झोपडी जाळून वारी करणाऱ्या
सखाराम महाराजांचा उपक्रम
आपला खान्देश म्हणजे सध्याच्या उत्तर महाराष्ट्रातील एक थोर संत म्हणजे अमळनेरचे श्री सखाराम महाराज. अगदी बालवयापासूनच विठ्ठलाचे भक्त अशी त्यांची ख्याती. कोणत्याही पाश किंवा मोहात न अडकता विठ्ठलभक्तीत सदैव तल्लीन असणाऱ्या श्री सखाराम महाराज यांनी अमळनेर येथे श्री विठ्ठलाच्या रथोत्सवाची परंपरा घालून दिली. त्याला आता २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला. आज हा वार्षिक रथोत्सव उत्साहात साजरा होत आहे.
बालवयापासूनच विठ्ठलभक्ती
श्री सखाराम महाराज यांचा जन्म साधारणपणे १७६५ मध्ये अमळनेरजवळील पिंपळी गावात झाला. त्यांचे कुटुंबीय वैदिक परंपरेतील होते. त्यामुळे लहानपणापासून श्री सखाराम यांना भक्तीमार्गाची आवड होती. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. पण, त्यांनी त्यांचा ईश्वरसाधनेचा मार्ग निवडला होता. बालवयातच ते पंढरीची वारी करू लागले. कालांतराने लग्न झाले. त्यानंतर एकदा पंढरपूर येथे असताना त्यांना अपत्यप्राप्ती झाली. पण, काही दिवसांतच ते मूल गेले. कालांतराने पत्नीचे निधन झाले. तेव्हा आपण सर्व पाशांतून मुक्त झालो, अशी श्री सखाराम महाराज भावना झाली आणि त्यांनी पूर्णपणे स्वत:ला विठ्ठलाशी जोडून घेतले.
दुसऱ्या बाजीरावानेही केली भक्ती
अमळनेर ते पंढरपूर वारीला श्री सखाराम महाराज पुण्याहून जात असत. एकदा काही प्रसंगाने त्यांनी दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारात कीर्तन केले. तेव्हापासून बाजीराव पेशवा श्री सखाराम महाराज यांची भक्ती करू लागले. अमळनेर येथे १८१८ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारताना देवतांच्या मूर्ती आणि निधी बाजीराव पेशव्यांनी पुरवला, अशी नोंद आहे.
झोपडी जाळून पंढरपूर वारी
सखाराम महाराज अमळनेरहून पंढरीच्या वारीला निघताना, आपल्या राहत्या निवासी झोपडीला आग लावून, सर्व वस्तू दान देऊन, केवळ देव आणि पडशी बरोबर घेत. सर्वस्वाचे दान करणे, मागे कुठलाही पाश शिल्लक राहणार नाही याची काळजी घेणे आणि सर्वसंग परित्याग करून भजनानंदी राहणे, हा त्यांचा स्वभाव होता. पंढरी क्षेत्रामध्ये संतांच्या, सत्पुरुषांच्या मांदियाळीत त्यांना सन्मानाचे स्थान प्राप्त झाले होते; ते त्यांच्या अंगभूत वैराग्यानेच. पंढरपूर येथून परतल्यानंतर स्थानिक गावकरी महाराजांना पुन्हा झोपडी बांधून देत असत.
देवाच्या रथोत्सवाची परंपरा
अमळनेर येथे वैशाख शुद्ध नवमीपासून यात्रा सुरू होते. तर, एकादशीला रथोत्सव असतो. या उत्सवाच्या पहिल्याच वर्षी महाराजांनी सप्ताहाचे आयोजन केले होते. तेव्हा महाराजांनी उपवास ठेवला होता. याच दरम्यान चतुर्दशीला सखाराम महाराजांचे शिष्योत्तम श्री गोविंद महाराज यांच्या गळ्यात गुरुपदाची माळ घालून सखाराम महाराज ब्रह्मलीन झाले. त्या वर्षीनंतर वैशाख पौर्णिमेला महाराजांची पालखी सोहळा आयोजित केला जातो.
पंढरीच्या वेशीवर स्वागताचा मान
दरवर्षी पंढरपूरच्या वेशीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला नारळ देण्याचा मान संत सखाराम महाराज संस्थानला असतो. वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला महाराजांच्या वारीस अमळनेर येथून सुरुवात होते. यात असंख्य महिला आणि पुरुष भाविक सहभागी होत असतात. या वारीला सुमारे २०० वर्षांची परंपरा आहे. पंढरपूर येथेही श्री सखाराम महाराज यांचा मठ आहे.
भजन, अन्नदान आणि सामाजिक एकोपा
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या रथोत्सव यात्रा कालावधीत भजन आणि अन्नदानाच्या परंपरेला मोठे महत्त्व आहे. येथे येणाऱ्यांना शिधावाटप केले जाते. दिवसा कडाक्याचे ऊन असल्याने महानैवेद्य आणि महाप्रसाद सायंकाळी आयोजित केला जातो. तर, या रथाला अडकण म्हणजेच मोगरी लावण्याचा मान मुस्लीम बांधवांना आहे. हा रथ १०० वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. विशेष म्हणजे वर्षकाळात भरणारी खान्देशातील ही शेवटची यात्रा असते. येथून पुढे यात्रा बंद होतात. विठ्ठलभक्ती समाजात रुजवत सर्वधर्म समभावाची आणि सारे काही ईश्वराचेच आहे, अशी शिकवण श्री सखाराम महाराज यांनी दिली. त्यांच्या या परंपरेला आणि वाटचालीला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!
(ही माहिती आणि छायाचित्रांसाठी श्री सखाराम महाराज मंदिर संस्थानचे उपाध्याय श्री केशव प्रभाकर पुराणिक यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)