मुंबईतील श्री विठ्ठल मंदिरात
अभिषेक करून घेतले दर्शन
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनाही सावळ्या विठुरायाने वेड लावलं आहे. गेले काही वर्षे अमिताभ श्री विठ्ठलाची भक्ती करत असून यंदाही त्यांनी आषाढी एकादशीला सायन येथील श्री विठ्ठल रखुमाईला अभिषेक करत महापूजा केली. यानिमित्ताने सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. ही महापूजा, दर्शनाचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेयर केले आहेत.
आषाढी वारीच्या निमित्ताने सर्वत्र विठ्ठलमय वातावरण असताना अमिताभ बच्चनही सकाळीच सायन येथील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचले. तिथे त्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा झाली. त्यानंतर बराच वेळ तिथे थांबलेल्या अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचे फोटो शेयर करून ”चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जय हरी… आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा” असे ट्विटही केले.
गेली काही वर्षे अमिताभ नेहमीच ट्विटरवरून श्री विठ्ठलाचे फोटो शेयर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा फोटो ट्विट करत प्रार्थना केली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात असताना त्यांनी विठुरायाची करुणा भाकली होती.
त्यावेळीही त्यांनी ट्विटरवरून श्री विठ्ठल रखुमाईचा फोटो शेयर केला होता. त्याचवेळी डॉक्टरांचेही आभार मानले होते. त्यापूर्वीही त्यांनी सायन येथील श्री विठ्ठल रखुमाईचा फोटो शेयर करत विठ्ठल-रखुमाईच्या विवाहदिनी भक्तांना शुभेच्छा दिल्या होता.
एकादशीच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बच्चन यांच्या फोटोवर ”विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” अशी कमेंट केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी काही वर्षापूर्वी श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान आपल्या धीरगंभीर आवाजात गायले होते. ते खूप व्हायरलही झाले होते. महानायक अमिताभ अशा प्रकारे वारकरी विचारांचे पाईक होत असल्याबद्दल वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते आहे.