दुष्टांचा नाश आणि सज्जनांच्या
रक्षणाचा संदेश देणारा नृसिंह
भगवान विष्णुच्या दशावतारांमधील चौथा अवतार मानल्या गेलेल्या श्री नृसिंहाचा नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला आहे. वैशाख शुद्ध षष्ठी ते चतुर्दशी असा हा उत्सव असतो.
भक्त प्रल्हादासाठी प्रगट होऊन दुष्ट हिरण्यकश्यपूचा नाश केलेल्या प्रभू नृसिंहाचा वार शनिवार सांगितला गेला आहे. हनुमंताच्या पूजा, उपासनेने नृसिंहाची पूजा, उपासना आपोआपच घडते, असे भक्त मानतात. नृसिंह भगवान संत नामदेवांचे आराध्य दैवत होते. संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांनी देशाच्या तीर्थाटनाची सुरुवात पंढरपूरजवळ असलेल्या नीरा नृसिंहपूर येथील श्री नृसिंहाच्या दर्शनाने केल्याचे सांगतात. संत तुकाराम महाराजही वारकऱ्यांसह येथे दर्शनाला आले होते. नृसिंह जयंतीचा उपवास केल्यास १० कोटी एकादशींचे फल प्राप्त होते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. नवरात्रीच्या काळात नृसिंह पुराणांत सांगिल्याप्रमाणे नृसिंह मूर्तीला पंचामृत, पंचगव्याचे स्नान, कुंकूम, चंदन, केशर यांचे लेपन करतात. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस आदी फुलांनी पूजा करतात. तूप, साखर, तांदूळ, जव आदीच्या खिरीचा नैवेद्य दाखवून आरती करतात.
मेहकर येथील प्राचीन श्री नृसिंह मंदिर
ज्याप्रमाणे शिवाची १२ ज्योतिर्लिंगे किंवा देवीची साडेतीन पीठे असतात, त्याप्रमाणे भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह देवतेची जगात ११ पौराणिक स्थाने असल्याची मान्यता आहे. यातील पहिले स्थान पाकिस्तानातील मुलतान येथे आहे. (मुलतान ही हिरण्यकश्यपूची राजधानी होती आणि नृसिंहाचा अवतार येथे झाला अशी प्रचलित धारणा आहे.) “प्रथमे मूलस्थानंच, द्वितीये ज्योतीर्मठे” या प्राचीन स्तोत्रात या अकरा स्थानांचा उल्लेख आढळतो. यापैकी सहावे स्थान बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरला वसलेले आहे. भगवद्गीतेच्या अकरावा अध्यायाच्या महात्म्यामध्ये मेहकरचा उल्लेख आहे, यावरून हे स्थान किती प्राचीन आहे याची कल्पना येते.
श्री नृसिंह भगवंताची ११ स्थाने
नृसिंहभक्तांच्या पौराणिक मान्यतेनुसार पाकिस्तानातील मुलतान, उत्तराखंडातील ज्योतिर्मठ, उत्तरप्रदेशातील वाराणसी, मध्यप्रदेशातील नरसिंगपूर, महाराष्ट्रातील रामटेक, मेहकर आणि संगमेश्वर, तेलंगणातील सिंहाचलम्, आंध्रप्रदेशातील मंगलगिरी, अहोबिलम् आणि तामिळनाडू-कर्नाटकच्या सीमेवरील कोप्पर अशी नरसिंहाची ११ पौराणिक स्थाने आहेत. भारतवर्षाच्या प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने या स्थानांचे महत्त्व म्हणजे ही ११ नृसिंहस्थाने उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा होती. केवळ नृसिंहभक्तांसाठीच नव्हे तर समस्त वैष्णवांसाठी ही अकराही स्थाने श्रद्धेय आहेत.
पैनगंगेच्या काठी नृसिंह मंदिर
भगवान नरसिंहाने मेहकरच्या पैनगंगा नदीच्या तटावर भक्त प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते आणि तृप्त होऊन प्रल्हादाला वर दिला होता, अशी आख्यायिका आहे. म्हणून मेहकरच्या नृसिंहाला ‘प्रल्हादवरद’ म्हटले जाते. मेहकरचे प्राचीन नाव आधी ‘महंकावती’ आणि नंतर ‘मेघंकर’ होते. येथील राक्षसकुलीन राजा मेघंकर हा परम नृसिंहभक्त होता. त्याच्याच उपासनाबलामुळे लंकेकडे जातांना प्रभू रामचंद्रांनी त्याला याठिकाणी नरसिंहरूपात दर्शन दिले होते. तेव्हापासून नृसिंह हे या पंचक्रोशीचे क्षेत्रदैवत आहे. या मंदिरामध्ये विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे. नरसिंहाची श्रीमूर्ती खूपच सुरेख, रेखीव व मनोवेधक आहे. अप्रतिम कलाकुसर आणि बारीक कोरीवकाम असलेली ही मूर्ती पाहताक्षणी कोणाचीही नजर क्षणभर खिळून राहते. या अष्टभुजा मूर्तीची रचना, शिल्प आणि चेहऱ्यावरील भाव सर्व चित्ताकर्षक आहे.
आक्रमणापासून वाचविली मूर्ती
अकराव्या शतकापूर्वी मेहकरला नरसिंहाचे भव्य दगडी मंदिर होते, अशी ऐतिहासिक धारणा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापूर्वी श्रीमूर्ती सुरक्षित रहावी म्हणून गावकऱ्यांनी येथील माळीपेठ भागात जमिनीखाली एक भुयार खोदून तेथे ही मूर्ती लपविली होती. (हे चिरेबंदी बांधणीचे भुयार अद्यापही जसेच्या तसे शाबूत आहे.) नंतर या भव्य मंदिराचा आक्रमणात पुरता विध्वंस झाला असावा. मात्र गावकऱ्यांच्या सजग दृष्टीमुळे श्रीमूर्तीचा हा पौराणिक ठेवा आज सर्वांच्या दृष्टीपुढे आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कालौघात या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या भुयाराचे सर्वांना विस्मरण झाले. तत्कालीन वदंतेनुसार सोळाव्या शतकात नागपूरला रहात असलेल्या श्यामराज पितळे या नृसिंहभक्ताच्या स्वप्नात नरसिंहाने दृष्टांत देऊन या भुयाराची माहिती दिली आणि बाहेर काढण्याची आज्ञा केली. त्यावरून या गावाचा शोध घेत श्यामराज पितळे मेहकरला आले आणि या स्वप्ननिर्दिष्ट भुयाराची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर १५६९ मध्ये येथे खोदकाम करण्यात येऊन भुयार मोकळे करण्यात आले आणि या श्रीमूर्तीचे तत्कालीन ग्रामस्थांना दर्शन झाले. मात्र तो काळसुद्धा मुघल आक्रमणाचाच असल्यामुळे या श्रीमूर्तीचे नवीन मंदिर न बांधता सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थांनी एका छोटेखानी वाड्यामध्ये या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या मंदिराला शिखर सुद्धा बांधले नाही. तेव्हापासून श्रीमूर्ती या छोटेखानी जागेत विराजित आहे.
धार्मिक आणि सामाजिक उपक्रम
सध्या मेहकरचे नृसिंह मंदिर हे अनेक आध्यात्मिक उपक्रमांमुळे एक जागृत धर्मकेंद्र बनले आहे. नरसिंह जयंती नवरात्रोत्सव, श्रावणी शनिवार आणि नृसिंह द्वादशी या नैमित्तिक उत्सवांसोबतच अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रम या संस्थानामध्ये राबविले जातात. श्रावण महिन्यात सात दिवस विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्राचे रात्रंदिवस अखंड पाठ घेतले जातात. दिवसभर महिला आणि रात्रभर पुरुष या स्तोत्राचे सलग पाठ करतात. हा अध्यात्मिक इतिहासातील एक विक्रम आहे. याशिवाय वर्षभर ज्ञानमंदिराच्या सभागृहात मान्यवर विद्वानांची कीर्तने, प्रवचने, व्याख्याने आदी प्रबोधनपर कार्यक्रम होत असतात. तसेच अन्नदान होते. मंदिरात दर पौर्णिमेला उपासना होऊन खिचडीचा प्रसाद वितरित केल्या जातो. या धार्मिक कार्यक्रमांसोबतच संस्थान वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पूरग्रस्तांना मदत, शाकाहार प्रसार, व्यसनमुक्तीचे जागरण, समाजसेवकांचा सत्कार व अनाथ-अपंगांना मदत असे सामाजिक उपक्रमसुद्धा राबविते.
भव्य मंदिर उभारण्याचा मानस
भुयारातून मूर्ती प्रकट झाल्यानंतर पुढे ३०० वर्षांनी श्यामराज पितळे यांच्या घराण्यात १८८८ मध्ये संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचा अवतार झाला. ते साक्षात्कारी सिद्ध सत्पुरूष होते. संन्यास दीक्षेनंतर त्यांचे नाव ‘श्वासानंद’ झाले. त्यांना ‘महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते’ म्हटले जाते. त्यांनी स्थापन केलेल्या ज्ञानमंदिर गुरुपीठाच्या हजारो भक्तांचे नरसिंह हे आराध्यदैवत आहे. संत बाळाभाऊ महाराजांच्या गुरुगादीचा वारसा पुढे सद्गुरु दत्तात्रेय महाराज आणि सद्गुरू दिगंबर महाराज यांनी चालवला. सध्या या संस्थानचे अध्यक्ष ॲड. रंगनाथ महाराज पितळे हे गुरुगादीवर अधिष्ठित आहेत. त्यांच्याच प्रेरणेने संस्थान हे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवत असते. सोळाव्या शतकात तत्कालीन परिस्थितीमुळे मंदिर न बांधता श्रीमूर्तीची वाड्यामध्ये स्थापना करण्यात आली होती. मात्र आता काळाचा पट बदलल्यामुळे सुंदर आणि भव्य मंदिराची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे. माझ्या सद्भाग्याने माझे सासर असलेल्या उमाळकर घराण्याला नृसिंह जयंती उत्सवात प्रसादाचे श्रीफळ देण्याचा मान आहे. ही सेवा देवाने अखंडपणे करून घ्यावी या प्रार्थनेसह भगवान नृसिंहाच्या चरणी विनम्र वंदन!