नवी मुंबईत नेरूळमध्ये

घेतला अखेरचा श्वास

नवी मुंबई : आपल्या प्रभावी वाणीतून, निरुपणातून आणि सुमधूर गायनातून वारकरी संप्रदायाचा मानवतेचा विचार देशभर आणि सातासमुद्रापार नेणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे आज (दि. २६) सकाळी सहा वाजता निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज, रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. दुपारी तीन वाजता नेरूळच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजता नवी मुंबईतील नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सातारच्या वारकरी गोरे-सातारकर घराण्यात त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे त्यांचे मूळ नाव होते. गेली अनेक वर्षे त्यांचे मुंबईतील गिरगावच्या गायवाडीमध्ये वास्तव्य होते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये ते नवी मुंबईतील नेरूळ येथे राहायला आले होते. बाबा महाराजांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फ माईसाहेब यांचे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते.

दरम्यान, बाबामहाराज सातारकर यांनी श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”बाबामहाराज सातारकर हे देशाचे वैभव होते. वारकरी संप्रदायाचा गौरव असलेले बाबामहाराज सातारकर आज वैकुंठवासी झाले. त्यांनी त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जे जनजागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. बाबामहाराज सातारकर हे अत्यंत साधेपणाने आणि सरळ संवाद साधत असत. त्यांची वाणी आणि शैली लोकांचे मन जिंकत असे. ते नेहमी म्हणत असलेल्या ‘जय जय रामकृष्ण हरी’ या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना मी करतो”, शिर्डीत एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या पंतप्रधानांनी बाबामहाराजांना ही श्रद्धांजली वाहिली आहे.


वारकरी कीर्तन, प्रवचनाच्या परंपरेत बाबामहाराजांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसिद्ध शैलीने वैभवी भर घातली होती. त्यांची रसाळ वाणी सातासमुद्रापार पोहोचली होती. महाराष्ट्राच्या गावागावांत, तसेच देश-परदेशांत त्यांचे कीर्तन, प्रवचनाचे हजारो कार्यक्रम झाले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव आहे. १३५ वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा बाबामहाराजांनी पुढे सुरू ठेवली. तीन पिढ्यांपासून मिळालेला कीर्तन, प्रवचनाचा वारसा त्यांनी जपला. १०वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या बाबा महाराजांनी पुढे वकिलीची पदवी घेतली आणि कीर्तनातून प्रबोधनाची वाट धरली. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
बाबा महाराजांकडे ८० वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि १०० वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानकऱ्याची परंपरा आहे. १९६२ मध्ये आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांच्या कार्याची धुरा बाबा महाराजांनी खांद्यावर घेतली. डिसेंबर १९८३ पासून त्यांनी दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ मध्ये त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत हजारो भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते.
बाबामहाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले.

२६ मार्च १९५४ रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्याची परंपरा बाबा महाराजांनी आपल्या कर्तृत्त्वाने उज्जवल केली.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन, प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले. १९७४ मध्ये श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. १९८० ते १९९९ या कालावधीत त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली. १९९८ ते २००१ या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली. १९८६ साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली.

कैवल्याचा पुतळा, ज्ञानाची दिवाळी, तुका झालासे कळस, अनाथांचा नाथ, देवाचिये द्वारी अशा अनेक प्रवचन मालिका विविध दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच मुंबई दूरदर्शनवर त्यांनी सादर केल्या आहेत. कीर्तनाच्या सुमारे ५७ ध्वनिफिती, तसेच १२ सीडी बाबा महाराजांनी प्रकाशित केल्या आहेत. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत, श्री सद्गुरू दादामहाराज सांप्रदायिक भजन मालिका अशी बाबामहाराज सातारकर यांची ग्रंथसंपदा आहे.

लोणावळ्यापासून आठ किलोमीटरवरील दुधिवरे येथे १६ एकर जागेत बाबामहाराजांनी आध्यत्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (१९८६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार (१९९०), पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (१९९०), सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (१९९०), महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानपत्र (१९९१), सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्य यांच्या हस्ते सत्कार (१९९२), जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (१९९४) अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला.

याशिवाय सातारा भूषण, फलटण भूषण आणि महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही बाबा महाराजांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *