मंदिर प्रवेश पंचाहत्तरीनिमित्त
तनपुरे मठात लढ्याचे स्मारक
पंढरपूरचा श्री विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा, दीनदलितांचा देव. पण स्वातंत्र्यपूर्वकाळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जाती-जमातींना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नव्हता. या प्रवेशासाठी सानेगुरुजींनी उपोषणाच्या माध्यमातून लढा पुकारला. तब्बल १० दिवस त्यांनी उपोषण केलं. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला. हा लढा यशस्वी झाला आणि दलितांना मंदिर प्रवेश मिळाला. या सामाजिक समतेच्या लढ्याचं पंढरपुरात स्मारक उभं राहतं आहे. त्याविषयी…
– राजाभाऊ अवसक
पंढरपूर हे महाराष्ट्राचं आद्यपीठ, तर पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचं लोकदैवत. या लोकदेव विठ्ठलाचं दर्शन सर्वसामान्यांना व्हावं म्हणून संत मांदियाळीनं पंढरपुरात चंद्रभागेकाठी वाळवंटात समतेचा लढा उभा केला. या संत परंपरेतच गणले जावेत असे पांडुरंग सदाशिव साने गुरूजी यांनी दलितांना पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचं दर्शन घडावं म्हणून १ मे १९४७ ते १० मे १९४७ या काळात पंढरपुरात उपोषण सत्याग्रह केला. महाराष्ट्रातील तमाम मराठी मनाची कवाडं जाती अंतासाठी सताड उघडी व्हावी, यासाठी गुरुजींनी चार महिने महाराष्ट्र पिंजून काढला. तब्बल ४०० सभांमधून भारतीय समाजाच्या माथ्यावर असलेला अस्पृश्यतेचा कलंक धुतला जावा, भेदाभेद हृदयापासून संपावा म्हणून समाजाला कळकळीचं आवाहन केलं.
साने गुरुजींना व्यापक पाठींबा
पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहापूर्वी काढलेल्या महाराष्ट्र व्यापी दौऱ्यामध्ये सानेगुरुजींच्या सोबत सेनापती बापट, क्रांती सिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी केवलानंद सहजानंद भारती, काकासाहेब बर्वे, आचार्य अत्रे या लोकनेत्यांच्या सहभागामुळं विठूराया मुक्तीची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, चारोधाम यात्री दादा महाराज तनपुरे, दादा महाराज सातारकर, विठोबा अण्णा आजरेकर या समाजधुरिणांसह सत्यशोधक सुधारक प्रबोधनाच्या चळवळीनं गुरुजींच्या आंदोलनाला पाठबळ दिलं. पंढरपुरातील अनेक मठप्रमुखांनी प्रागतिक भूमिका घेतली. मराष्ट्रातील भाविक, वारकरी, फडकरी आणि दिंडी समाजानं या आंदोलनाला पाठींबा दिला. त्यामुळंच ‘जावो साने सीमा पार, नही खुलेगा विठ्ठल द्वार’ ही बडवे उत्पातांची घोषणा साने गुरुजींच्या पंढरपूर प्रवेशानंतर हवेत उडून गेली. ‘गोफण’ या वृत्तपत्राच्या मालक-संपादक जोडगोळीने साने गुरुजींच्या उपोषणाच्या मागची भूमिका लोकांसमोर निर्भिडपणे मांडली. त्यामुळंच सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी साने गुरुजींच्या भूमिकेला पाठींबा दिला. या प्रबोधनाच्या आणि जनमानस घडविण्याच्या लढ्यात राष्ट्र सेवा दल सैनिक आणि महाराष्ट्र शाहिरी कलापथक अग्रभागी होतं.
अखेर मंदिर झाले खुले
साने गुरुजीच्या झंझावाती दौऱ्यानंतर, १० दिवसांच्या उपोषणानंतर आणि सामाजिक दबावामुळंच दलित बांधवांना श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं झालं. जातीअंताच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रात झालेल्या या ऐतिहासिक लढ्याचे पडसाद भारतीय पातळीवर उमटले. अनेक मंदिरं, सार्वजनिक जागा दलितांसाठी खुल्या झाल्या. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या श्रमणसंस्कृतीचं आद्यपीठ. महाराष्ट्र समाजजीवनाची गुरूकिल्ली. संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला. संत बंडखोर होते. करूणासागर होते. सर्व बहुजन समाजाला त्यांना सुबुद्ध करायचे होते. पंढरपूरच्या चंद्रभागेकाठी वाळवंटात त्यांनी भेदभाव नष्ट केला. अपृश्यता निवारणाचा लढा भारतभर पोहोचविण्यासाठी संत नामदेवांनी सुरू केलेले प्रयत्न, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांनी अविरत सुरू ठेवले. संतांची सामाजिक ऐक्याची भूमिका भारतीय समाजानं स्वीकारावी म्हणून या मान्यवरांनी अथक प्रयत्न केले. त्यांचाच विचारवारसा पुढं नेणाऱ्या साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी लढा पुकारला. हा लढा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सामाजिक समतेसाठी लढल्या गेलेल्या लढ्यांपैकी एक असा अभूतपूर्व लढा आहे. भारतीय समाजाच्या हाडी-मांसी खिळलेल्या जात नावाच्या हजारो वर्षांपासूनच्या जुनाट रोगाला घालविण्यासाठी भारतातील अनेक महापुरुषांनी कितीतरी प्रागतिक प्रयत्न यापूर्वी केले होते.
तनपुरे महाराजांच्या मठात स्मारक
स्वातंत्र्य जवळ आलं असताना भारतीय संविधानानं लोकराज्याची हमी दिल्याप्रमाणं लोकशाही, समाजवादी नवभारत कसा असेल, यासाठी साने गुरुजी खूप अधीर झाले होते. म्हणूनच लोकमंथन घडविण्यासाठीचा त्यांनी हा लढा उभारला होता. गुरुजींनी आपलं सात्विक चारित्र्य आणि नितळ पारदर्शी व्यक्तीमत्व याकामी पणाला लावलं होतं. सेनापती बापट, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी यांच्यासह असंख्य समाजवादी कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली. बहुआयामी भारत घडविण्यासाठी राष्ट्र सेवा दल संघटनेनं हा जातीअंताचा लढा दीर्घकाळासाठी हाती घेतला. त्याचाच भाग म्हणून पुणे येथील महात्मा जोतिबा फुले समता पीठ, महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता तीर्थ, कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची समता भूमी ते संताचे आद्यपीठ पंढरपूर अशी समता दिंडीची मोहीम काढली गेली. गेली दोन वर्षे संताच्या सामाजिक एकतेचं दर्शन घडविणाऱ्या दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयाला वाहिलेली दिनदर्शिकाही प्रकाशित करण्यात आली. याच जागरणाचा पुढचा टप्पा म्हणून पंढरपुरात सानेगुरुजींच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात आलं आहे. ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तनपुरे महाराज मठामध्ये हे स्मारक उभं राहतं आहे. साने गुरुजींच्या उपोषणाच्या वेळी श्री संत दादामहाराज तनपुरे यांनी आपले गुरू संत गाडगे महराजांच्या सांगण्यावरून वैचारिक बांधिलकीच्या भूमिकेतून साने गुरुजींना आपल्या मठात जागा देण्याचे धाडस केलं. तनपुरे महाराज मठात उभारलेली सामाजिक एकतेची पताका महाराष्ट्र धर्माची ओळख बनली.
पुतळा, चित्रे, माहिती
सानेगुरुजींनी वळण दिलेला मंदिर प्रवेशाचा हा मानवी इतिहास चिरंतन व्हावा म्हणून लोकसहभागातून साने गुरूजींचं स्मारक उभं राहत आहे. श्री विठ्ठल मंदिर दलितांना दर्शनासाठी खुलं व्हावं म्हणून सानेगुरुजींनी ज्या श्री संत तनपुरे महाराज मठात १० दिवस ऐतिहासिक उपोषण केलं होतं, त्याच ठिकाणी ही स्मारक उभं राहतं आहे. चारोधाम मंडपामध्ये दर्शनी भागात साने गुरूजींच्या पुतळ्यासह, चित्र आणि माहिती दालन असं या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील स्वरूप असणार आहे. ‘साने गुरुजी तत्त्वज्ञान विचार संत आद्यपीठ’ या भव्यतम स्मारकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांनी संघटीत व्हावं, असा आमचा प्रयत्न आहे. पंढरपूर सामाजिक समतेच्या लढ्याचे आद्यपीठ व्हावं, हा त्यामागील दृष्टीकोन आहे.
खरा तो एकची धर्म
ह. भ. प. श्री बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चारोधाम यात्रा मंडप ट्रस्टच्या प्रथम दर्शनी भव्य दालनात आंदोलनातील सर्व प्रसंगांना चित्रबद्ध करून दृश्य स्वरुपात हे स्मारक साकारलं जाणार आहे. साने गुरुजींचा अर्धपुतळा आणि त्यावर ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ’ ही मानव प्रार्थना केंद्रस्थानी असणार आहे.
साने गुरुजी मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांच्या बरोबरीने डॉ. श्रीरंग गायकवाड, अवधूत म्हमाणे, दत्तात्रय कोंडलकर, डॉ. अनिल जोशी, अशोक क्षीरसागर, उपेंद्र टन्नू, सारंग कोळी, शिवाजी पांडुरंग शिंदे, शिवाजी मारुती शिंदे, नागेश अवताडे, तात्या कोळी, प्रकाश आणि अनुपमा पोळ, तसेच निशिकांत परचंडराव आदी कार्यकर्ते स्मारकाच्या पूर्णतेसाठी अविरत प्रयत्न करत आहेत. विचारवंत आ. ह. साळुंखे डॉ. सदानंद मोरे, प्रा. श्रीमती चैत्रा रेडकर यांचे आशय संदर्भासाठी बौधिक मार्गदर्शन लाभले आहे. माननीय शिल्पकार शरद कापूसकर, चित्रकार कुंडलय्या हिरेमठ, आर्किटेक्ट अमोल चाफळकर, अभियंता कपिल डिंगरे, छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली स्मारकाची उभारणी होत आहे. माननीय विश्वस्त मंडळ श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट, पंढरपूर यांच्या वतीने साने गुरुजी मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारकाचं लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. संतांनी निर्माण करून ठेवलेले विचार धनाचं संचित पुरोगामी महाराष्ट्राच्या भावी पिढ्या घडविणाच्या कामी यावं यासाठी महाराष्ट्रातील संत सज्जन, स्त्री, पुरुष, वारकरी, दिंडी समाज कष्टकरी आणि भागवत धर्मीय मंडळींनी या कार्यात सहभागी व्हावं, ही नम्र विनंती.
(लेखक पंढरपुरातील साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत.)