प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे
वारकरी संप्रदायाला आवाहन
आपण चालवत असलेल्या वारकरी परंपरेबद्दल महाराष्ट्र आपला ऋणी आहे. परंतु आपण आधुनिक काळाशी जोडून घेतले पाहिजे. बाहेरच्या जगात काय चालले आहे, याची दखल घेतली पाहिजे. सामाजिक प्रश्न समजून घेऊन ते कीर्तनातून वगैरे उपस्थित केले पाहिजेत. लेखन, वाचन केले पाहिजे. केवळ लोक आपल्या पाया पडतात, आपल्याला मानतात, एवढ्यावरच समाधान न मानता खऱ्या अर्थाने समाजाशी एकरूप झाले पाहिजे, असे परखड आवाहन आज (दि. १४ ऑगस्ट) आळंदी येथे महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी वारकरी सांप्रदायिकांना केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाच्या वतीने पुनर्प्रकाशित करण्यात आलेल्या ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ या ग्रंथाचे लोकार्पण आज आळंदी येथे करण्यात आले. त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते.
आळंदीतील भक्तनिवासात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आळंदी देवस्थानचे प्रमुख आणि पुणे येथील प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ ग्रंथांचे संपादक डॉ. शिरिष लांडगे. अॅड. किशन वासकर, राणा महाराज वासकर, ऋषिकेश आरफळकर, बाळासाहेब चोपदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ या ग्रंथाविषयी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, सुमारे ८८ वर्षांपूर्वी हा ग्रंथ तयार करण्यात महाराष्ट्रातील तत्कालीन सुमारे ८० विद्वानांनी सहभाग घेतला. मामासाहेब दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर, दादामहाराजांचे शिष्य गोपाळराव राहीरकर आदी आपली परंपरा सांभाळणाऱ्या वारकरी सांप्रदायिकांनीही या ग्रंथात अभ्यासपूर्ण लेख लिहिले. आज परंपरेतील किती लोक अशा प्रकारचे लेखन करू शकतील? आज किती धार्मिक संस्थांमध्ये हा ग्रंथ आढळून येईल? किती मंडळींनी तो वाचला असेल? तर याची उत्तरे नकारार्थी येतात. कारण बाहेरच्या जगात काय चाललं आहे, याचा आपण विचारच करत नाही. आपले परंपरेचे काम महत्त्वाचे आहेच. त्याबद्दल महाराष्ट्र आपला ऋणी आहे. पण दर पाच मिनिटाला जग बदलते आहे. बुद्ध तर म्हणाले होते, दर क्षणाला जग बदलते आहे. त्याची आपण दखल घेणार आहोत की नाही? त्यामुळेच तर एखादा विनोदी कीर्तनकारही महाराष्ट्रातील कीर्तनाचे क्षेत्र काबीज करतो. समाजातील प्रत्येक प्रश्नाची दखल घेतो. त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
त्यामुळे आपले समाजापासून अलिप्त राहणे इथून पुढे चालणार नाही. कारण नवी पिढी आपल्याला प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने भोवतालचे बदल समजून घ्यावेत. हे कुणीतरी सांगायला हवे होते, ते मी सांगतो आहे. कारण मी गेली ५० वर्षे संप्रदाय, अभ्यासक, समाज, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये वावरतो आहे. त्या निरिक्षण, अनुभवातून मी हे बोलत आहे. त्यामुळे परंपरेतील लोकांनी ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’सारखे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, असे आवाहनही डॉ. मोरे यांनी केले. याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम या अध्यासनांच्या वतीने या ग्रंथांवर दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी न्यायाधीश संजय देशमुख म्हणाले, नैतिक मूल्ये ढासळण्याच्या या काळात अशा प्रकारचे ग्रंथ तरूण पिढीपर्यंत आपण पोहचविले पाहिजेत. संतांच्या ग्रंथांचे पारायण होणे म्हणजे नैतिकता, विवेक या मूल्यांचे जागरण करणे. जुन्या नीतीतत्त्वांना उजाळा देणे. गेल्या काही दिवसांत पुणे शहरात बलत्काराचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे संतांनी रुजविलेली नीतीमूल्ये कीर्तनकारांनी युवकांना सांगितली पाहिजेत. जातीविरहीत समाजरचनेचा आग्रह धरला पाहिजे. न्यायाधीश झाल्यामुळे कीर्तनकार व्हायचे राहिले, पण पुढील काळात मी कीर्तन करणार आहे, असेही देशमुख यावेळी म्हणाले. आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड. विकास ढगे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावना केली. संस्थानच्या वतीने हा ग्रंथ शाळा, महाविद्यालयांच्या ग्रंथालयांपर्यंत पोहचिविण्याचा मानस आहे, असे त्यांनी नमूद केले. विश्वस्त अभय टिळक यांनी सूत्रसंचालन केले.