकरखेड येथील संत लहानुजी महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यांनी रुजवलेली लोककल्याणाची परंपरा त्यांचा आर्वीतील टाकरखेड येथील आश्रम सक्षमपणे पुढे चालवत आहे.
लहानपणापासूनच परमार्थाची आवड
चांदूर तालुक्यातील मंगरूळ गावी भीमादेवी आणि अभिमानजी भांडे यांच्या पोटी लहानुजी महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना परमार्थ साधनेची ओढ होती. अत्यंत खडतर परिस्थितीत ते लहानाचे मोठे झाले. लहानुबाबांच्या आई वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मामा मामींनी त्यांचा सांभाळ केला. जेमतेम परिस्थिती असल्याने चरितार्थासाठी ते टाकरखेडला स्थायिक झाले. त्यावेळी लहानुबाबा केवळ सहा वर्षांचे होते. त्यांना शाळेत घातले गेले, पण त्यांना शालेय शिक्षणात रस नव्हता. त्यांना शेतीच्या कामात मदत करणे आवडत असे. गाईगुरांना चारायला घेऊन जाणेही त्यांना आवडायचे. कारण त्यांना गुरांकडे निवांत ईश्वरचिंतन करायला आवडायचे. एकदा तर बाबा आत्मसुखाच्या तंद्रीत त्यांच्यावर दोन लांडग्यांनी त्यांच्यावर झेप घेतली तरी त्यांना कळले नाही. पण चरणाऱ्या त्यांच्या गायींनी लांडग्यांवर हल्ला करून त्यांना पिटाळले, अशी कथा सांगतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सांगणे
ईश्वरभक्ती करत असताना ते सूर्योपासक बनले. त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. सेवा हाच मोक्षप्राप्तीचा खरा मार्ग आहे, अशी शिकवण ते लोकांना देत. त्यांच्याबाबात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘गडे हो मी जगभर फिरलो. साधू पाहिले. देही विदेही पाहिले. अवलीया पाहिले, पण लहानुजी महाराजांसारखी विभुती कुठेच नाही. हे आपल्याला लाभलेले मोठे धन आहे. ते सांभाळून ठेवा. स्वतःचा उद्धार करुन घ्या.’ आपले आयुष्य जनकल्याणासाठी खर्च करणाऱ्या लहानुजी महाराज यांनी ६ ऑगस्ट १९७१ या रक्षाबंधनाच्या दिवशी वयाच्या नव्वदीत आपली इहलोकीची यात्रा संपविली.
टाकरखेड येथील आश्रमाचे आदर्श कार्य
लहानुजीबाबांचे जनकल्याणाचे काम त्यांच्या टाकरखेड येथील आश्रमाने पुढे चालविले आहे. समाजाभिमुख कामे करणे हे या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे. विशेषत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारांवर आधारीत टाकरखेडचा संत लहानुजी महाराज देवस्थान विविध उपक्रम राबवित आहे. या देवस्थानच्या शेतीमध्ये बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासोबतच गोपालन, शेतकरी मार्गदर्शन आणि आरोग्यसेवेवर कार्यरत असल्याने हे देवस्थान अनेकांसाठी मॉडेल ठरले आहे.
गाईंचे संगोपन, बायोगॅस, वीजनिर्मिती, सेंद्रीय शेती
या संस्थानच्या गोरक्षण केंद्रामध्ये सध्या ३५० गाईंचे संगोपन केले जात आहे. संस्थानच्या मालकीची ४० एकर शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. गांडूळ खतनिर्मिती करून परिसरातील शेतकऱ्यांना नाममात्र दरात ते खत पुरविले जाते. यामुळे परिसरात सेंद्रिय शेतीची चळवळ उभी राहिली आहे. महाऊर्जाच्या सहकार्याने शेतात बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे गॅससह विजेचीही सुविधा झाली आहे. परिणामी, वृक्षतोडीला आळा बसला असून याच प्रकल्पाच्या इंधनावर सध्या संस्थेमध्ये चालत असलेल्या अन्नदानाचा स्वयंपाक केला जातो.
आश्रम बनला वृद्धांचा आधार
संस्थानने निराधार वृद्धांसाठी ‘आश्रय’ ही योजना राबविली आहे. त्यांची राहण्याची, जेवण्याची आणि औषधांची सर्व व्यवस्था संस्थानने केली आहे. सध्या या संस्थेत ३५ निराधार व्यक्ती आहेत. यासोबतच नियमित आरोग्य तपासणी शिबीर राबवले जाते. देवस्थानात येणाऱ्या भाविकांसाठी दररोज अन्नदान केले जाते. दरवर्षी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. तेव्हा जवळपास ८० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. सेवेचा धर्म सांगणाऱ्या लहानुमहाराजांना पुण्यतिथीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे वंदन.