भागवत धर्म प्रचारक
पुरस्काराने झाला सन्मान
पंढरपूर : भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावीपणे करणारे वारीतील ‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार शंकर टेमघरे यांना रविवारी (दि. १० जुलै) पंढरपूर येथे ‘भागवत धर्म प्रचारक; हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. संस्थानचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते टेमघरे यांना देण्यात आला.
याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त ह. भ. प. अभय टिळक, माजी आमदार शरद ढमाले, दिंडी समाजाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब फुरसुंगीकर, संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, पंजाबराव पाटील, सम्राट पाटील, दत्तात्रेय टेमघरे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, ॲड. विलास काटे, राजेंद्र मारणे, राजेंद्रकृष्ण कापसे, राघव पसरिचा, जगदीश शिंदे, अमोल पाटील, रघुनाथ वाझे यांच्यासह वारकरी सांप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ह. भ. प. अभय टिळक म्हणाले, भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य संत नामदेव महाराजांनी केले, तर संत कोणाला म्हणावे याची व्याख्या संत मुक्ताबाईंनी सांगितली. या दोन्ही संतांच्या विचारांचा आदर्श वारीतील पत्रकारांनी घ्यावा आणि वारकरी सांप्रदायाला बळकटी द्यावी. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील होते. प्रारंभी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प, रवींद्र महाराज हरणे यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. तसेच सकारात्मक पत्रकारिता कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकार शंकर टेमघरे, असे त्यांनी गौरवैद्गार काढले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात पत्रकार शंकर टेमघरे म्हणाले, वारी हा संत विचारांचा सोहळा आहे. या सोहळ्यात अनेक विचारांची माणसे एकत्र येत असली, तरी पंढरीची वारी आणि विठ्ठलाचे दर्शन हा त्यांचा मुख्य भाव असतो. हा भाव डोळ्यासमोर ठेवून मी सकारात्मक लिखाण करण्याचा प्रयत्न केला. वडिलांचे आशिर्वाद आणि वारकरी सांप्रदायातील थोरामोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली २५ वर्षे वारीच्या वार्तांकनाचे काम केले. त्याचेच फळ म्हणजे हा पुरस्कार होय. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले, तर आभार संदीप पाटील यांनी मानले.
👌