भक्तांना जगण्याचे बळ देणाऱ्या
स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ असा संदेश देत सर्वसामान्य भक्तांचा आत्मविश्वास वाढविणारे, त्यांच्या जगण्याला बळ देणारे श्री स्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिन.
श्री स्वामी समर्थांचे भक्त जगभरात पसरले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या नावे अन्नछत्रे चालविली जातात, विविध प्रकारची सेवा दिली जाते. श्री स्वामींना भगवान श्री दत्तात्रेयांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार मानले जाते. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, अशीही भक्तांची श्रद्धा आहे. मंगळवेढा येथून अक्कलकोट नगरीत ज्या दिवशी प्रकट झाले, तो दिवस होता चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, इंग्रजी कालगणनेनुसार रविवार ६ एप्रिल १८५६.
कर्दळीवनातून आले अक्कलकोट गावी
आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनात गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. पुढे श्रीस्वामी समर्थ तेथून
श्री काशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे येथे प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचितच गावात येत. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले. तेथील चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले आणि भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली आणि लोक स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली.
विविध रुपांत दर्शन
भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रुपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या रुपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांची धारणा आहे.
दीक्षा
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे येथे स्वामींनी काही काळ वास्तव्य केले आणि तिथल्या भक्तांना मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
अनेकांना लावले सन्मार्गाला
स्वामींनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. पण, आपल्या मार्गदर्शनातून स्वामींनी भारतीय जनतेचा आत्मसन्मान जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये सर्वधर्मीय लोकही सामील होते. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्री तात महाराज, आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकरमहाराज, श्री वामनबुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्री स्वामीसुत, श्री आनंदभारती, श्री गजानन महाराज, श्री मोरेदादा, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत.
अवतार कार्य समाप्ती
१८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक अविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करत आहेत आणि अनंतकाळपर्यंत करीत राहतील, अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.
वडाच्या झाडाभोवती मंदिर
सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान धारणा करीत आणि भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभामंडप आणि भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज हे शके १७७९ च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ ४० वर्षांचा आहे. त्यापैकी २१ वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते.
भक्तांना बळ देणारी गीते
मराठी मनोरंजन सृष्टीने श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित चित्रपट, गाणी, गाण्यांचे आल्बम, टीव्ही मालिका, वेब सीरिज, माहितीपट (डॉक्युमेंट्री), लघुपट (शॉर्टफिल्म) अशा अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. जगभर पसरलेल्या स्वामी भक्तांना कठीण काळात आशेचा किरण दाखवणारी स्वामींची अनेक गीतं लोकप्रिय आहेत.
संस्थानाचे विविध उपक्रम
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदान केले जाते. दिवसात साधारणपणे १५ हजारांवर भाविक या महाप्रसाद सेवेचा लाभ घेतात. कोरोना काळात अन्नछत्रामुळे अनेक गरजू आणि भुकेल्या व्यक्तीला दोन वेळचे अन्न मिळाले. शिवाय, मंदिर ट्रस्टच्या सहयोगातून रुग्णालय उभारणी सुरू आहे. त्यासमोरच संस्थानचे भक्तनिवास आहे. मंदिर आवारात भव्य शिवसृष्टी, कपिला गायीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवाय, आकर्षक आणि मनोरंजक बालोद्यान आहे. यामुळं मंदिर परिसराला वेगळी झळाळी येते. मंदिर परिसरात अनेक वस्तू-प्रसाद विक्रेते आहेत. स्वामींच्या दर्शनासाठी येणारा भाविक इथून नक्कीच काही न काही खरेदी करतो. पर्यायाने इथले अर्थचक्र चालते आणि शेकडो कुटुंबांना रोजीरोटी मिळते.
आज अक्कलकोट येथे भव्य उत्सव
आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त श्री क्षेत्र अक्कलकोट येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशीपासूनच या उत्सवाची मोठी तयारी केली जाते. या कार्यक्रमांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक येतात. मंदिर संस्थानाकडून सर्व सुविधा पुरवल्या जातात. अशा या भक्तांना बळ देणाऱ्या, सन्मार्ग दाखविणाऱ्या श्री स्वामी समर्थांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.🙏