मूर्तीचा काढला ११०० किलो

शेंदूर; देखभालीचे काम पूर्ण

वणी (नाशिक) : सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरून ११०० किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर आई सप्तशृंगी देवीचे मूळ रूप आता पहिल्यांदाच समोर आले आहे. मूर्ती संवर्धन आणि देखभाल कामकाजामुळे दीड महिना देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचं दर्शन आता भाविकांना होत आहे.

भगवती मूर्ती संवर्धन आणि देखभालीसाठी मागील दीड महिन्यापासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले गेले आहे. आता हे मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर देवीच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये मूर्ती संवर्धनाच्या कामानंतर आई भगवतीच्या रुपात झालेला मोठा बदल पाहायला मिळत आहे. मूर्तीचा एकदमच कायापालट झालेला दिसून येत आहे.

मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर भगवतीच्या स्वरुपावरील गेल्या कित्येक वर्षांपासून साचलेले शेंदूर लेपनाचे कवच धार्मिक, शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आले. यानिमित्ताने ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केले गेले. त्यानंतर पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्र पूर्वी होणार आहे. २६ सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या वणी सप्तशृंगी देवीचे मंदिर मूर्ती संवर्धन आणि देखभालासाठी बंद करण्यात आले होते. या दरम्यान वणी येथे सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मंदिराची संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे मूर्ती संवर्धन आणि मंदिराचे काम अशा दोन्ही कामांसाठी आणखी काही कालावधीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात भाविकांना पहिल्या पायरीच दर्शन उपलब्ध होते.श्री भगवतीची मूर्ती जवळपास १० फूट उंच आणि ८ फूट आकारात आणि एकूण १८ हातांत भिन्न प्रकारातील अस्त्र, शस्त्रे असून, त्यात उजव्या हातात खालील बाजूकडून वरील बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, तर डाव्या हातात खालील बाजूकडून वरील बाजूकडे कमंडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड शक्ती, पाष, घंटा, शेख आहे. ही शस्त्र-अस्त्रे विविध देवदेवतांची प्रतीके असल्याचे म्हटले जाते.

श्री भगवतीची मूर्ती अतिप्राचीन आणि विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. वर्षानुवर्षे त्यावर शेंदूर लेपन सुरू आहे. तसेच सप्तश्रृंग गडावरील वातावरण, देवीच्या डोंगरावर असलेले मंदिर आणि त्यातून होत असलेले पाण्याचे झिरपणे यामुळे मूर्तीच्या काही भागांत क्षती पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात आले होते. पुरोहितांनी २०१२-२०१३ मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनाची मागणी करीत पाठपुरावा केला होता. त्यानुसार सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने सर्व पुरातत्व विभाग, आयआयटी पवई यांचे अहवाल आणि प्रशासकीय परवानगीने पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अजिंक्यतारा कन्सल्टन्सी, नाशिक या संस्थेमार्फत संवर्धनाचे काम सुरु केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *