दया, क्षमा, शांती आणि
समभाव रुजविणारे दादा
पुणे स्टेशन परिसरात आपण कधी गेलो, तर तेथून जवळच साधू वासवानी मिशनचा मोठा आश्रम आहे. मानवता, दया-क्षमा-शांतीचा संदेश देणाऱ्या साधू वासवानी या महान संतांची शिकवण येथूनच रुजवली जाते. साधू वासवानी यांच्यानंतर दादा जे. पी. वासवानी यांनी त्यांचा वारसा चालवला. सर्वधर्म समभाव, भगवान श्रीकृष्ण, वर्धमान महावीर, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, गुरू नानकजी महाराज, संत कबीर यांनी दिलेल्या शिकवणीतून समाज एकसंध करण्याचे मोठे कार्य दादा जे.पी. वासवानी यांनी केले. आज त्यांची १०४ वी जयंती.
‘मीटलेस डे’ची सुरुवात
जे. पी. उर्फ जशन वासवानी यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे २ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहलाजराय होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद (पाकिस्तान) येथे टी. सी. प्रायमरी स्कूल येथे झाले. ते एम. एस्सी. (फिजिक्स) आणि नंतर एल. एल. बी झाले. त्या काळी त्यांनी ‘Scattery of X rays by solid’ विषयावर प्रबंध लिहिला. त्याची प्रशंसा नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी केली होती. १९४८ मध्ये ते साधू वासवानींसह भारतात आले. १६ मार्च १९४८ रोजी त्यांनी पुण्यात साधू वासवानी आश्रमाची स्थापना केली. २५ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांनी ‘मीटलेस डे’ म्हणजे मांसाहार वर्ज्य दिवस सुरू केला. शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेत त्यांची भाषणे झाली आहेत.
बाल्यावस्थेतच दयाभाव
विद्यार्थी असताना दादा जे. पी. यांच्या शाळेच्या वाटेवर खेळण्याचे दुकान होते. त्यातील एक खेळणं त्यांना खूप आवडले पण, पैसे नव्हते. पुढे त्यांच्या एका वाढदिवशी त्यांच्या आईने दादांना एक रुपया भेट म्हणून दिला. त्यावर अतिआनंदी झालेले दादा खेळणे घेण्यासाठी गेले. पण, त्याचवेळी दुकानासमोर एक माता तिच्या आजारी बाळाला घेऊन मदतीसाठी आर्जव करत होती. हे पाहताच दादांनी खेळणे घेण्याचा बेत रद्द केला आणि त्या असाह्य आईची मदत करून तिला उपचार घेण्यास सुचवले.
अगदी बालवयातच दादांच्या दयाभावनेचा अनुभव कुटुंबियांना आला. पुढे दादांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःला समाजकल्याणासाठी झोकून दिले. कोणताही भेदभाव न ठेवता त्यांनी समाजात समतेचे विचार पेरले. दादांनी जगातील अनेक धर्मगुरूंना आणि नामांकित नेत्यांची भेट घेत संवाद साधला. जगातील अनेक व्यासपीठांवर दादांनी आध्यात्मिकतेवर केलेले मार्गदर्शन हजारो जणांना मार्गदर्शक ठरले आणि आणि दादांचे शेकडो अनुयायी आजही जगभरात मानवतेचे विचार पुढे नेत आहेत.
स्त्री शिक्षणाला प्राधान्य आणि सामाजिक कार्य
दादा जे. पी. यांनी साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. उल्लेखनीय म्हणजे स्त्री साक्षरतेबाबत ते सदैव आग्रही राहिले. पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात सेंट मीरा स्कूल आणि कॉलेज फक्त मुलींसाठी चालवले जाते. यासोबतच साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, इंटरनॅशनल स्कूल, स्टॉप ऑल किलिंग, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, नर्सिंग कॉलेज असे उपक्रम ट्रस्टमार्फत राबवले जातात. शिवाय विविध प्रसंगी अन्नदान आणि आरोग्यसेवा दिली जाते.
दादांनी आपल्या अमोघ वाणीतून मानवतावाद आणि अध्यात्म समाजात रुजवला. इंग्रजी आणि सिंधी भाषांवर त्यांची प्रभुत्व होते. सोप्या आणि सुटसुटीत भाषेत ते श्रोत्यांशी संवाद साधत. मिशनच्या माध्यमातून सर्वांच्या जीवनात आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी सामूहिक भजन, कीर्तन, ज्ञान, परमार्थ, दया आणि करुणा, आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, हा उपदेश त्यांनी केला. त्यांनी सदैव शाकाहाराचा पुरस्कार केला. मानवतावादात पशु हत्या निषिद्ध असून मुक्या प्राण्यांची हत्या थांबवण्याचे आवाहन दादा करत असत. समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. BORN TO LOVE हा जगण्याचा सारांश आहे, असे दादा सांगायचे.
आज अनुभवा शांतीची लाट
दादा जे. पी. वासवानी हे क्षमाशीलतेचे भक्कम समर्थक होते. ते नेहमी म्हणत, क्षमाशीलता आपल्या जीवनात शांती आणि आनंद आणते. ती आत्म्यात उफाळलेल्या संघर्षाचा शेवट घडवते आणि सहिष्णुता, जाणीव आणि समतोल यांच्या मदतीने आपल्याला आयुष्याला समोर जाण्यास शिकवते. ती प्रेम आणि सकारात्मकतेचा संदेश देते. ती हृदयातून सर्व नकारात्मकता, दुःख, संताप, रागीटपणा, वैर आदी दुर्गुणांचे समूळ उच्चाटन करते आणि आरोग्य, शांतीचा पुरस्कार करते. शांती हे ईश्वराचेच दुसरे नाव आहे. त्यामुळे आपण क्षमाशीलता अनुसरतो तेव्हा ईश्वराचीच आपल्या अंतःकरणात प्रतिष्ठापना करतो. दादांच्या याच शिकवणुकीचा आदर राखत साधू वासवानी मिशनने २०१२ मध्ये शांतीक्षण-जागतिक क्षमाशीलता क्षण हा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत सर्वांनी २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एकत्र येऊन सर्व दुःखे, राग, क्रोध आणि अपराधीपणा याला क्षमा करुन अंतःकरणात शांतीची लाट अनुभवायची असते. शांतीचा क्षण अनुभवणे हा या उपक्रमांपैकी एक ठरला आहे.
भव्य ग्रंथसंपदा
दादा जे. पी. वासवानी यांनी इंग्रजीमध्ये ६८, हिंदीत १९, सिंधीत ५, मराठीमध्ये ७, कन्नडमध्ये ५, तेलुगू ३, अरेबियन २, चायनीज १, डच १, बहासा ४, स्पॅनिश १२, गुजरातीमध्ये १, ओरिया ५, रशियन १, तमिळ ९ आदी भाषांमध्ये पुस्तके लिहिली आहेत. यावरूनच लक्षात येते, की दादांनी जगभरात किती खोलवर कार्य केले आहे. सदैव मानवतावादी दृष्टीकोन ठेवून अध्यात्म आणि प्रेम समाजात रुजवणाऱ्या या महान तपस्वीला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.
(या माहितीसाठी प्रा. डॉ. सुवर्णा देवळाणकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)